वर्मा, निर्मल : (३ एप्रिल १९२९ – २५ ऑक्टोबर २००५). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध हिंदी लेखक. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध अशा विविध साहित्यप्रकारात लेखन करणारे एक असाधारण संवेदनशील लेखक म्हणून निर्मल वर्मा हिंदी साहित्य जगतात प्रसिद्ध आहेत. १९५० च्या दशकात हिंदी साहित्यात नवकथेच्या आंदोलनाला ज्यांनी सुरुवात केली, त्या लेखकांपैकी ते एक आहेत. एक लेखक तसेच विद्वान, उत्तम वक्ते आणि विचारवंत म्हणूनही ते परिचित होते. त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशाच्या सिमला येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. बालपण, माध्यमिक शिक्षण जन्मगावीच झाल्यावर, त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून इतिहास विषयात एम.ए.ची पदवी संपादन केली. लेखन, वाचनाची विलक्षण आवड त्यांना होती. काही वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. पण पुढे मात्र त्यांनी मुख्यत: लेखनावरच आपला उदरनिर्वाह करण्याचे ठरविले. हिंदी – साहित्यक्षेत्रामध्ये ते लेखकाचे स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि जबाबदारी यांचा मानदंड बनलेले होते.
१९५९ ते १९७० पर्यंत त्यांनी यूरोपभर प्रवास करून तेथील विभिन्न संस्कृतीचा जवळून परिचय करून घेतला. १९५९ पासून प्राग (चेकोस्लोव्हाकिया) च्या प्राच्यविद्या संस्थेमध्ये ते सात वर्षे कार्यरत राहिले. हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने, तिथे अनेक चेक कथा – कादंबऱ्यांचे हिंदी अनुवाद त्यांनी केले. त्यानंतर लंडनमधील वास्तव्यात टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदुस्तान टाइम्ससाठी त्यांनी राजकीय आणि सांस्कृतिक वार्तांकन केले. १९७२ मध्ये ते भारतात परत आले आणि सिमला येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज’चे फेलो असताना त्यांनी ‘मिथक चेतना’ या विषयावर संशोधनात्मक कार्य केले. १९७७ मध्ये आयोवा (अमेरिका) येथील आंतरराष्ट्रीय लेखक कार्यशाळेत ते सहभागी झाले होते.
स्वत:च्या खास आणि आगळ्यावेगळ्या लेखनशैलीत, गंभीर आणि भावपूर्ण कथालेखन करणारे, निर्मल वर्मा हे आधुनिक हिंदी कथा लेखकांमध्ये एक महत्त्वाचे वाचकप्रिय कथाकार आहेत. त्यांचा पहिला कथासंग्रह परिन्दे १९५८ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर कव्वे और काला पानी (१९८३) आणि सुखा तथा अन्य कहानियाँ (१९९५) यांसह एकूण सहा कथासंग्रह ; जलती झाडी (१९६४), पिछली गर्मियोंमें (१९६९), बीच बहसमें (१९७१) हे कवितासंग्रह ; वे दिन, लाल टीनकी छत (१९७४), एक चिथडा सुख (१९७९ ), रात का रिपोर्टर (१९८९), अंतिम अरण्य (२०००) ह्या कादंबऱ्या आणि चीडोंपर चाँदनी (१९६२) आणि धुंधसे उठती धुन्द ही प्रवासवर्णने इत्यादी त्यांचे साहित्य प्रकाशित आहे. त्यांचे तीन एकान्त हे त्यांचे नाटक याशिवाय चार संकलने आणि अनुवाद कार्यही प्रकाशित आहे.१९८८ मध्ये इंग्लंडचे प्रकाशक रीडर्स इंटरनॅशनलतर्फे त्यांचा द वर्ल्ड एल्सव्हेअर हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून, याच सुमारास बी.बी.सी. तर्फे त्यांच्यावरील संसाधनात्मक ध्वनिचित्रफीत (डॉक्युमेंटरी फिल्म) प्रसारित झाली आहे. त्यांच्या ‘माया दर्पण’ या कथेवर आधारित हिंदी चित्रपटाला १९७३ चा सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे.
परिन्दे या संग्रहातील ‘परिन्दे’ ही कथा हिलस्टेशनवरच्या बर्फाळ प्रदेशातील, एका शाळेतील वसतिगृहाच्या मेट्रनच्या मानसिक आंदोलनाची एक अलवार कथा आहे. ‘लन्दनकी रात’ ही कथा अनिवासी भारतीय, आशियाई लोकांची बेकारी, नोकरीचा शोध, अपमानास्पद जीवन व जीवनसंघर्षाची कथा आहे. ‘धूपका टुकडा’ ही कथा एकटेपणाची, एकाकीपणाची खंत व्यक्त करणारी, स्वगत शैलीतील कथा आहे. निर्मल वर्मांच्या कथांमध्ये वास्तववादी, अनुभवगम्य, समर्थ वातावरणनिर्मितीचा अनुभव वाचकांना येतो. मानवी नाते संबंधातील औदासिन्य आणि त्रयस्थपणाला हळुवारपणे ते असे चित्रित करतात की, ते लेखकाचे अनुभवकथन न राहता, वाचकांचेच होऊन जाते. एका विलक्षण, आरपार भेदून जाणाऱ्या, पारदर्शी स्थितीचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या कथा वाचकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करतात.
त्यांच्या वे दिन या कादंबरीत त्यांनी आपल्या यूरोप प्रवासाच्या पार्श्वभूमीचा वापर केला आहे. चेकोस्लोव्हाकियाच्या परिसरातील काही अनिवासी यूरोपीय पात्रांच्या माध्यमातून, त्यांनी युद्धोत्तर यूरोपची, माणसांची मानसिकता चित्रित केली आहे. युद्धकाळात बालपण घालविलेल्यांना त्या दु:खद स्मृती जन्मभर त्रास देतात, हे वास्तव या कादंबरीत चित्रित केले आहे. शब्द और स्मृती या निबंधसंग्रहातील लेखांमध्ये वर्मांनी विविध साहित्यप्रकारांविषयी, भारतीय कादंबरी लेखनाच्या निकषाविषयी विचार मांडले आहेत. एक आधुनिक कथाकार, पत्रकार निर्मल वर्मा यांनी अनेक वर्षे भारताबाहेर प्रवास, वास्तव्य केल्यावर भारतात परत आल्यावर, त्यांना दिसणारा भारत कसा दिसला? देश-विदेशातील अनुभवांमुळे, मनात तो तुलनात्मक विचारांचा कल्लोळ माजला त्याविषयी त्यांनी अपने देश वापसी मध्ये लिहिले आहे.
साहित्य पुराणातील वृक्षाप्रमाणे मुळं आकाशात फैलावून आणि फांद्या पृथ्वीच्या पोटात पसरून उभे आहे. या वृक्षाची प्रत्येक फांदी एक भाषा आहे. ज्यावर जगातील प्रत्येक संस्कृती आपल्या आठवणींचे आणि संस्कारांचे एक घरटे बनविते. जर मनुष्याची आश्रम घेण्याची जागा ही साहित्य असेल, तर निसर्गाची आश्रय घेण्याची जागा ही भाषा आहे. त्यात प्रत्येक संस्कृतीच्या प्रतिमा, प्रतिके, स्वप्न आणि आकांक्षा प्रतिबिंबित होतात आणि ज्या भाषेत विचार करतो, लिहितो त्यात केवळ व्यक्तिगत भावभावनांचं व्यक्त करीत नाही, तर त्या भाषेच्या माध्यमातून एखाद्या देशाची आणि समाजाची ओळख आपल्याला होते, असे भाषाविषयक विचार त्यांनी त्यांच्या साहित्यचिंतनातून मांडले.
विविध साहित्यप्रकारात लेखन करणाऱ्या निर्मल वर्मा यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कव्वे और काला पानी या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९८५), साधना सन्मान पुरस्कार (१९९४), राम मनोहर लोहिया अतिविशिष्ट सन्मान (१९९५), भारत और यूरोप : प्रतिश्रुतिके क्षेत्रमें या वैचारिक निबंधसंग्रहासाठी मूर्तिदेवी पुरस्कार, ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्य पुरस्कार (१९९९) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या भगिनी ज्येष्ठ हिंदी कवयित्री महादेवी वर्मा यांनाही १९८२ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. २००२ मध्ये निर्मल वर्मांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. निराला सृजनपीठ (भोपाळ, १९८१-८३) आणि यशपाल सृजनपीठ (सिमला, १९८९ ) चे ते अध्यक्ष होते. हिंदी साहित्यक्षेत्रात निर्मल वर्मा यांनी प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे पाश्चात्त्य आणि भारतीय संस्कृतीच्या आंतर्द्वंद्वाचा खोलवर आणि व्यापक विचार केला आहे.