भट्टाचार्य, बीरेंद्रकुमार : (१४ ऑक्टोबर १९२४ – ६ ऑगस्ट १९९७). साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध असमिया कादंबरीकार, सर्जनशील पत्रकार, प्रतिभासंपन्न कवी. त्यांचा जन्म आसाममधील सिबसागर जवळील एका चहाच्या बागेत, अगदी गरीब कुटुंबात झाला. अनेकवेळा उपाशीपोटीच त्यांना शाळेत जावे लागे. वयाच्या १३ व्या वर्षी १९३७ मध्ये ते जोरहाट सरकारी शाळेत दाखल झाले. शालेय वयातच कविता, कथालेखनाला त्यांनी सुरुवात केली होती. १९४१ मध्ये ते मॅट्रीकची परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. जोरहाट हे त्याकाळी साहित्यिक कार्यक्रमांचे केंद्र होते. अनेक थोर साहित्यिक तिथे येत असल्याने छोट्या बीरेंद्रला त्यांचा भरपूर सहवास मिळाला. गुवाहाटीच्या कॉटन कॉलेजमधून १९४५ मध्ये ते बी.एस्सी. झाले. यादरम्यान १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ते सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांची दयनीय स्थिती, देशाचा स्वातंत्र्यसंग्राम, दिग्बोई येथील तेलाच्या मजूरांचा संप ह्या सर्व बाबी त्यांच्या अनुभवविश्वात आल्या. ही सारी परिस्थिती आणि स्वत: अनुभवलेली गरीबी, बरे वाईट-अनुभव हे सारं त्यांच्या लेखनात व्यक्त झालं आहे. त्यानंतर कोलकाता इथे येऊन त्यांनी वाङ्मयीन नियतकालिकांचे  संपादन कार्य सुरू केले. वन्ही  ही असमिया साहित्यपत्रिका, दैनिक असमिया, रामधेनू आणि नंतर सर्वाधिक खपाचे नवयुग  या नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले. याच काळात त्यांची  राममोहन लोहिया यांच्याशी मैत्री झाली आणि ते समाजवादी आंदोलनाशी जोडले गेले. त्यांना असमिया साहित्यातील विनोद आणि उपहास  या विषयावर गुवाहाटी विश्वविद्यालयाने आचार्य (डॉक्टरेट) पदवी प्रदान केली. या अगोदर मधल्या काळात म्हणजे १९४९ ते १९५३ मध्ये बर्मा सीमेलगतच्या उखरूल या गावातील शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. त्यावेळेस तेथे आलेल्या अनुभवावर, पाहिलेल्या नागा लोकांच्या जीवनावर पुढे त्यांनी इयरूइंगम  ही कादंबरी लिहिली. पत्रकार म्हणून काम करताना या क्षेत्रात शक्तीचे आणि राजनीतीचे वर्चस्व बघून ते निराश झाले आणि मग त्यांनी पत्रकारिता सोडली. थोडेफार पैसेही मिळू लागले तरी सत्ता आणि सुख यांची आकांक्षा करायची नाही. हे तत्त्व बालवयापासूनच परिस्थितीमुळे त्यांनी अंगिकारलं होतं. त्यामुळे उखरूलला शिक्षक झाल्यावरही त्यांच्याकडे दोनच कपड्यांची जोडी आणि स्वस्तात खरेदी केलेला जुना फौजी कोट ते वापरत होते. यानंतर त्यांनी गुवाहाटीच्या विश्वविद्यालयात पत्रकारितेचे प्राध्यापक म्हणूनही काही काळ काम केले.

बीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांचे साहित्य : बीरेंद्रकुमार यांची प्रतिभा बहुमुखी होती. ते एक कुशल कवी, प्रबंधलेखक, कथाकार आणि प्रतिभाशाली कादंबरीकार होते. कवी म्हणून लेखनाला सुरुवात केलेल्या बीरेंद्रकुमार यांच्या कविता, कथा आणि समीक्षात्मक निबंध रंगधर, पचोवा  आणि रामधेनू  या नियतकालिकातून प्रकाशित होत होते. त्यांच्या काही चांगल्या कविता जयंती मासिकात प्रसिद्ध झाल्या. त्यांचा कथासंग्रह कलंग अजियुबोय मुळे त्यांचे नाव समर्थ कथालेखक म्हणून वाचकांसमोर आले. १९४६ मध्ये जीवनभर विपुल अमृतराशी  हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. कादंबरीराजपथ रिंडीयाय (१९५६), आई (१९६०), सतसरी (१९६३), शतघ्नी (१९६५), मृत्युंजय (१९७०), प्रतिपद (१९७०), चिनाकिसून (१९७१), कबार आरु फूल (१९७२), बल्लारी (१९७३), दायिनी (१९७६), रंग मेगील (१९७६), इयरूइंगम (१९७६), शरत कोनवर (१९७८), कलार हुमूनाह (१९८२), चतुरंग (१९८७). लघुकथा – कोलोंग अजिओ बल (१९८७) इत्यादी. अनुवाद , प्रवासवर्णने, चरित्रात्मक साधने आणि ऐतिहासिक विषयातील इतर अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. त्यांचे एकूण १३ काव्यसंग्रहही प्रकाशित झाले आहेत. असमिया काव्याला त्यांनी नवी दिशा दिली आहे. १९७५ मध्ये सीमाय अमानी करे हे त्यांचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे.

इयरूइंगम् आणि प्रतिपद या त्यांच्या कादंबऱ्यातून तत्कालीन जनजीवनाचे श्रमिक वर्गांच्या समस्यांचे चित्रण केलेले दिसते. हे चित्रण इतके मानवी संवेदनांनी युक्त असे झालेले आहे की, त्यातील प्रत्येक पात्र जिवंत झालेले आहे. कादंबऱ्यातील व्यक्तिरेखा विशेषत: स्त्री व्यक्तिरेखा, प्रसंग चित्रण विलक्षण वास्तववादी असून ग्रामीण भागातील म्हणी, वाक्प्रचार यामुळे वातावरणनिर्मिती प्रत्ययकारी झालेली दिसते. भाषाशैली सरळ, ओघवती, क्वचित उपरोधपूर्णही आहे. निसर्गाचे वर्णन करताना लेखकाची कवीवृत्ती जागृत होते. मृत्युंजय  या कादंबरी लेखनासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त श्रेष्ठ कादंबरी मृत्युंजय ही भारत छोडो आंदोलनात आसाममध्ये घडलेल्या घटनांवर आधारित एक राजनीतिक कादंबरी आहे. त्यात जनमानसांच्या आंदोलनातील समूहाचे, त्यांच्या दु:खाचे, आकांक्षांचे आणि दुर्दम्य आशेचे अत्यंत भावपूर्ण आणि मार्मिक चित्रण केले आहे. भारतातील तत्कालीन परिस्थितीचे प्रतिबिंब या कादंबरीत पडलेले आहे. राजपथ रिंडीयाय  ही कादंबरी स्वातंत्र्य आंदोलनातील एका दिवसाच्या घटनेवर आधारित असून तत्कालीन जीवनाचे मानसिक ताणतणावांचे, संघर्षाचे, धक्कादाय अनुभवांचे चित्रण यात आहे. डिग्बोई रिफायनरीच्या मजुरांचा १९३९ मधील संप हा प्रतिपद  या कादंबरीचा विषय असून लेखक सामाजिक असमानतेच्या विरुद्ध विद्रोहाच्या बाजूने किती आहे याचे दर्शन या कादंबरीत घडते. इयरूइंगम्  या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असून या कादंबरीचा लोकांचे राज्य  हा मराठी अनुवाद शांता शेळके यांनी केला आहे. नागा समस्या, इंफाळमधील सामान्य माणसांच्या उध्वस्त जीवनाची ही कहाणी आहे. जपानी सैनिकांकडून नागा प्रदेशावर आक्रमण झाले. त्यामुळे तेथील लोकांची नेहमीची जीवनसरणीच पार बदलून गेली. शारीरिक, मानसिक स्तरांवर अपार वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या. युद्धांच्या चरकात पिसले जाणारे प्रेम आणि त्याच्या निराशामय परिणतीचे अत्यंत प्रभावशाली चित्रण लेखकाने केले आहे. जपानच्या युद्धात पराभव झाल्याने, मणिपूर आणि आसाम इथे छावणीत राहिलेल्या जपानी सैन्याने आता माघार घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे शिपाई इशाओरा आणि शारेंग्ला यांच्या प्रेमाचे स्वप्न धुळीला मिळते. जर इशाओरा जपान्यांबरोबर न जाता इथेच राहिला तर जपानी त्याला मारून टाकतील आणि त्यांच्यापासून स्वत:ला कसंतरी वाचवून शारेंग्लाच्या प्रेमापोटी तो इथेच राहिला तर ब्रिटिश त्याला पकडून, मारून टाकतील अशा कोंडीत सापडलेल्या या स्थितीचे चित्रण लेखकाने अतिशय मार्मिकपणे या कांदबरीत केले आहे.

बीरेंद्रकुमार भट्टाचार्य महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान व जीवनविषयक मूल्ये यांचे कडवे पुरस्कर्ते होते. जयप्रकाश नारायण यांच्या विचारसरणीचाही त्यांच्यावर प्रभाव होता. सामाजिक न्याय, सत्य व मानवता ही त्यांची आवडती मूल्ये होती. आयुष्यभर त्यांनी ही मूल्ये स्वीकारली. एकदा आकाशवाणीवरील कार्यक्रमात ते त्यांची कविता ‘नागनीर चिथ्थी’ ही कविता वाचणार होते, पण ही कविता वाचायला आधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. तेव्हा त्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला. हे केलेले विलक्षण धाडस कळल्यावर आचार्य विनोबा भावे म्हणाले होते की, याचे नाव बीरेंद्र ऐवजी धीरेंद्र असायला हवे.  त्यांना वयाच्या ३५ व्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार आणि वयाच्या ५६ व्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे दोन्ही सन्मान इतक्या कमी वयात दुसऱ्या कोणत्याही साहित्यिकाला मिळालेले नाहीत. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले असमिया लेखक आहेत.

संदर्भ :

  • http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/birendra_kumar_bhattacharyya.pdf