डायमंड, पीटर ए. : (२९ एप्रिल १९४०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, अमेरिकन सामाजिक सुरक्षा समितीचे भूतपूर्व सल्लागार व मार्गदर्शक व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. बाजारपेठांच्या विश्लेषणाबद्दलच्या संशोधनासाठी अर्थविषयाचा २०१० मध्ये नोबेल स्मृती पुरस्कार अमेरिकन अर्थतज्ञ सर ख्रिस्तोफर ए. पिसाराइडेज  (Sir Christopher A. Pissarides) व डेल टी. मॉर्टेन्सन (Dale T. Mortensen) यांच्या समवेत डायमंड यांना देण्यात आला.

डायमंड यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण ब्रॉइंक्स व वूडमिर येथे झाले. त्यांनी १९६० मध्ये गणित विषयात येल विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. पुढे १९६३ मध्ये ‘मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (M.I.T.) येथून त्यांनी अर्थशास्त्रातील पीएच. डी. मिळविली.

डायमंड यांनी १९६४-६५ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. १९६६ मध्ये त्यांची एम.आय.टी. या संस्थेत सहयोगी प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली. पुढे १९७० मध्ये त्यांना तेथेच प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. १९८५-८६ मध्ये अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून, तर १९९७ मध्ये इन्स्टिट्यूट प्रोफेसर पदावर त्यांची निवड झाली. डायमंड यांनी शासकीय कर्जे, भांडवल संचय, भांडवल बाजार व धोके, वाजवी करप्रणाली, श्रमबाजारपेठा व सामाजिक विमा अशा विविध विषयांवर संशोधन केले. सुरुवातीला १९६० मध्ये शासकीय कर्जप्रणालीसंबंधी केलेल्या अर्थशास्त्रीय विवेचनाबद्दल त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या व्यावसायिक कारकीर्दीचा मोठा हिस्सा अमेरिकेच्या सामाजिक सुरक्षा धोरणाचे विश्लेषण करून त्यात सुधारणा सुचविण्यासाठी त्यांनी खर्च केला. अमेरिकेबरोबरच चीन व इतर देशांच्या सामाजिक सुरक्षाविषयक धोरणांचा अभ्यासही त्यांनी केला. याबाबतच्या धोरणात त्यांनी अमुलाग्र बदल सुचविले व सामाजिक सुरक्षेसाठी व्यक्तीचे वाढते वयोमान व करपात्र उत्पन्न विचारात घेता त्यांसाठीच्या निधीत वाढ व्हावी यासाठी आग्रह धरला.

डायमंड यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे व्यवस्थापन व अंदाजपत्रक विभागाचे भूतपूर्व संचालक पीटर ओर्सझॅग यांच्या समवेत सामाजिक सुरक्षा या विषयावर २००४ मध्ये सेव्हिंग सोशल सिक्युरिटी : ए बॅलन्स्ड ॲप्रोच हा ग्रंथ लिहिला. एप्रिल २०१० मध्ये अर्थतज्ज्ञ जेनेट येलेन व सराह ब्लूम यांच्या बरोबरीने डायमंड यांची फेडरल रिझर्व्ह बोर्डाच्या संचालकपदावर नियुक्ती झाली. देशांतर्गत लादल्या जाणाऱ्या करांचा कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर होणारा परिणाम त्यांनी अभ्यासला. नवीन व्यवसायांना प्रोत्साहन देणे कसे आवश्यक आहे, त्यामुळे रोजगार निर्मितीचा दर कसा वाढतो, याचे विवेचन त्यांनी केले. सर्वसामान्य व होतकरू उद्योजकांना अर्थपुरवठा व पायाभूत सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तुलनेने मोठ्या उद्योगांना तसेच श्रीमंतांना उद्योग-व्यवसाय करण्यासाठी निधी उपलब्ध होणे फारसे कठीण नसते. सामान्य लोकांकडे पैसा येईल अशा रीतीने पुरोगामी करप्रणाली लागू करण्यावर डायमंड यांनी भर दिला. अर्थव्यवस्थेला जर गती द्यावयाची असेल, तर समाजातील किती लोकांमध्ये रोजगारनिर्मितीची क्षमता निर्माण झाली याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. केवळ श्रीमंत व्यक्तींकडे संपत्तीचा ओघ चालू राहील अशा व्यवस्थेऐवजी जे कल्पक आहेत व उद्योग-व्यवसायांमार्फत रोजगारनिर्मिती करू शकतात अशांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे त्यांचे मत होते.

डायमंड यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : अन्सर्टन्टी इन इकॉनॉमिक्स (१९७८), ए सर्च इक्विलिब्रियम ॲप्रोच : टू द मायक्रो फाउंडेशन्स ऑफ मॅक्रोइकॉनॉमिक्स (१९८२), ग्रोथ प्राडक्टिव्हिटी अनएम्प्लॉयमेंट (१९९०), ऑन टाइम : लेक्चर्स ऑन मॉडेल्स ऑफ इक्विलिब्रियम (१९९४), सोशल सिक्युरिटी : व्हाट रोल फॉर दि फ्यूचर ? (१९९६), इश्यूज इन प्रयव्हटाइजिंग सोशल सिक्युरिटी (१९९९), सोशल सिक्युरिटी रिफॉर्म (२००२), टॅक्सेशन, इन्कम्प्लिट मार्केट्स ॲण्ड सोशल सिक्युरिटी (२००२), सेव्हिंग सोशल सिक्युरिटी-ए बॅलन्स्ड ॲप्रोच (२००५), बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स ॲण्ड इट्स ॲप्लिकेशन (२००७), रिफॉर्मिंग पेन्शन्स : प्रिन्सिपल्स ॲण्ड पॉलिसी चॉयसेस (२००८), पेन्शन रिफॉर्म : ए शॉर्ट गाइड (२००९). शिवाय त्यांचे जवळपास १४४च्या वर शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

डायमंड यांना नोबेल पुरस्काराव्यतिरीक्त अर्थशास्त्रीय संशोधन व योगदानाबद्दल अनेक सन्मान लाभले : सोशल सायन्स रिसर्च फेलो (१९६८), अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेस फेलो (१९७८), महालनोबीस अवॉर्ड (१९८०), नॅशनल अकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेस सदस्य (१९८४), नॅशनल अकॅडमी ऑफ सोशल इन्शुरन्स-संस्थापक सदस्य (१९८८), ॲडव्हायजरी कौन्सिल ऑन सोशल सिक्युरिटी सदस्य (१९८० – १९९०), नेमेर्स प्राइज (१९९४), एम.आय.टी. किलियन अवॉर्ड (२००३), सॅम्युएल्सन अवॉर्ड (२००८).

दृकश्राव्य दुवा : https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/2010/diamond/lecture/

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा