मुखर्जी, मीरा : (? १९२३ – ? १९९८). सुविख्यात भारतीय शिल्पकार व लेखिका. भारतीय कारागिरी आणि अभिजात शिल्पकला यांचा मेळ घालून आधुनिक वळण देणारी कलाकार. त्यांचा जन्म कलकत्ता (सध्याचे कोलकाता) येथे द्विजेंद्रमोहन मुखर्जी आणि बिनापानी देवी यांच्या पोटी झाला. अवनींद्रनाथ टागोर (ठाकूर) यांच्या इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टमध्ये त्यांच्या कलाशिक्षणाला सुरुवात झाली. त्यांना कालीपाद घोषाल हे कलाशिक्षक म्हणून लाभले.
कालीपाद घोषाल हे अवनींद्रनाथ टागोर या कलापरंपरेतील होते. तसेच शिल्पकलाशिक्षणासाठी गिरिधारी व महेश्वर महापात्रा हे पारंपरिक कारागीर शिक्षक म्हणून लाभले. या शिक्षणामध्येच त्यांना हस्तकला आणि कला यांत भेद नसतो, याची जाणीव झाली. १९४१ साली विवाह होईपर्यंत त्या तिथे होत्या; परंतु दुर्दैवाने हा विवाह फार काळ टिकला नाही. घटस्फोटानंतर त्या शांतिनिकेतनमध्ये एका इंडोनेशियन कलाकाराच्या समवेत काम करू लागल्या. पुढे १९५१ मध्ये दिल्लीच्या पॉलिटेक्निक विद्यालयातून चित्रकला, आलेखिकी (ग्राफिक्स) आणि शिल्पकला या विषयांत त्यांनी पदविका प्राप्त केली. सुरुवातीच्या काळात कलकत्ता येथे झालेले पारंपरिक कलाशिक्षण आणि नंतरच्या काळात पॉलिटेक्निक विद्यालयातील पाश्चात्त्य पद्धतीचे कलाशिक्षण यांमुळे मीरा यांच्या शैक्षणिक ज्ञानाचा पाया पक्का झाला; परंतु कलेकडे पाहण्याची कलाविषयक अंतर्दृष्टी आपणास प्राप्त झाली नाही, याची खंत त्यांना वाटू लागली.

१९५३ मध्ये शिष्यवृत्ती मिळवून जर्मनीतील म्यूनिक येथे शिल्पकलेतील पुढील शिक्षणासाठी त्या गेल्या. तेथे टोनी स्टेड्लर या जर्मन शिक्षकाच्या हाताखाली मानवाकृतीचे यथार्थ पद्धतीचे शिल्पघडणीचे काम त्या शिकल्या. १९५६ मध्ये त्या भारतात परतल्या. त्यानंतर त्यांनी १९५९ पर्यंत पश्चिम बंगालमधील कुर्सेओंग येथील दोव्हिल्ल विद्यालयामध्ये कलाशिक्षिकेची नोकरी केली. मानववंशशास्त्रज्ञ डॉ. सुरजित सिन्हा यांच्या प्रोत्साहनाने मध्य प्रदेशातील बस्तर येथील चित्रकलापरंपरेचा अभ्यास करण्यासाठी त्या तेथे गेल्या. अँथ्रपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियातर्फे मीरा यांना त्यांच्या संशोधनाबद्दल अधिछात्रवृत्ती मिळाली (१९६२). मध्य प्रदेश आणि नेपाळ येथील धातुकाम करणारे कारागीर व त्यांची कारागिरी या शोधप्रकल्पावर त्यांनी काम केले. मेटल क्राफ्ट्समेन ऑफ इंडिया (१९७८) या नावाने त्यांचा तो शोधप्रकल्प प्रकाशित झाला. १९९४ मध्ये इन सर्च ऑफ विश्वकर्मा हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. कारागिरांची कारागिरी समजून घ्यावयाची असेल, तर लोकपरंपरेचे प्रादेशिक भूमीशी असलेले नाते आधी समजून घेतले पाहिजे, असे मीरा यांचे मत होते. विश्वकर्मा म्हणजे कारागीर आणि सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मा म्हणजेही कारागीरच होय, असा उलगडा त्यांनी केला. तसेच कारागीर आणि प्राचीन शहरे, ऐतिहासिक स्थळे, तीर्थस्थळे यांचा सहसंबंध त्यांनी आपल्या लेखनातून स्पष्ट केला आहे.

एकीकडे असे संशोधनपर काम आणि लेखन चालू असतानाच बस्तरच्या कारागिरांकडून त्यांना ओतकामाचे ज्ञान मिळाले. जर्मनीमधील शिक्षण आणि बस्तरच्या कारागिरांकडून मिळालेला अनुभव यांआधारे त्यांनी शिल्पकलेसाठी नवनवे प्रयोग केले व ते विकसित केले. आधुनिक तंत्र व कल्पनाशक्ती यांची जोड देऊन त्यांनी काही शिल्पे तयार केली. मीरा यांनी आपल्या शिल्पकलेसाठी ढोकरा शैली (lost wax) वापरली. आधी मेणाचे शिल्प तयार करून त्यावर मातीचा थर द्यायचा, त्यानंतर मातीच्या थराला भोक पाडून त्यात धातूचे रसायन ओतले, की आतले मेण वितळते व धातू शिल्पाचा आकार घेतो. वरील मातीचा थर तोडला की, शिल्पाच्या तयार आकारावर वरून थोडे काम केल्यास शिल्प पूर्ण तयार होते. मीरा यांच्यावर ग्रामीण जीवनाचा प्रभाव असल्याने त्यांच्या शिल्पांचे विषयही साधे होते. उदा., कामगार स्त्री–पुरुष, शेतकरी, विणकर, कोळी, नावाडी, दूधवाला, बसमधील माणसे, गायक, नर्तक इत्यादी. भारतीय प्राचीन-अर्वाचीन परंपरेचा त्यांनी सखोल अभ्यास केल्याने त्यांच्या शिल्पांमध्ये मिथकांचा वापरही दिसतो. उदा., वाल्मीकी, गंगा, नटराज इत्यादी. त्याचप्रमाणे त्यांनी ऐतिहासिक राजे, घटना यांचा विषय म्हणून उपयोग केल्याचे दिसते. उदा., अशोका ॲट कलिंग, हिरोशिमा इत्यादी. मीरा यांनी एकेरी आणि समूहशिल्पे साकारली. वाल्मीकी, अशोका ॲट कलिंग, लेडी विथ सलूक फ्लॉवर, कथ्थक डान्सर आणि कॉस्मिक डान्स ही त्यांची काही एकेरी शिल्पे; तर बनारस घाट, हेवन टू अर्थ, कार्पेट विव्हर्स, मिनीबस ही काही समूहशिल्पे होत. भारतात व परदेशात त्यांनी आपल्या शिल्पांची प्रदर्शनेही भरविली.

मीरा यांनी कारागिरी हेच कलेचे उगमस्थान मानले. लोककलेमध्ये व्यक्तिनिष्ठता नसून समूहनिष्ठता असते, या सामूहिक जाणिवेचा आविष्कार अधिक परिणामकारक ठरतो. त्यामुळेच मीरा यांची शिल्पे परंपरा आणि नवता, इतिहास आणि वर्तमान, सामान्य जनजीवन ते त्यांतील तत्त्वचिंतन यांचा अचूक परिणाम साधताना दिसून येतात. मीरा यांना मास्टर क्राफ्ट्समन (१९६८), तसेच पद्मश्री (१९९२) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनी मुलांकरिता कालो अँड द कोयल (१९९८), कॅचिंग फिश (१९९८), लिटल फ्लॉवर शेफाली अँड अदर स्टोरीज (१९९८) या पुस्तकांचे लेखन केले.
नरेंद्रपूर (प. बंगाल) येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- घारे, दीपक, प्रतिभावंत शिल्पकार, मुंबई, २०१७.
समीक्षक – मनीषा पाटील
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.