सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी : ( भारत सेवक समाज ). निरपेक्ष मिशनरी वृत्तीने देशसेवा करण्यासाठी कटिबद्ध असलेली एक पक्षातीत सामाजिक संस्था. तिची स्थापना नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी १२ जून १९०५ रोजी पुणे येथे केली. या संस्थेचे पहिले अध्यक्ष तेच होते. भारत सेवक समाजाच्या कार्यकमपत्रिकेत पुढील गोष्टी नोंदविल्या होत्या : (१) दु:खनिवारण, (२) समाजसेवा, (३) सहकाराचा प्रसार, (४) समाजशिक्षण आणि (५) राजकीय जागृती. या सर्वांसाठी नवा तरूणवर्ग तयार करणे हा समाजाचा प्रमुख हेतू होता. निदान प्रत्येकाने पाच वर्षे समाजात राहून अनुभव घेतल्याखेरीज कोणालाच समाजाचा कायमस्वरूपी सभासद होता येत नसे. संस्थेचा मुख्य उद्देश तरूण भारत सेवकांना प्रशिक्षित करून देशसेवेस प्रवृत्त करणे, हा होता. त्यामुळेच भारत सेवक समाज हे सार्थ नाव त्यास देण्यात आले. नामदार गोखल्यांनी भारत सेवक समाजाची घटना आणि त्या घटनेनुसार आवश्यक ती वर्तननियमावली किंवा आचारसंहिता तयार केली. या घटनेत त्यांनी संस्थेची उद्देशपत्रिका नमूद केली असून तीत पुढील गोष्टी नोंदविल्या आहेत : (१) आपल्या स्वत:च्या उदाहरणाने लोकांत खरीखुरी देशभक्ती उत्पन्न करून तदर्थ स्वार्थत्याग करण्यास प्रवृत्त करणे. (२) लोकांस राजकीय शिक्षण देणे आणि समाजात चळवळ करून देशसेवेस लोक तयार करणे. (३) विभिन्न धर्मांतील व जातिजमातींतील विरोध नष्ट करून त्यांच्यात सलोखा व प्रेमभावना निर्माण करणे. (४) मागासलेल्या मंडळीत – वर्गांत शिक्षणाचा प्रसार करणे, विशेषत: औदयोगिक व धंदे-शिक्षणासंबंधी त्यांना सुसंघटित करण्याचा प्रयत्न करणे. (५) पूर्वास्पृश्यांत सर्वतोपरी सुधारणा करून त्यांचे जीवनमान उंचाविणे. या उद्देशांचे पालन विदयार्थी, सर्वसाधारण सभासद आणि प्रमुख, तसेच संलग्न सभासद यांनी निष्काम कर्मयोगी बनून करावे. प्रत्येक विदयार्थ्यास पाच वर्षे प्रशिक्षण दयावे. तीन सभासदांच्या सल्लागार मंडळाच्या शिफारशीने कोणालाही सभासद होता येई; मात्र प्रवेश घेण्यापूर्वी सभासदास पुढील शपथ घ्यावी लागे, ‘‘ माझ्या डोळ्यापुढे सदैव देशाच्या कल्याणाची गोष्ट प्रथम राहील, माझ्यामध्ये जे काही उत्कट, भव्य आहे, ते सर्व मी आपल्या देशाच्या सेवेस अर्पण करीन, देशसेवा करताना स्वार्थलोलुपता मनात येऊ देणार नाही. सर्व हिंदुवासीयांना मी भाऊ मानेन व सर्वांच्या उन्नतीसाठी पंथ, जाती वगैरे भेद बाजूस ठेवून मी प्रयत्न करीन. माझ्या किंवा माझ्या कुटुंबासाठी संस्था जे काही देईल, त्यातच मी आनंद व समाधान मानेन. स्वत:साठी त्याहून अधिक पैसा मिळविण्याच्या भरीस पडणार नाही. मी माझे व्यक्तिगत आचरण-चारित्र्य पवित्र व स्वच्छ ठेवीन. मी कोणाही बरोबर खासगी, व्यक्तिगत पातळीवर संघर्ष वा भांडण करणार नाही. भारत सेवक समाजाचे ध्येय मी सदैव डोळ्यापुढे ठेवीन. शक्य तितक्या आस्थेने व उत्कटतेने मी समाजाच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न करीन. समाजास अहितकारक असे काहीही मी करणार नाही.’’

विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली होती आणि देश प्रगतिपथावर होता, ही गोष्ट गो. कृ. गोखले यांना मान्य होती. धर्मातीत राष्ट्रवादाची भावना दृढतर करणे आवश्यक आहे. त्याकरिता निरलस बुद्घीने देशसेवा करणाऱ्या तरूणांची देशाला नितांत गरज आहे आणि अशा तरूणांना आपल्या देशाची आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती आणि तदनुषंगिक समस्या यांची पूर्ण माहिती असली पाहिजे. आपला समाज स्वायत्ततेचा उपभोग घेण्यास लायक बनवावयाचा असल्यास नि:स्वार्थ अशा समाजसेवकांची एक संस्था अपरिहार्य आहे. समाजाचे अंतर्बाह्य स्वरूप बदलल्याखेरीज तो स्वातंत्र्याला पात्र होणार नाही. हे जाणून गोखल्यांनी या संस्थेची स्थापना केली. त्यावेळच्या समाजाची राजकीय भूमिका नेमस्त पण प्रागतिक होती. इंग्रजांशी असलेले भारताचे संबंध भारताच्या भल्यासाठीच आहेत, असे समजून सनदशीर मार्गाने वसाहतीच्या अंतर्गत स्वराज्य मिळविण्यासाठीच प्रयत्न करावे, समाजसुधारण्यासाठी समाजाने प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे उदयोगधंदयांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी भारत सेवकांनी मदत करावी, असे गोखल्यांचे मत होते. तात्पर्य भारताच्या आधुनिकीकरणास आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची तयारी नि:स्वार्थी भारत सेवकांनी करावी, हे संस्थेचे मुख्य ध्येय होते. त्यामुळेच संस्थेची घटना तयार करताना शिस्त, नि:स्वार्थीपणा, साधी राहणी आणि सेवाभाव यांवर अधिक भर देण्यात आला होता.

सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे उद्‌घाटन शि. ह. साठे यांनी केले आणि त्यासमयी गो. कृ. गोखले यांनी गो. कृ. देवधर, अ. वि. पटवर्धन व नरेश अप्पाजी द्रविड यांना भारत सेवाव्रताची शपथ देवविली. गोखल्यांच्या स्नेहल चाहत्यांनी सढळ हातांनी या संस्थेस मदत केली. संस्था स्थापन झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी तरूणांसाठी सुसज्ज असे ग्रंथालय गोखल्यांनी उभे केले. इमारती, सभासदांना निवासासाठी जागा, छापखाना आणि वृत्तपत्रे काढली. सातारच्या रावबहादूर, रा. रा. काळे यांनी पुण्याच्या मुख्य कार्यालयात गोखल्यांच्या स्मरणार्थ १९३० मध्ये भारतातील अर्थशास्त्रविषयक प्रश्नांबद्दल संशोधन करणारी गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (गोखले अर्थशास्त्र संस्था) ही संशोधन संस्था आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. सामाजिक-आर्थिक प्रश्नांच्या मूलगामी संशोधन -अभ्यासाबरोबरच या संस्थेत जुलै १९७२ पासून पुणे विद्यापीठाचे एक पदव्युत्तर अभ्यास केंद्र सुरू झाले.

गोखल्यांनी आपल्या अखेरच्या दहा वर्षांत जवळजवळ चोवीस लोकांना भारतसेवेची शपथ देवविली. तेथील बौद्धिक कार्यकमांत-विशेषत: चर्चासत्रे, निबंधवाचन आणि वादविवाद यामध्ये ते स्वत: सहभागी होत. संस्थेच्या मुंबई, नागपूर, चेन्नई ( मद्रास ) व अलाहाबाद येथे शाखा निघाल्या.

भारत सेवक समाजाच्या सभासदांनी आदिवासी आणि स्त्रिया यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या आर्थिक विवंचना सोडविण्यास सहकारी पतपेढयांव्दारे मदत केली. पूर, दुष्काळ, रोगांच्या साथी, भूकंप इ. नैसर्गिक आपत्तींत रंजल्या-गांजलेल्या जनतेची नम्रपणे सेवा केली. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. गोरगरिबांच्या नित्य जीवनातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.नामदार श्रीनिवासशास्त्री, ठक्करबाप्पा, ना. म. जोशी, गो. कृ. देवधर, श्री. ग. वझे, न. अ. द्रविड, हृदयनाथ कुंझरू, कोडाप्पाराव, ए. डी. मणी प्रभृती दिग्गज भारत सेवकांची नामावळी पाहता, त्यांच्या समोर आदराने कुणाचीही मान लवावी. महात्मा गांधीजींनीही भारत सेवक समाजाचे अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आधुनिक भारताच्या जडणघडणीत या संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

संदर्भ :

  • Devadhar, G. K., Servants of India Society, Poona, 1914.
  • Mathur, D. B., Gokhale : A Political Biography, Bombay, 1966.
  • गोखले, पु. पां., नामदार गोपाळ कृष्ण गोखले, पुणे, १९६६.
  • फाटक, न. र., आदर्श भारतसेवक, मुंबई, १९६७.