स्वित्झर्लंडमधील बर्नीज आल्प्स या निसर्गसुंदर पर्वतश्रेणीतील एक प्रसिद्ध शिखर. या शिखराची उंची ४,१५८ मी. आहे. या शिखराच्या उत्तरेस बर्न कँटन, तर दक्षिणेस व्हॅले (व्हालस) कँटन आहे. वायव्येकडील इंटरलाकन आणि आग्नेयीकडील फीश या दोन नगरांच्या मध्यावर हे शिखर स्थित आहे. बर्नीज पर्वतरांगेतच फिन्स्टरारहॉर्न (४,१९५ मी.) आणि आलिचहॉर्न (४,२७४ मी.) ही युंगफ्राऊपेक्षा अधिक उंचीची दोन शिखरे आहेत.

योहान रूडॉल्फ आणि हायारॉनमस मायर या दोन स्विस बंधूंनी इ. स. १८११ मध्ये पूर्वेकडून व्हॅलेच्या बाजूने हे शिखर सर केले. त्यानंतर इ. स. १८६५ मध्ये दोन इंग्रज गिर्यारोहकांनी पहिल्यांदाच कठीण अशा पश्चिमेकडील इंटरलाकन बाजूने हे शिखर सर केले. पुढे इ. स. १९२७ मध्ये दोन वाटाड्यांनी दक्षिणेच्या बाजूने ते सर केले. इ. स. १८९६ ते १९१२ या कालावधीत आयगर आणि मंक या शिखरांच्या खालून ७ किमी. लांबीचा युंगफ्राऊ बोगदा काढण्यात आला. हा बोगदा मंक आणि युंगफ्राऊ शिखरांच्या दरम्यान सस. पासून ३,४५५ मी. उंचीवर असून तो यूरोपातील सर्वाधिक उंचीच्या लोहमार्ग बोगद्यांपैकी एक आहे. आयगर आणि मंक शिखरांसह युंगफ्राऊ शिखराने बर्न कँटनचा अधिक उंचीचा बर्नीज ओबरलँड प्रदेश आणि स्विस पठारी प्रदेश यांच्या दरम्यान पर्वतांची एक भक्कम भिंत निर्माण केली आहे.

बर्न कँटनमधील उच्चभूमी प्रदेश, आलिच हिमनदी आणि युंगफ्राऊ-आलिच प्रदेश यांचा २००१ मध्ये जागतिक वारसास्थळांत समावेश करण्यात आला आहे. युंगफ्राऊ हा आल्प्समधील पर्यटनाच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध असलेला प्रदेश आहे.

समीक्षक : नामदेव स. गाडे