आलमेलकर, अब्दुलरहीम आपाभाई : (१० ऑक्टोबर / जानेवारी १९२० – ११ डिसेंबर १९८२). भारतीय चित्रशैली व कलामूल्ये जपणारे तसेच आदिवासींचे जीवन आपल्या स्वतंत्र चित्रशैलीत साकारणारे थोर भारतीय चित्रकार. त्यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. त्यांचे मूळ घराणे कर्नाटकातील आलमेल या गावचे. त्यामुळे त्यांचे आडनाव आलमेलकर.

अगदी लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशालेत झाले. ‘गʼ गडूचा आणि ‘मʼ मक्याचा लिहीत असतानाच त्यांनी गडूचे आणि मक्याचे चित्रही त्या अक्षरांसोबतच काढले होते. चित्रकार जी. एस. दंडवतीमठ यांच्या मुंबई येथील नूतन कलामंदिरमध्ये त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले (१९३५–४०). सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी जी. डी. आर्ट ही ड्रॉइंग अँड पेंटिंगची पदविका प्राप्त केली (१९४८). पुढे आलमेलकर यांनी नूतन कलामंदिर या संस्थेचे प्राचार्यपद भूषविले (१९६५–१९८२). सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्येही त्यांनी १९६८ पासून प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांचा पहिला विवाह अयशस्वी झाल्यामुळे त्यांनी सातारा येथील जुबेदा यांच्याशी दुसरा विवाह केला.

१९३४ मध्ये सोलापूर येथील संत शुभराय महाराज (१७३०–१८२०) यांच्या मठातील रामायण-महाभारतातील प्रसंगांवरील, तसेच कृष्ण-गोपींच्या रासक्रीडेवरील चित्रे पाहून भारतीय चित्रशैलीची बीजे आलमेलकर यांच्या मनात रुजली असावीत. १९४१ मध्ये मुंबई येथे त्यांनी एक्सप्रेस ब्लॉक अँड एनग्रेव्हिंग स्टुडिओमध्ये व्यावसायिक चित्रकार म्हणून काम केले (१९४१–५३). नोकरी सांभाळून उरलेल्या वेळात ते स्वतःची चित्रनिर्मिती करीत. आरेखन (Sketching) कलेसंदर्भात दंडवतीमठ यांचे व लघुचित्रशैली व चित्रांकनातील काटेकोरपणा यांबद्दल चित्रकार एच. एल. खत्री यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

आलमेलकर यांच्या चित्रकारितेचा वेध घेता त्यांची काही ठळक वैशिष्ट्ये लक्षात येतात. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रीयन श्रेष्ठ चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे व ऑस्ट्रियन चित्रकार वॉल्टर लँगहॅमर यांच्या चित्रशैलीचा विशेष प्रभाव त्यांच्यावर होता. पुढे त्यांनी भारतीय चित्रशैली सखोल अभ्यासली. पर्शियन, मोगल, राजपूत, पहाडी लघुचित्रशैली तसेच महाराष्ट्र, कर्नाटक भागांतील दख्खनी शैलीही अभ्यासली. राजे-राण्या, नायक-नायिका हे चित्रविषय मागे पडून सर्वसामान्य माणसाचे जीवन, घटना-प्रसंग, चाली-रीती, पूजा-अर्चा, वेशभूषा, अलंकार इत्यादी चित्रविषय त्यांनी हाताळले.

लक्ष्मी

भारतातील आदिवासी, वनवासी, गोंड, भिल्ल, संथाळ इत्यादी जाति-जमातींच्या जीवनाचा त्यांनी जवळून अभ्यास केला. त्यांचे रीतिरिवाज, उत्सव, नृत्य, वेशभूषा, मासे पकडण्याची जाळी, सुपे, टोपल्या, गुडगुड्या इत्यादींवर त्यांनी हजारो आरेखने केली. त्यासाठी ते कॅनव्हास, पुठ्ठा, कागद किंवा एखादा नवीन पृष्ठभाग यांचा वापर करीत. त्यांचे चित्रविषय जसे वेगळे होते, तसे चित्र रंगविण्याचे तंत्रही वेगळे होते. जलरंगामध्ये प्राथमिक काम केल्यानंतर पुढे काथ्या, कापूस, गवत, चिंध्या, मोडके कंगवे अशा साधनांचा ते वापर करीत. त्याआधी पुठ्ठ्यावर बोटांनी रंग लावत व अलंकरण शाईने करीत. तैलरंगातील चित्रांमध्ये कुंचल्याने रेषा काढीत. रंगधानीने (palette knife) रंग भरून घेत. कुंचल्याच्या मागच्या दांड्याने कोरून पोतनिर्मिती करीत. त्यामुळे चित्र अधिक आकर्षक होत असे. त्यांच्या चित्रांच्या आकर्षकतेमुळे भेटकार्डकंपन्यांनी ती विविध भेटकार्डांवर छापण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढीस लागली व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले.

आलमेलकर यांच्या कलात्मक वाटचालीत त्यांची एक स्वतंत्र ‘आलमेलकर शैलीʼ प्रस्थापित झाली. त्यांच्या विपुल चित्रनिर्मितीमध्ये त्यांनी भारतभर केलेल्या चित्रमय प्रवासाचा मोठा वाटा आहे. भारतातील विविधता व ग्रामीण संस्कृती यांचा एकजिनसी संबंध त्यांना विशेष भावला. भारतात कलकत्ता (कोलकाता), दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, म्हैसूर इत्यादी ठिकाणी त्यांनी प्रदर्शनांसाठी चित्रे पाठविली. त्यांच्या चित्रांना २० सुवर्णपदके, २४ रौप्यपदके, अनेक कांस्यपदके व रोख पुरस्कारही प्राप्त झाले. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांपैकी काही महत्त्वाचे व उल्लेखनीय पुरस्कार असे : बाँबे आर्ट सोसायटी – सर्वोत्कृष्ट जलरंगचित्रण (१९४८), बाँबे आर्ट सोसायटी – फुलमून या चित्रास सुवर्णपदक (१९५४), आर्ट सोसायटी ऑफ इंडिया – पटेल ट्रॉफी (१९५५), ललित कला अकादमी, नवी दिल्ली – राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कलाकृतीसाठीचा पुरस्कार (१९५६), नॅशनल ॲवॉर्ड (१९६०) इत्यादी. इंडोनेशियाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. सूकार्णो यांनी भारतभेटीमध्ये त्यांची काही निवडक चित्रे विकत घेतली व त्यांना इंडोनेशियास येण्याचे निमंत्रण दिले. इंडोनेशिया, मलेशिया व सिंगापूर येथेही त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली होती. स्वित्झर्लंडमधील एका प्रदर्शनात त्यांची दहा चित्रे प्रदर्शित झाली.

प्लेजर आयलंड, (रचनाचित्र – भारतीय शैली ) पुठ्ठ्यावर मिश्र माध्यम (१९५५).

१६ जानेवारी १९५४ रोजी मुंबई येथे ते जेथे राहत होते, त्या पाचमजली इमारतीस आग लागली. त्यात त्यांचे घर, स्टुडिओ, चित्रे, आरेखने जळून भस्मसात झाली. त्या वेळी तत्कालीन मुंबई प्रांताचे राज्यपाल गिरिजाशंकर वाजपेयी यांनी त्यांना खास बाब म्हणून जागा उपलब्ध करून दिली. तसेच बाँबे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, उद्योजक मुकुंद किर्लोस्कर, खत्रीगुरुजी,  खाजगी संस्था आदींनी त्यांना मदत केली. त्यामुळे त्यातून ते सावरले. त्यानंतर मुंबईच्या जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये त्यांनी चित्रप्रदर्शन भरविले (२० डिसेंबर १९५४). फ्रॉमॲशेस टू लाइफ या त्यांच्या चित्रास सुवर्णपदक प्राप्त झाले.

ज्या काळात आलमेलकरांचे समकालीन चित्रकार पाश्चिमात्य कलाशैलींमध्ये आपल्या नवीन अभिव्यक्ती साकारत होते, त्याच काळात त्यांनी भारतीयत्व जपून आपली नवीन शैली निर्माण केली, जोपासली आणि तिचा विकास केला. आदिवासींचे दैनंदिन जीवन, नित्य व्यवहार, त्यांची आनंदी वृत्ती व साधेपणा आपल्या नाजूक, अलंकरणात्मक शैलीने, नाजूक लयदार रेषांनी चित्रित करून त्यांनी आपल्या चित्रकारितेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

पुणे येथे एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांचे निधन झाले.

 

संदर्भ :

  • बहुळकर, सुहास, ‘ए. ए. आलमेलकर : रंग जीवनातले आणि चित्रांतलेʼ,  नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, ए. ए. आलमेलकर : इन्स्पिरेशन अँड इंपॅक्ट ,  (पृ. ३९ ते ९५).
  • पवार, सुभाष एकनाथ, महान भारतीय चित्रकार, मुंबई, २०१२.

समीक्षक – सुहास बहुळकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content