भारतातील एक प्रसिद्ध प्राचीन स्थळ. गंगा नदीच्या तीरावर असलेले हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असून ते कानपूर (उत्तर प्रदेश) शहराच्या वायव्य दिशेला ८० किमी. अंतरावर आहे. याची कुशस्थल, गाधिपुर, कुशिक, कुसुमपूर इ. नावेही प्राचीन साहित्यांत व लेखांत आढळतात. रामायणातील आख्यायिकेनुसार याची स्थापना रामपुत्र कुश याच्या कुशनाभ पुत्राने केली असून याचे ‘महोदयʼ असे नाव होते. कुशनाभाच्या कन्यांनी वायुदेवाची मागणी नाकारल्यामुळे त्यांना कुब्जत्व प्राप्त झाले; त्यावरून याला ‘कान्यकुब्ज’ असे नाव पडले असावे, अशी आख्यायिका मिळते. याचे कनोगिजा व कनगोर असे उल्लेख टॉलेमीने केले आहेत.
या नगराचा उदय व विकासामध्ये मौखरी राजवंशाने महत्त्वाची भूमिका बजावली. हे मौखरी घराणे प्रारंभी गुप्तांचे सामंत म्हणून राज्य करीत होते; परंतु स्कंदगुप्ताच्या मृत्युनंतर आणि सोबतच वारंवार होणाऱ्या हुणांच्या आक्रमणांमुळे गुप्त घराण्याला ओहोटी लागली. अशा परिस्थितीत गुप्तांची सत्ता दुर्बळ होत गेली. अशा काळात मौखरी घराण्यातील ईशानवर्मन याने हूण आक्रमकांना यशस्वीपणे तोंड दिले आणि त्यांना पराभूत करून (इ. स. ५५४) परतवून लावले. ईशानवर्मननंतर मौखरी घराण्यात सूर्यवर्मन हा गादीवर आला. मौखरी राजवंशाच्या काळात या शहराची कीर्ती सुदूर पर्शिया पर्यंत पसरली होती. या आदान-प्रदानाचे प्रतिबिंब तत्कालीन साहित्य, चित्र आणि शिल्पकलेत उमटलेले आढळते. याच काळात पाटलिपुत्र नगरीचे महत्त्व कमी होऊन उत्तर भारतातील राजकीय घडामोडींचे केंद्र म्हणून कन्नौजचा उदय होण्यास प्रारंभ झाला. या काळात चिनी प्रवासी आणि बौद्ध धर्माचा अभ्यासक फाहियान भारतभेटीवर होता. त्याच्या प्रवासवर्णनात या नगरीचा उल्लेख दिसतो.
मौखरी घराण्याच्या अस्तानंतर या नगरावर वर्धन घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले. हर्षवर्धनाच्या कालखंडात या नगराची सर्वांगाने भरभराट झाली. या वैभवाचे प्रतिबिंब समकालीन देशी आणि परकीय साहित्यात दिसते. यांत प्रामुख्याने बाणभट्टाचे हर्षचरित, ह्यूएनत्संगचे (युआनच्वांग) सि–यू–की या प्रवासवर्णनाचा समावेश होतो. ह्यूएनत्संगने तेथे भरलेल्या धर्म परिषदेचे वर्णन लिहून ठेवले आहे. विशेषतः हे नगर त्याकाळातील तंत्रमार्गाचे आणि तांत्रिक साधनेचे महत्त्वाचे केंद्र होते. या नगरात असलेली ‘राजा हर्ष का टीला’ (राजा हर्षाची टेकडी/ किल्ला) ही वास्तू असून हर्षवर्धनाच्या काळी ही त्याची राजधानी होती.
हर्षवर्धनाच्या मृत्युनंतर या शहरावर काही काळ यशोवर्मन या राजाचे नियंत्रण होते. यशोवर्मनाच्या मृत्युनंतर येथे आयुध घराण्याचे वर्चस्व निर्माण झाले; परंतु या घराण्यातील राजे इतर राजसत्तांच्या हाताखालील बाहुले म्हणूनच राज्य करीत होते. अशा परिस्थितीत या काळातील राष्ट्रकूट, प्रतिहार आणि पाल या प्रबळ राजसत्तांत या नगरावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी संघर्ष झाला. हा राजकीय संघर्ष ‘त्रिराज्य संघर्ष’ म्हणून परिचित आहे. हा संघर्ष साधारणत: दोनशे वर्षे चालला (इ. स. ८ वे शतक ते १० वे शतक). परंतु या त्रिराज्य संघर्षात या नगरावर इतर दोन घराण्यांच्या तुलनेत प्रतिहार राजवंशाने बराच काळ वर्चस्व निर्माण केले होते, असे दिसते. प्रतिहारांच्या कारकिर्दीत ही नगरी ऊर्जितावस्थेत आली होती.
पुढे अकराव्या शतकात महमूद गझनी (९७१–१०३०) याने या नगरावर स्वारी करून लूट केली. महमूद गझनीच्या स्वाऱ्यांचा ओघ ओसरल्यानंतर येथे गाहडवाल घराण्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या घराण्याच्या आधिपत्याखाली या शहराचा विकास झाला. याच काळात आलेल्या अल् बीरूनी (९७३–१०४८) याच्या तहकीक-मा लिल- हिंद (तारीख अल्-हिंद) या ग्रंथात येथील राजकीय व भौगोलिक महत्त्व उल्लेखिले आहे. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात याच घराण्यातील राजा जयचंद हा राज्य करीत होता. याच्या काळात मुहम्मद घोरी (११७५–१२०६) याने कन्नौजवर आक्रमण करून वर्चस्व निर्माण केले.
मोगल कारकिर्दीत हे भरभराटलेले शहर होते. येथील जुन्या टेकाडांत व परिसरात भुवराह, कल्याणसुंदर, शिवमुख लिंगे, नृत्यगणेश व विश्वरूप विष्णू इ. सातव्या व आठव्या शतकांतील उत्कृष्ट शिल्पे मिळाली आहेत. ह्याशिवाय येथील जामा मशीद, जैनस्तंभ असलेली मशीद, सीताकी रसोई इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत. जुन्या नदी पात्राच्या काठावर आता प्राचीन नगरीतील पडक्या इमारतींचे अवशेष दिसतात. अत्तरे, गुलाबपाणी इ. सुगंधी पदार्थांकरिता तसेच गुलकंदासाठी कन्नौज प्रसिद्ध आहे.
संदर्भ :
- Tripathi, Ram Shankar, History of Kanauj : To the Moslem Conquest, New Delhi, 1989.
- दीक्षित, रामकुमार, कनौज, लखनौ,१९५५.
समीक्षक : अभिजित दांडेकर