कुमार गंधर्व : (८ एप्रिल १९२४ – १२ जानेवारी १९९२). एक सर्जनशील थोर संगीतकार व समर्थ गायक. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकाळी (कोमकाली) असून ‘कुमार गंधर्व’ ही पदवी ते सात वर्षांचे असताना गुरुकल्ल मठाचे शांतिवीरस्वामी यांनी त्यांना त्यांच्या विलक्षण गायकीबद्दल दिली. त्यानंतर ते जनमानसात कुमार गंधर्व या नावाने ख्यातकीर्त झाले.
कुमारांचा जन्म सुळेभावी, जि. बेळगाव (कर्नाटक राज्य) येथे लिंगायत कुटुंबात झाला. त्यांचे औपचारिक शालेय शिक्षण फारसे झाले नाही. कुमारांचे वडील व दोन जेष्ठ भाऊही गायन-वादन करीत असत. जन्मापासून रुजत असलेल्या या संस्कारांमुळे ते वयाच्या पाचव्या वर्षापासूनच गाऊ लागले. त्यावेळी संगीताचे कसलेही शास्त्रीय शिक्षण न घेता केवळ गाणे ऐकून मोठमोठ्या गायकांच्या हुबेहूब नकला मोठ्या तयारीने करत होते. १९३६ साली वडिलांनी त्यांना मुंबईला बी. आर. देवधर यांच्या ‘स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक’ (देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक) ह्या निवासी संगीतसंस्थेत दाखल केले. त्यावेळी कुमार मुंबईतील संगीत परिषदेत त्यांच्या गायकीमुळे चमकले. तेथील वृत्तपत्रे व नियतकालिके यांतून त्यांच्या गाण्याचे कौतुक झाले. ह्या संस्थेत नामवंत उस्ताद-पंडितांच्या गायन-वादनाच्या मैफली होत, त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम सांगीतिक अनुभव मिळत. दैनंदिन कामाची शिस्त, मैफलींत-परिषदांमध्ये करावयाच्या सादरीकरणाचे पूर्वनियोजन अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत. हे सर्व संस्कार आणि देवधरांचे मार्गदर्शन व तालीम कुमार गंधर्वांना लाभली. कुमारांनी संगीताचे प्राथमिक धडे देवधरांच्या गायनशाळेत घेतले असले, तरी त्यांनी आपल्या कलेला एकांगी बनविले नाही. पं. विष्णु नारायण भातखंडे यांच्या हिंदुस्थानी संगीत पद्धती या ग्रंथाचा अभ्यास करून संगीतातील प्रयोग-प्रात्यक्षिकेही केली. उ. सिंदेखाँकडून मध्यलयीत विविध ढंगात बंदिश सादर करण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले. ह्या सर्वांचे परिणामस्वरूप म्हणून १९४६-४७ नंतर त्यांची स्वत:ची गायनशैली आकाराला आली. ओंकारनाथ ठाकूर यांच्या गानपद्धतीची दाट छाया कधीकधी कुमारजींच्या गायनात दिसते, तर कधीकधी ग्वाल्हेर व आग्रा घराण्यांचे मनोहारी दर्शन घडते. ते वरच्या पट्टीत व जोरकसपणे गात असत. समेवरचा त्यांचा स्ट्रोकही जोमदार व हुकमी असे.
‘स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक’ ह्या संस्थेत संगीताचे अध्ययन करीत असताना इतर सहाध्यायींच्या अध्यापनाची जबाबदारीही कुमार गंधर्व सांभाळत. त्याचवेळी त्यांचा परिचय भानुमती कंस या कराचीहून आलेल्या व संगीत शिक्षणाकरिता देवधर स्कूलमध्ये दाखल झालेल्या युवतीशी झाला. त्याची परिणती पुढे त्यांच्या प्रेमविवाहात झाली (१९४७). विवाहानंतर वर्षभरात कुमारांना क्षयरोगाचे निदान झाले. त्यामुळे हे दांम्पत्य कोरड्या हवेत देवास (मध्यप्रदेश) येथे स्थलांतरित झाले. भानुमतींनी चरितार्थासाठी देवास येथील कन्याशाळेत नोकरी करून या श्रेष्ठ कलावंतास जपले. भानुमतीही गायिका होत्या.
आजारपणामुळे पुढची पाच वर्षे कुमारांना गायला सक्त मनाई होती. ती त्यांनी पाळली, पण निराश न होता ह्या काळात रागसंगीताचे अत्यंत सखोल असे अध्ययन करून अनेक नवनवीन राग-रागिणी व अप्रचलित राग प्रकाशात आणून भारतीय संगीतात मोलाची भर टाकली. मालवती, निंदियारी, संजारी, राही, अहिमोहिनी, सिंधुरा, सहेली तोडी, सोहोनी भटियार, गांधी मल्हार, लगन गंधार अशा अनेक रागांची ओळख कुमारांनी रसिकांना करून दिली. हवापालट व शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. १९५२ नंतर ते पुन्हा गाऊ लागले. त्यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, माळवा आदी प्रांतातील माळवी -हिंदी भाषांतील लोकगीतांचा चिकित्सापूर्वक व सूक्ष्म अभ्यास करून ‘गीत-हेमंत’, ‘गीत-वर्षा’, ‘गीत-शिशिर’ इत्यादी कार्यक्रम सादर केले व संगीताला लोकगीतांचा एक नवीनच आयाम दिला. याशिवाय कबीर, सूरदास, मीराबाई यांच्या संतवाणीचा त्रिवेणी संगम यांच्यासारखे कुमारांनी संगीतात गीतांना नवीन चाली देऊन केलेले प्रयोग त्यांच्या उपजत प्रतिभेचे निदर्शक होत. देवासच्या वास्तव्यात त्यांनी ‘कुमार संगीत अकादमी’ ची स्थापना केली (१९५९). १९६१ मध्ये भानुमतींचे प्रसूतिसमयी निधन झाले. त्यातूनही सावरून कुमार गंधर्वांनी मैफली सुरू ठेवल्या. १९६२ साली त्यांनी पूर्वाश्रमीच्या वसुंधरा श्रीखंडे ह्या देवधर स्कूलमधील त्यांच्या शिष्येशी विवाह केला. याही पद्मश्री पुरस्कार प्राप्त गायिका होत.
https://www.youtube.com/watch?v=aqfVEDoxvWk
कुमारांनी नव्या-जुन्या रागांत स्वत: बांधलेल्या व बोलीभाषेत रचलेल्या बंदिशींचा अनुपरागविलास या शीर्षकार्थाचा संग्रह प्रकाशित केला (१९६५). शास्त्रीय संगीताबरोबरच ते निरनिराळ्या ऋतूंतील गीतप्रकार ( रागिणी ), थोर संतांची भक्तिगीते, भावगीते, ठुमरी-टप्पा-तराणा असे विविध संगीतप्रकार सादर करीत असत. त्यांच्या गायकीत केवळ गाणेच नसे, तर त्यातून उत्कृष्ट काव्याचा जिवंतपणाही अनुभवास येत असे. घराण्याचे व परंपरेचे जोखड झुगारून देणारा हा अद्वितीय कलावंत आपल्या स्वतंत्र गायकीचा अनभिषिक्त राजा होता. म्हणूनच ‘संगीत सृष्टीतील अद्भुत चमत्कार’ या शब्दांत संगीततज्ज्ञ व रसिकवर्य गोविंदराव टेंबे यांनी त्यांचे यथोचित मूल्यमापन केले.
१९७३ साली विक्रम विश्वविद्यालयाने त्यांना मानद डी.लिट्. ही पदवी प्रदान केली. १९७७ साली त्यांना ‘पद्मभूषण’ व १९९० साली ‘पद्मविभूषण’ हा राष्ट्रीय सन्मान, संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार, मध्यप्रदेश शासनाचा कालिदास पुरस्कार (१९९१) लाभला. त्यांच्या मोजक्या भावगीतांचे व गंधर्वगीतांचे ध्वनिमुद्रण रसिकांसाठी उपलब्ध आहे.
कुमारांची मुकुल, कलापिनी ही दोन मुले व नातू भुवनेश आणि इतर शिष्यपरिवार त्यांचा गानवारसा पुढे नेत आहेत. कुमारांचे अल्पशा आजाराने देवास, मध्यप्रदेश येथे निधन झाले.
संदर्भ :
- कोमकली, कलापिनी; इनामदार-साने, रेखा, संपा., कालजयी कुमार गंधर्व, राजहंस प्रकाशन, २०१५.
- कोल्हापुरे, पंढरीनाथ, संपा. संगोराम, श्रीरंग, गानयोगी शिवपुत्र, राजहंस प्रकाशन, १९९९.
- जोशी, जी. एन्., स्वरगंगेच्या तीरी, पुणे, १९७७.
- मोटे, ह. वि., संकलन, मैफल, पुणे, १९६८.
समीक्षक – सु. र. देशपांडे