ठळक गोषवारा :

पार्श्वभूमी : १९६९ मध्ये फील्डमार्शल अयुबखानने पाकिस्तानच्या सत्तेची सूत्रे सेनाप्रमुख जनरल याह्याखानकडे सोपवल्यानंतर याह्याखानने १९७०च्या डिसेंबर महिन्यात पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या. त्यांत पूर्व पाकिस्तानातील शेख मुजीबूर रहमान याच्या अवामी पक्षाला ३१३ पैकी १६७ जागा मिळाल्या, तर पश्चिम पाकिस्तानातील झुल्फिकार भुट्टो याच्या पक्षाला फक्त ८८ जागा मिळाल्या. पूर्व पाकिस्तानला स्वायत्तता आणि लष्करी राजवटीचा अंत या दोन मागण्यांवर निवडून आलेल्या अवामी पक्षाच्या हातात सत्ता जाणार हे स्पष्ट झाल्यावर याह्याखानने पुनश्च ‘मार्शल लॉ’ लादल्याची घोषणा केली; तथापि मुजीबूर रहमानने जनजागृतीच्या चळवळीद्वारे पूर्व पाकिस्तानात अभियान छेडले. परिणामत: तेथील लष्करी गव्हर्नर जनरल टिक्काखान याने दडपशाही आणि जुलूमजबरदस्तीने ते दडपण्याचा अमानुष प्रयत्न केला. तेव्हा मुजीबूर रहमानने २५ मार्च १९७१ रोजी ‘स्वतंत्र बांगला देश’ची घोषणा केली. त्यांना अटक करून पश्चिम पाकिस्तानात डांबण्यात आले. पाकिस्तानी सैन्याच्या अमानुष अत्याचारांमुळे निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागले. तेव्हा त्यांना परत जाण्यासाठी वातावरण निर्माण करण्याच्या भारताच्या विनंत्या पाकिस्तानने धुडकावून लावल्या. पाकिस्तानपासून मातृदेश मुक्त करण्यासाठी बांगला नागरिकांनी ‘मुक्तिबाहिनी’ या स्वयंसेवकी सेनेची उभारणी केली. युद्धाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, हे भारतीय शासनाच्या लक्षात आले. त्यासाठी पाकिस्तानी सैन्याचा पराभव करणे हेच प्रमुख उद्दिष्ट होते.

विजयानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय सैनिक

१९७१चे भारत-पाकिस्तानमधील युद्ध पूर्व आणि पश्चिम या दोन आघाड्यांवर झाले. युद्धाचे प्रमुख क्षेत्र जरी पूर्व पाकिस्तान असले, तरी त्याचे पडसाद पश्चिम सीमेवरही पडतील, हे अपेक्षित होते. पूर्वेत भारताची प्राथमिक चढाई १९-२० नोव्हेंबरलाच चालू झाली, तरी याह्याखानने ३ डिसेंबरला भारताशी युद्धाची घोषणा करून पश्चिमेत भारतावर आक्रमण केल्यानंतरच त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाले.

पूर्व सीमेवरील युद्ध : पूर्व पाकिस्तानात भारतीय सैन्याने चहूबाजूंनी चढाई केली. नैऋत्य भागात २ कोअरच्या ९ इन्फन्ट्री डिव्हिजनने प्रथम जेस्सोर काबीज केले आणि नंतर खुलना बंदरापर्यंत आघाडी मारली; तर त्याच्या ४ इन्फन्ट्री डिव्हिजनने झेनिदावर विजय मिळवल्यानंतर पद्मा नदीवरील महत्त्वाच्या हार्डिंग ब्रिजवर ताबा केला. वायव्य विभागात ३३ कोअरने २० माउंटन डिव्हिजन आणि ७१ माउंटन ब्रिगेडकरवी बोग्रा आणि रंगपूरमधील शत्रुसैन्याला पराजित केले. पूर्व विभागात ४ कोअरच्या ८, ५७ आणि २३ माउंटन डिव्हिजन्सनी मौलवीबजार, सिल्हेट, दाउदखंडी आणि मैनामनी ही शहरे जिंकली. मध्य विभागात १०१ कम्युनिकेशन झोनने जमालपूर, मैमेनसिंग आणि रंगेलचा एकामागून एक ताबा घेत पार डाक्क्यापर्यंत मजल मारली. कलकत्ता (कोलकाता), सिलिगुडी, शिलाँग आणि त्रिपुरा या भारतातील शहरांमार्गे चारही दिशांनी हल्ला करून पूर्वेमधील पाकिस्तानी सैन्याची कोंडी झाल्यानंतर मात्र पूर्व पाकिस्तानातील त्यांचे सरसेनापती लेफ्टनंट जनरल निआझी याने शरणागती पतकरल्याचे जाहीर केले.

जम्मू-काश्मीर आघाडीवरील युद्ध : भारताचे मुख्य आक्रमण पूर्व पाकिस्तानापुरतेच मर्यादित असल्यामुळे पश्चिम आघाडीवर सतर्क राहून भक्कम संरक्षणात्मक धोरण योजण्यात आले होते. पाकिस्तानने ३ डिसेंबरला युद्धाची घोषणा करून प्रामुख्याने पूंछ आणि छांब या विभागांत हल्ले चढवले. पूंछ विभागात तैनात असलेल्या ९३ इन्फन्ट्री ब्रिगेडने ठाण्यांवर होणारे पाकिस्तानचे हल्ले सात दिवसांच्या लढ्यानंतर नाकाम केले. १९६५ प्रमाणेच छांब भागात पाकिस्तानी सैन्याने पुन्हा हल्ला चढवला. त्यासाठी त्यांनी चार ते पाच इन्फन्ट्री ब्रिगेड आणि एका आर्मर्ड ब्रिगेडचा उपयोग केला. छांबमधून भारतीय लष्कराची पिछेहाट झाली; परंतु मनव्वरतवी नदीवर पाकिस्तानची नाकेबंदी करण्यात आली. छांब विभाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. कारगिल, तंगधार, उरी, नॉर्दर्न गली आणि चिकन नेक या भागांत भारतीय सैन्याने  छोटीछोटी ठाणी काबीज केली.

पश्चिम विभागातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील युद्ध : पूर्व पाकिस्तानात भारताने चढाई केल्यावर पाकिस्तान पश्चिमेत प्रतिहल्ले चढवेल, हे गृहीत धरले होते. छांबमधील पाकिस्तानचा हल्ला याचाच एक भाग होता. पाकिस्तानला अशा चढायांपासून परावृत्त करण्यासाठी भारतीय सैन्याला पश्चिम सीमेवर मर्यादित आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक होते. यानुसार भारताने मुख्यतः तीन भागांत चढाया केल्या. पहिली, पाकिस्तानच्या शक्करगढ भागात; दुसरी, गुरदासपूरजवळ डेराबाबानानकसमोर आणि तिसरी, राजस्थानच्या गद्रा या भागात. उलट, पाकिस्तानी सैन्याने पंजाबात हुसैनीवालामध्ये चढाई केली.

शक्करगढ फुगवट्यावर भारतीय ३९, ५४ आणि ३६ इन्फन्ट्री डिव्हिजन्सनी हल्ला चढवला. तिथे दोन्ही बाजूंत घमासान युद्ध झाले. पंजाबमध्ये डेराबाबानानक क्षेत्रात भारताच्या ८६ इन्फन्ट्री ब्रिगेडने काही भाग काबीज केला, तर पाकिस्तान्यांनी हुसैनीवाला एनक्लेव काबीज केली. राजस्थानमधील लोंगेवाला मोर्चावर पाकिस्तानने केलेला हल्ला शर्थीने परतवताना २३ पंजाब बटालियन आणि भारतीय वायुसेनेच्या विमानांनी अचाट कामगिरी बजावली.

नौसेना आणि वायुसेनांमधील युद्ध : ३ डिसेंबरला पकिस्तानी वायुसेनेने श्रीनगर, अवंतीपूर, अमृतसर, पठाणकोट, अंबाला, बारमेर आणि जोधपूर या सात विमानतळांवर संध्याकाळी हल्ले चढवले; परंतु त्याआधीच भारताने आपल्या विमानांची पांगापांग केल्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. त्याच रात्री आयएनएस ‘राजपूत’ने विशाखापट्टनमच्या बंदरापर्यंत पोहचलेल्या पाकिस्तानची पाणबुडी ‘गाझी’ला उद्ध्वस्त केले. ६ डिसेंबरला भारतीय नौसेनेच्या एका टास्क फोर्सने कराचीवर झुंजार हल्ला चढवला आणि पाकिस्तान नौसेनेच्या ‘खैबर’ आणि ‘शहाजहान’ या दोन युद्धनौकांना निकामी केले. भारतीय नौसेनेने ग्वादर ते जिवानीपर्यंतच्या ३०० किमी. लांबीच्या पाकिस्तानी सागरतीरावर परिणामकारक हल्ले चढवून पूर्णपणे वर्चस्व प्राप्त केले.

पाकिस्तानच्या जनरल नियाझीची शरणागती, डाक्का, १६ डिसेंबर १९७१.

युद्धसमाप्ती : बांगला देश स्वतंत्र झाल्यावर भारताने १६ डिसेंबर १९७१ रोजी एकतर्फी युद्धसमाप्तीची घोषणा केली. २८ जून ते २ जुलै १९७२ दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांमध्ये सिमला येथे वाटाघाटी झाल्या. हे ‘सिमला करार’ म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानुसार पूर्वीच्या युद्धबंदी रेषेचे काही बदलांसहित नियंत्रणरेषेत रूपांतर करण्यात आले. भारत आणि पाकिस्तान यांची सैन्यदले या रेषेचे उल्लंघन करणार नाहीत, असा करार करण्यात आला. भारताने आंतरराष्ट्रीय सीमेपार पाकिस्तानचा जिंकलेला १३,३०९ चौ.किमी. प्रदेश आणि ९३,००० युद्धकैदी परत केले, तर पाकिस्तानने ९१६ चौ.किमी. प्रदेश परत केला.

संदर्भ :

  • Haqqani, Husain, Pakistan Between Mosque and Military, Washington, 2005.
  • Krishna Rao, K. V. Prepare of Perish : A Study of National Security, New Delhi, 1991.
  • Palit, D. K. The Lightning Compaign : The Indo-Pakistan War 1971, New Delhi, 1998.
  • पित्रे, शशिकान्त, डोमेल ते कारगिल, पुणे, २०१३.

समीक्षक – सु. र. देशपांडे

#हिल्लीची लढाई

प्रतिक्रिया व्यक्त करा