उपनिषदातील एक विद्या. जी विद्या जाणल्यानंतर जाणणाऱ्याला पृथ्वीवरील मृत्यूनंतर जीव कुठे जातात, ते पुन्हा कसे काय पृथ्वीवर जन्म घेतात इत्यादी गूढतम प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे मिळतात, त्या उपनिषदांतील विद्येला पंचाग्निविद्या असे म्हणतात.

छांदोग्योपनिषदातील पाचव्या अध्यायातील तृतीय खंडापासून ते दहाव्या खंडापर्यंत पंचाग्निविद्येतील महत्त्वाचा सिद्धांत गोष्टीरूपाने सांगितलेला आहे. हीच कथा आणि हाच सिद्धांत बृहदारण्यकोपनिषदातील सहाव्या अध्यायातदेखील वर्णिलेला आहे. पृथ्वीतलावर मानवाने देहत्याग केल्यानंतर तो पुन्हा जन्म घेईपर्यंत त्याच्या आत्म्याचा कोठून कुठे आणि कसा कसा प्रवास होतो, याबद्दलचा सिद्धांत या कथेतून, सिद्धान्ताला सर्वोच्च महत्व देऊन, कथित केलेला आहे. त्या काळात यज्ञाचे प्राबल्य असल्यामुळे यज्ञाचे रूपक घेऊन ही पंचाग्निविद्या सांगितलेली आहे.

महर्षी आरुणी गौतम यांचा मुलगा श्वेतकेतू आपल्या घरी वडिलांकडून सर्व प्रकारचे ज्ञान घेतो आणि त्यानंतर पांचाल देशाच्या राजसभेत जातो. तेथे राजा प्रवाहण जैवली त्याला पाच प्रश्न विचारतो. ते प्रश्न अत्यंत गहन अशा पंचाग्निविद्येवर आधारित असतात. श्वेतकेतूच्या वडिलांना ती विद्या अवगत नसल्यामुळे श्वेतकेतूला ती उत्तरे देता येत नाहीत. त्यामुळे तो शरमिंदा होतो, चिडतो, वडिलांकडे परत जातो आणि त्यांना जणू जाब विचारतो.

आरुणी गौतमांना खरेच ती विद्या माहीत नसते. त्यामुळे ते त्याला तसे सांगतात आणि मनात कोणतीही अढी किंवा भीड (भीती, संकोच) न बाळगता हातात समिधा घेऊन राजा प्रवाहण जैवलीकडे जातात. त्या काळात हातात समिधा घेऊन गुरूकडे जाणे याचा अर्थ त्या त्या गुरूचे शिष्यत्व स्वीकारणे असा असायचा. ती विद्या त्या काळात फक्त क्षत्रियांनाच अवगत असे. क्षत्रियांनी ती ब्राह्मणांना शिकवावी की नाही, हा प्रश्न त्या ज्ञानी राजाला पडतो. पण हातात समिधा घेऊन म्हणजे शरण जाऊन एखादी व्यक्ती शिष्यत्व स्वत: होऊन स्वीकारत असेल, तर विद्येपासून त्या व्यक्तीला वंचित ठेवू नये, असाही त्या काळात संकेत असल्यामुळे राजा प्रवाहण जैवली ती विद्या त्याला सांगतो. पिता–पुत्रांना त्या पाच प्रश्नांची उत्तरे मिळतात.

राजा प्रवाहण जैवलीने श्वेतकेतूला विचारलेले पाच गहन प्रश्न व श्वेतकेतूने त्या प्रश्नांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे :

१) पृथ्वीतलावरील प्रजा मृत्यूनंतर नेमकी कुठे जाते?

उत्तर : पृथ्वीतलावरील प्रजा मृत्यूनंतर अंतरिक्षात म्हणजे द्यूलोकात जाते.

२) प्रजा मृत्यूलोकात परत कशी येते?

उत्तर : पंचाग्नी सिद्धांतानुसार पाच टप्प्यांतून प्रजेचा (मानवांचा) पुन्हा जन्म होतो.

३) देवयान व पितृयान हे मार्ग कुठल्या स्थानापासून वेगळे होतात?

उत्तर : संवत्सराच्या अयनापर्यंत हे दोन्ही मार्ग जवळजवळ आहेत. पण त्या स्थानानंतर ते वेगवेगळे होतात.

४) सर्वजण जर मृत्यूनंतर पितृलोकात जात असतील, तर तो लोक ओसंडून कसा जात नाही?

उत्तर : मृत्यूनंतर काहीजण देवयान मार्ग किंवा पितृयान मार्ग (धूम्रयान मार्ग) यातील कुठल्याच मार्गाने पुढे पुढे जात नाहीत. पुनःपुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात सापडतात. म्हणून परलोक ओसंडून जात नाही.

५) पाचव्या आहुतीला ‘आप’ हा (घटक) ‘पुरुष’ कसा बनतो?

उत्तर : या प्रश्नाचे उत्तर जाणण्यासाठी प्रथम आकाशात ‘यज्ञ’ चालू आहे, असे समजणे आवश्यक आहे. पृथ्वीतलावरील प्रजा मृत्यूनंतर द्यूलोकात गेलेली असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आकाशातल्या अग्नीत देव हे ‘श्रद्धेची’ म्हणजे ‘सूक्ष्म जलाची’ आहुती देतात. पाऊस हा जर यज्ञातील अग्नी मानला, तर ‘मूळ विशुद्ध सूक्ष्म जल’ हे ‘सोम’ बनते. नंतर त्याचाच वर्षाऋतूत वर्षाव होतो. पुढे या पर्जन्यातूनच अन्नाची निर्मिती होते (पावसाच्या पाण्याशिवाय अन्नधान्याची निर्मिती होऊ शकत नाही). अन्न सेवन केल्यानंतर पुरुष-शरीरात सप्त धातू निर्माण होतात. रेत/वीर्य हे या सप्त धातूंपैकी एक होत. याद्वारे नवीन जन्म-संभव शक्य असतो. हे रेत/वीर्य जेव्हा स्त्री-शरीरात प्रवेश करते, तेव्हा गर्भ तयार होतो. अशाप्रकारे पाचव्या यज्ञातील पाचव्या आहुतीला ‘आप’ (श्रद्धारूपी जल) हा (घटक) ‘पुरुष’ (मानव) बनतो.

पंचाग्निविद्या हे पाच यज्ञांचे रूपक आहे. या विद्येच्या माध्यमातून जो परमात्म्याला जाणतो, तो मुक्त होतो, असे वर्णन छांदोग्योपनिषदात आले आहे.

त्या काळात यज्ञाचे प्राबल्य असल्यामुळे यज्ञाचे रूपक घेऊन ही विद्या सांगितलेली आहे. आजच्या संशोधनीय भाषेत हा एक सिद्धांतच आहे; कारण यात एक निश्चित असा क्रम आहे. त्यातून निश्चित केलेला नियम आहे. त्या काळात अशा गूढ असलेल्या सिद्धांताला ‘विद्या’ म्हणत असत.

प्रत्येक यज्ञामध्ये एक अग्निकुंड असते. आहवनीय अग्नी असतो. त्यात घालायला समिधा लागतात. त्यांचे हवन केल्यावर धूर निघतो, ज्वाला निघतात. निखारे असतात, ठिणग्या निघतात. हे ध्यानात घेऊन हे यज्ञाचे रूपक रचलेले आहे.

अग्निकुंड

आहवनीय अग्नी समिधा धूर ज्वाला

 

निखारा ठिणग्या
अंतरिक्ष (द्यूलोक) आदित्य सूर्य किरणे दिवस चंद्र नक्षत्र
पर्जन्य वायू ढग वीज वज्र मेघ-गर्जना
पृथिवी संवत्सर आकाश रात्र दिशा अवांतर दिशा
पुरुष वाणी प्राण जीभ चक्षू कान/श्रोत्र
स्त्री (योषा) पुरुष उपस्थ अनुनय योनी सिंचन क्षणिक सुख

अशाप्रकारे द्यूलोक, पर्जन्य, पृथ्वी, पुरुष, स्त्री, या पाच आहवनीय अग्नींमध्ये त्या त्या समिधांचे हवन केल्यानंतर धूर, ज्वाला, निखारा आणि ठिणग्या यांचे अस्तित्व दिसून येते. हे   ‘यज्ञाचे पद्धतीशास्त्र’ आहे. हा सर्व अर्थ ‘रूपक’ म्हणून समजून घ्यायचा आहे. जीव-निर्मितीची वैश्विक क्रिया-प्रक्रिया हाच एक जणू यज्ञ आहे. जन्म-मृत्यूचे रहस्य यामध्ये सामावलेले आहे. असेही सूचित केले आहे की, ‘एका जीवाचा जन्म’ ही देव आणि त्याने निर्माण केलेला निसर्ग यांनी घडवून आणलेली वैश्विक प्रक्रिया असते.

हा विषय अनुभवनिष्ठ संशोधनाचा विषय नाही. पण हिंदू धर्मातील पुनर्जन्म सिद्धांतावर  आधारित मानवी जन्म-मृत्यू-जन्म या प्रक्रियेची सविस्तर मांडणी या पंचाग्नीविद्येच्या अनुषंगाने छांदोग्योपनिषदात आणि बृहदारण्यकोपनिषदात मांडलेली दिसून येते.

संदर्भ :

  • फडके, पुरुषोत्तमशास्त्री; दुनाखे, अंशुमती, सार्थ छांदोग्य उपनिषद, पुणे, २०१४.
  • रानडे, रा. द.; अनु. गजेंद्रगडकर, कृ. वें. उपनिषद रहस्य, विजापूर, २००३.

                                                                                                                                                                         समीक्षक : कांचन मांडे