श्रेणिसत्ताक राज्य : प्रादेशिक सीमांऐवजी कार्यिक उद्योगधंद्याप्रीत्यर्थ संघटित झालेली राज्यसंस्था. अशा राज्यात मालक आणि कामगार (कर्मचारी) परस्परांच्या कार्यक्षेत्रात महामंडळे, व्यवसायसंघ किंवा श्रेणी यांच्या माध्यमांतून (व्दारे) संघटित होतात आणि त्या क्षेत्रातील व्यवहार नियमित करतात. श्रेणिसत्ताक राज्य ही संकल्पना फॅसिझमच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक असून तिचा विकास इटलीमध्ये बेनीतो मुसोलिनी च्या राजवटीत (१९२२-४५) झाला तथापि श्रेणिसत्ताक ह्या संकल्पनेचा संदर्भ प्लेटोच्या रिपब्लिक या गंथात आढळतो. शिवाय मध्ययुगीन यूरोपीय समाजाच्या कार्यिक उद्योगधंद्यातून त्याचे काही दाखले मिळतात; मात्र इटलीतील फॅसिझमच्या राजवटीत मध्ययुगीन श्रेणिसत्ताकातील स्वायत्ततेऐवजी सर्व काही मध्यवर्ती अधिकारीतंत्राच्या अखत्यारीत ठेवण्याची पद्धती प्रचारात आली. परिणामतः १९३९ मध्ये फॅसिमंडळ आणि महामंडळांनी विधिमंडळ वा प्रतिनिधिमंडळाची (चेम्बर ऑफ डेप्युटीज) जागा घेतली. श्रेणिसत्ताक राज्यपद्धतीला ‘ प्रमंडलात्मक राज्यपद्धती ’ असेही म्हटले जाते. ही संकल्पना दोन गृहीतांवर आधारलेली आहे : (१) राजकीय व्यवहार आणि समस्या अत्यंत गुंतागुंतीच्या असल्यामुळे, त्या सामान्य व्यक्तींना किंवा नागरिकांना समजत नाहीत. तसेच त्यांना आपले हित कशात आहे, हेदेखील समजत नाही. (२) परंतु व्यक्ती जे कार्य किंवा व्यवसाय करीत असेल, त्या व्यवसायाच्या संघटनांना तिच्या हिताचे आकलनही होते व त्या हिताचे संरक्षणही योग्य पद्धतीने करता येते म्हणून नागरिकांनी प्रातिनिधिक संस्थांतर्फे राज्यकारभारात भाग घेण्याऐवजी आपल्या व्यवसायसंघांच्या माध्यमातून राज्यकारभार करावा.
श्रेणिसत्ताक राज्यामध्ये सत्ता ही व्यक्तीच्या हाती न राहता, ती व्यवसायसंघातील नेते किंवा श्रेष्ठिजनांच्या हाती असते. तेच वास्तविक शासक असतात कारण त्यांना सर्व समाजाशी निगडित अशा समस्यांचे आकलन होते व म्हणून राज्यकारभार करण्यास हा अल्पसंख्य शासकांचा वर्गच पात्र असतो, अशी धारणा असते. श्रेणिसत्ताक राज्याची इतर वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) राज्याची सत्ता राज्यातील विविध व्यावसायिक संघांच्या श्रेष्ठिजनांच्या हाती एकवटलेली असते. (२) राज्य हे आपल्या कक्षेतील विविध व्यावसायिक प्रमंडलांचे प्रतिनिधित्व करते. (३) राज्यातील शासकीय व्यवस्था व्यक्ती किंवा नागरिकांऐवजी राज्यातील विविध व्यावसायिक प्रमंडलांना/संघांना जबाबदार असते. (४) व्यक्ती या आपल्या व्यावसायिक प्रमंडलाच्या कार्यात्मक घटक असतात. (५) ही व्यावसायिक प्रमंडले स्वायत्त असतात. (६) व्यावसायिक प्रमंडले मध्यवर्ती सत्ता आणि जनता यांच्यातील मध्यस्थ म्हणून कार्य करीत असतात.
पहिल्या महायुद्धानंतर इटलीची सत्ता हस्तगत केल्यावर राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याचे फार मोठे आव्हान मुसोलिनीपुढे होते. सर्वंकष राज्यपद्धती हा त्याचा आदर्श होता आणि विस्तारवादी साम्राज्यवाद ही त्याच्या पक्षाची प्रेरणा व धोरण होते. आर्थिक आघाडीवर त्या काळी प्रस्थापित होत असलेल्या मुक्त भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही विचारप्रणालींना मुसोलिनीचा विरोध होता. त्यामुळे इटलीची आर्थिक पुनर्रचना या दोहोंपेक्षा वेगळ्या तत्त्वांच्या आधारे उभारण्याच्या दृष्टीने मुसोलिनीने श्रेणिसत्ताक राज्यपद्धतीचा हिरिरीने पुरस्कार केला.
इटलीमध्ये स्वायत्त प्रमंडलांची परंपरा होती. त्यामुळे श्रेणिसत्ताक राज्याची संकल्पना विकसित करून राबविणे तेथे शक्य झाले. एक पक्ष, सर्वंकष राज्यव्यवस्था आणि विशिष्ट ध्येयाने प्रेरित असा समाज असेल तेथे ही पद्धत यशस्वी होते, अशी मुसोलिनीची धारणा होती आणि या सर्व गोष्टी इटलीत होत्या. आर्थिक जीवनाचे कामगार, उत्पादक आणि व्यावसायिक असे विभाग कल्पून त्यांचे व्यावसायिक संघ राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक अशा पातळ्यांवर इटलीत स्थापन करण्यात आले. यांतून प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रातील संघटनांना एकाच प्रशासकीय यंत्रणेखाली (प्रमंडलाखाली) एकत्र आणण्यात आले. अशा बावीस प्रमंडलांच्या नियामक मंडळांनी राष्ट्रीय विधिमंडळाची जागा घेतली. तत्त्वतः या संघटना स्वायत्त असल्या, तरी प्रत्यक्षात त्यांचा कारभार सरकारकडूनच चालविला जात असे. त्यांचे संचालन मुसोलिनीच्या फॅसिस्ट पक्षाचे राजकारणीच करीत होते. आर्थिक उदारमतवाद नाहीसा करून नियंत्रित आर्थिक जीवन निर्माण करण्याचे साधन या दृष्टीनेच ही पद्धत राबविली गेली. कामगार वर्गावर कडक नियंत्रण ठेवणे, एवढेच तिचे महत्त्व आणि कार्य होते. दुसऱ्या महायुद्धातील मुसोलिनीच्या पाडावानंतर ही पद्धती इटलींत संपुष्टात आली मात्र या प्रणालीचे इतरत्र अनुकरण झाल्याची काही उदाहरणे इतिहासात आढळतात. इटलीच्या धर्तीवर श्रेणिसत्ताक राज्याच्या प्रयोगाचे अनुकरण जर्मनीतील सोशॅलिझम्स लेबर फ्रंट, ऑस्ट्रियातील फॅसिझम हाइमवेहर यांनी तसेच ब्राझीलचा हुकूमशाह झतूल्यू डी. व्हार्गास (१८८३-१९५४) आणि अर्जेंटिनाचा ह्वान पेरॉन (१८९५-१९७४) यांनी केले. पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर पोर्तुगालच्या शासनपद्धतीत अँतान्य द सालाझार (१८८९-१९७०) याने श्रेणिसत्ताक उपपत्तीचा उपयोग केला. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ख्रिश्चन समाजवाद, श्रेणिसमाजवाद आणि सोशल कॅथॉलिसिझम यांसारख्या सुधारणावादी चळवळींनी श्रेणिसत्ताक कल्पना कृतीत आणल्या पण त्यात मुसोलिनीने कार्यवाहीत आणलेली फॅसिस्ट लक्षणे नव्हती.
पहा : फॅसिझम.
संदर्भ :
• Cohen, Youssef, The Manipulation of Consent : The State and Working-Class Consciousness in Brazil, Pittsburgh, 1989.
• Elbow, Matthew H. French Corporative Theory 1789–1948 : A Chapter in the History of Ideas, New York, १९६६.