अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पश्चिम भागातील कॅस्केड पर्वतश्रेणीतील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर. याची उंची स. स.पासून ३,४२५ मी. आहे. ऑरेगन राज्याच्या उत्तर भागात क्लॅकमस आणि हूड रिव्हर परगण्यांच्या सरहद्दीदरम्यान हे शिखर आहे. हा एक मृत ज्वालामुखी असून त्याच्या शेवटच्या उद्रेकाची नोंद इ. स. १८६५ मधील आहे. त्यानंतर १९०३ मध्ये काही छोट्याछोट्या निर्गम द्वारांमधून गौण स्वरूपात वाफ आणि राख बाहेर येत होती. पाच ते सात लाख वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीउद्रेकांमुळे या शिखराची निर्मिती सुरू झाली होती. येथे हिमवादळ-पूर, भूकंप नियमितपणे होतात. ब्रिटिश मार्गनिर्देशक व नौसेना अधिकारी विल्यम ब्रॉटन याने पहिल्यांदा १७९२ मध्ये हे ज्वालामुखी शिखर पाहिले आणि ब्रिटिश नौसेनाधिपती लॉर्ड सॅम्युएल हूड याच्या नावावरून या शिखराला हूड हे नाव दिले.

हूड हा एक सुंदर हिमाच्छादित ज्वालामुखी-शंकू असून त्याच्या सभोवती मौंट हूड राष्ट्रीय अरण्य आहे. शिखरावरून बारा हिमनद्या वाहत असून पाच नद्यांचा उगम येथून होतो. स्कीइंग या बर्फावरील खेळासाठी तसेच बर्फारोहण व हिमारोहणासाठी हे शिखर विशेष प्रसिद्ध आहे. निसर्गसुंदर शिखर आणि सभोवतालचा अरण्यमय प्रदेश यांमुळे पर्यटन आणि मनोरंजनाच्या दृष्टीने या शिखराला विशेष महत्त्व आहे. अधिक उंचीच्या भागात वार्षिक सरासरी वर्षण सु. १५० ते २०० सेंमी असून ते प्रामुख्याने हिमाच्या स्वरूपात असते. येथील कमी उंचीच्या उतारांवर फर, स्फ्रूस, सीडार, हेमलॉक इत्यादी वृक्षांची दाट वने आहेत. परिसरात सफरचंदाच्या बागाही आढळतात.

समीक्षक संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा