राग म्हणजे ‘आसक्ती’ होय. मराठीमध्ये राग या शब्दाचा अर्थ ‘क्रोध’ असा होतो, परंतु संस्कृतमध्ये प्रिय वस्तूंप्रति असणारी आसक्ती म्हणजे राग होय. महर्षी पतंजलींनी राग हा एक क्लेश मानला आहे. रागाचे स्वरूप त्यांनी ‘सुखानुशयी राग:’ (योगसूत्र २.७) या सूत्राद्वारे सांगितले आहे. एखाद्या वस्तूचा किंवा विषयाचा सुखकारक अनुभव घेतल्यानंतर तो अनुभव चित्तामध्ये सूक्ष्म संस्कार उत्पन्न करतो. हा संस्कार ज्या वस्तूचा अनुभव घेतला ती वस्तू आणि त्या अनुषंगाने होणारे सुख या दोन्हीविषयीचा असतो. या संस्कारामुळे चित्तामध्ये पुन्हा पुन्हा त्या सुखकारक विषयाचा अनुभव घेण्याची आसक्ती उत्पन्न होते. विषयाचा सुखकारक अनुभव हा सीमित काळासाठी असतो. परंतु, त्याद्वारे उत्पन्न होणारी आसक्ती चित्तामध्ये कायमस्वरूपी राहते व जीवाला त्या विषयाकडे पुन्हा पुन्हा आकृष्ट होण्यासाठी उद्युक्त करते.

वस्तुत: सर्व जीवांना केवळ सुखाविषयी आसक्ती असते. परंतु, ते सुख ज्या ज्या वस्तूंमुळे, साधनांमुळे किंवा व्यक्तींमुळे प्राप्त होते त्या सर्वांविषयी सुद्धा आसक्ती उत्पन्न होते. सुखाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने संबंधित असणाऱ्या अनेक वस्तूंप्रति आसक्ती दृढ होत जाते. उदाहरणार्थ, स्वादिष्ट भोजन केल्यामुळे सुख प्राप्त होते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या मनात चविष्ट खाद्य पदार्थांविषयी आसक्ती असेल, तर असे पदार्थ तयार करणाऱ्या व्यक्तीविषयीही त्याला आसक्ती वाटू लागते. अशाप्रकारे मूलत: सुखासाठी असणाऱ्या आसक्तीचा परीघ वाढतच जातो.

सांख्य दर्शनानुसार सुखाचा संबंध सत्त्वगुणाशी आहे. सुखाचा अनुभव घेण्यात काही अनुचित नाही. परंतु, त्या सुखाच्या मागून उत्पन्न होणारा राग हा रजोगुणाचा परिणाम आहे, जो दु:ख उत्पन्न करतो. राग हा क्लेश अविद्येमुळे उत्पन्न होतो, जी स्वत: तमोरूप आहे. अशा प्रकारे तमोरूप अविद्या रजोरूप रागाला उत्पन्न करून सत्त्वरूप सुखाला कलुषित करते. ज्यावेळी सुख अनुभवाला येते, त्यावेळी सत्त्वगुणाचा उत्कर्ष असतो, परंतु त्या सुखाविषयी आसक्ती उत्पन्न झाल्याने कालांतराने रजोगुणाचा उत्कर्ष होऊन दु:ख अनुभवाला येते, यालाच परिणाम-दु:ख असे म्हणतात. इच्छित वस्तूची पुन्हा प्राप्ती झाली नाही, तर दु:ख प्राप्त होते व इच्छित वस्तूची प्राप्ती झाली तरीही आसक्ती अधिक दृढ झाल्यामुळे दु:ख प्राप्त होते. अशा रीतीने राग हा सर्वदा दु:खाचे कारण ठरल्यामुळे पतंजलींनी रागाचा समावेश क्लेशात केला आहे.

सांख्य दर्शनात रागाला ‘महामोह’ अशी संज्ञा वापरली आहे व त्याचे दहा प्रकार स्पष्ट केले आहेत. राग हा बुद्धीच्या आठ भावांपैकी एक मानला आहे. वैराग्य हा रागाचा विरुद्ध भाव आहे. रागाचे मूळ कारण अविद्या असून ती नष्ट झाल्यावर रागही नष्ट होतो व साधकाला शुद्ध ज्ञानाद्वारे कैवल्य प्राप्त होते.

पहा : अविद्या, क्लेश, दु:खत्रय.

                                                                          समीक्षक – आचार्य कला