करिअप्पा, कोदेंदेरा मडप्पा : (२८ जानेवारी १८९९–१५ मे १९९३). स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनाप्रमुख. कर्नाटकातील मरकारा (कूर्ग) येथे जन्म. प्रारंभीचे शिक्षण मरकारा; नंतर प्रेसिडेन्सी कॉलेज मद्रास येथे. पुढे इंदूरच्या डॅली कॉलेजमधून त्यांनी लष्करात कमिशन घेतले. इराक (१९२०-२१), वायव्य सरहद्द प्रांत (१९२२–२५, १९२८–३० व १९४६) येथील लष्करी कारवायांत त्यांनी भाग घेतला. क्वेटा येथील स्टाफ कॉलेजमध्ये प्रवेश मिळविणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते. दुसऱ्या महायुद्धात इराक, सिरिया आणि इराण (१९४१-४२), तसेच ब्रह्मदेशातील आराकान (१९४३-४४) येथील लष्करी मोहिमांत ते सहभागी होते. १९४७ साली लंडनच्या इंपीरियल डिफेन्स कॉलेजमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले. स्वंतत्र भारतात सेनाप्रमुख म्हणून १९४९–५३ या काळात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी लीजन ऑफ मेरिट, डिग्री ऑफ चीफ कमांडर इ. पुरस्कार त्यांना दिले. नेपाळच्या राजाने आपल्या लष्करात मानसेवी जनरलचा हुद्दाही त्यांना दिला होता (१९५२). सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथील भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले (१९५३–५६). अनेक क्रीडासंस्था आणि निवृत्त सैनिकांच्या संस्था यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते.
त्यांचे बंगळुरू येथे निधन झाले.