ताजिकिस्तानमधील तसेच पामीरच्या पठारावरील सर्वोच्च शिखर. स्टालिन शिखर किंवा गार्मो या नावांनीही हे शिखर ओळखले जाते. उंची ७,४९५ मी. पामीर आलाय पर्वतसंहतीमधील अकादेमिया नाउक व पीटर द फर्स्ट या दोन पर्वतश्रेण्या ज्या भागात एकत्र येतात, त्या भागात हे शिखर आहे. अतिशय बिकट भौगोलिक परिस्थिती असलेल्या या पर्वतीय प्रदेशाविषयी १९३० पर्यंत विशेष माहिती उपलब्ध नव्हती. त्यानंतर रशियाने या प्रदेशाचे समन्वेषण करून त्याचा नकाशा तयार करण्यासाठी तसेच तेथील खनिज संपत्तीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा काढायला सुरुवात केली. १९३० मध्ये सुमारे ३०० शास्त्रज्ञांनी प्राथमिक अभ्यास व कामकाज पूर्ण केले. त्याच्या दुसर्याच वर्षी ताजिकिस्तानची एक गिर्यारोहक तुकडी पामीर मोहिमेवर निघाली. कम्युनिझम शिखर सर करून त्यावर वातावरणाच्या घटकांची नोंद करणारी उपकरणे बसविणे आणि स्वयंचलित रेडिओ स्टेशन निर्माण करणे ही जबाबदारी या तुकडीवर सोपविण्यात आली होती. त्यामुळे हे जगातील सर्वाधिक उंचीवरील स्टेशन ठरणार होते. अबोलकॉव्ह व गॉर्बूनॉव्ह हे १९३३ मध्ये कम्युनिझम शिखर चढून गेले. या मोहिमेपूर्वी मौंट लेनिन किंवा कौफमान (उंची ७,१३४ मी.) हे तत्कालिन सोव्हिएट युनियनमधील सर्वोच्च शिखर मानले जाई. रशियाने काढलेल्या वेगवेगळ्या पामीर मोहिमांपैकी काहींचा उद्देश वैज्ञानिक विकासाशी संबंधित होता, तर काहींचा केवळ गिर्यारोहण हाच होता. या प्रदेशात अनेक हिमनद्या आढळतात.
समीक्षक : माधव चौंडे