महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध प्राचीन नगर व औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. ते गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर, औरंगाबाद शहराच्या  दक्षिणेस ५६ किमी. अंतरावर वसले आहे. सध्याचे पैठण हे प्राचीन प्रतिष्ठान होय. प्राचीन भारतीय वाङ्मयात आणि परंपरेत भारतात दोन प्रतिष्ठान या नावाची ठिकाणे असल्याचे आढळून येते. दुसऱ्या ‘प्रतिष्ठान’बाबत नंदलाल डे म्हणतात की, ‘उत्तरेकडील प्रतिष्ठान म्हणजे गंगेच्या पूर्व किनाऱ्यावर उत्तरप्रदेशात अलाहाबादच्या समोर असलेले झूसी हे स्थळ होय.ʼ याला अजूनही प्रतिष्ठानपूर असे संबोधले जाते आणि वाङ्मयीन परंपरेनुसार हे स्थळ पुरुरवस या सोमवंशी राजाची राजधानी होती. याउलट काहींच्या मते, प्रयाग (अलाहाबाद) जवळील सध्याचे जिहान म्हणजेच उत्तरेतील प्रतिष्ठान होय. अर्थात या उत्तरेकडील प्रतिष्ठानपुराशी पैठणचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्रातील पैठण हे जास्त प्रख्यात आणि दीर्घ इतिहास असलेले स्थळ आहे. त्याचप्रमाणे बौद्ध आणि जैन धर्मग्रंथांमध्ये प्रतिष्ठानचे विपुल उल्लेख आलेले आहेत.

पैठण या प्राचीन नगरीशी महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक घटना निगडित आहेत. महाराष्ट्राचे आद्य सम्राट सातवाहनवंशीय राजे या नगरांशी जवळीक दाखवितात. टॉलेमी (इ. स.९०-१६९) त्याच्या प्रवासवृत्तातून सांगतो की, पैठण ही सिरि पुळुमाळी या सातवाहन राजाची राजधानी होती. सातवाहन कालातील गतवैभवाचे तसेच व्यापारासंबंधी पेरिप्लस ऑफ व एरिथ्रीअन सी या ग्रंथात अनेक उल्लेख आढळतात. या ग्रंथात पैठण हे मोठे व्यापारी केंद्र, विशेषतः वस्त्रोद्योगाशी निगडित असून बॅरिगाझा (भडोच) पासून वीस दिवसांच्या प्रवासाइतके दूर आहे, असे सांगितले आहे. पूर्वेकडील मसलीपट्टम-पैठण-तेर-नासिक ते भडोच असा महत्त्वाचा व्यापारी मार्ग वापरात होता. महिष्मती (महेश्वर), उज्जयिनी आणि विदिशा यांच्याशीही पैठण जोडले गेले होते. पैठणहून कार्नेलिअन नावाचे मौल्यवान दगड दागिने बनविण्यासाठी भडोचला पाठविले जात असत. पैठणची भरभराट प्रामुख्याने सातवाहनकाळात झाली. पैठणच्या मित्रदेव या सुगंधाच्या नातलगांनी पितळखोऱ्याच्या लेण्यांना देणग्या दिल्याचा लेख पितळखोऱ्याला वाचायला मिळतो. पैठणच्याच संघकाच्या मुलांनी पितळखोऱ्याला देणग्या दिल्याचे दुसरा लेख सांगतो. कृष्णगिरी (मुंबईजवळील कान्हेरी) आणि पैठणचाही असाच संबंध असल्याचे सांगणारे लेखही उपलब्ध आहेत आणि ते सातवाहनकालीन आहेत.

सातवाहनांनंतर आभीर, वाकाटक, बादामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य आणि यादवांचा पैठणशी निकटचा संबंध आला. यादवकाळात या नगराचे महत्त्व धर्मपीठ म्हणून वाढले. दक्षिण काशी म्हणूनही त्याचा उल्लेख पुढे होऊ लागला. यादवकालानंतर पैठणवर बहमनी, मोगल, निजामशाही, मराठे व पुन्हा निजामशाही यांचे आधिपत्य होते. ब्रिटिश अंमलात ते हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते. सद्यस्थितीत पैठण हे एक आधुनिक नगर आहे.

पैठण हे एकनाथ व ज्ञानेश्वर या संतांच्या जीवनकार्याशी निगडित आहे. त्याचप्रमाणे दिगंबर जैन पंथ तसेच महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.

पैठणच्या प्राचीन ऐतिहासिक तसेच आद्य मध्ययुगीन काळातील वैभवाची साक्ष तेथील विस्तृत पांढरीची टेकाडे देतात व हे वैभव जाणून घेण्याचा प्रयत्न निजामी राजवटीतील पुरातत्त्व खात्याने सर्वप्रथम केला (१९३६-३७). या उत्खननात ४ थे शतक ते ८ वे शतक या काळातील विटांनी बांधलेल्या दोन मंदिरांचे अवशेष मिळाले. याच दोन मंदिरांचा पुन्हा नव्याने अभ्यास ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खाते’ व ‘सोसायटी फॉर साउथ एशियन स्टडीज’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला (१९९६-१९९९). यांत या दोन्ही मंदिरांचा विकास चार टप्प्यांनी झाला असल्याचे दिसून आले. या मंदिरांचे साम्य रामटेक, देवगढ, बोधगया, नाचना, भूमर, भितरगाव यांसारख्या मंदिर स्थापत्यशास्त्रात विकासाच्या साखळीत आद्य ठरणाऱ्या मंदिरांशी असल्याचे डी. केनेट व वरदप्रसाद राव या अभ्यासकांचे अनुमान आहे. या दोन मंदिरांच्या अवशेषांचे महत्त्व विषद करताना असे सांगितले जाते की, येथील मंदिरस्थापत्याविषयीच्या प्राथमिक तसेच प्रगत अवस्थेतील मंदिराचे विविध टप्पे एकाच वास्तूमध्ये आढळण्याचे उदाहरण दुर्मीळ आहे. मंदिरांच्या अवशेषांव्यतिरिक्त प्राचीन अवशेष असलेल्या संरक्षित तसेच संरक्षित नसलेल्या विविध ठिकाणी चाचणीखड्डे घेऊन पैठणचा सांस्कृतिक क्रमाचा आढावा घेतला गेला. यात असे दिसून आले की, पैठण येथील पुरावशेषांची व्याप्ती गोदावरी नदीच्या उत्तर किनाऱ्याच्या दिशेने १ कि.मी. इतकी आहे. तसेच चाचणी खड्ड्यांमध्ये सांस्कृतिक क्रमांमध्ये विविधता आढळली. यावरून असा निष्कर्ष काढला  गेला की, प्राचीन ऐतिहासिक काळात येथे झालेल्या वसाहतीचे स्थानिक पातळीवर स्थलांतर होत राहिले असावे.

येथील नरसिंह मंदिराजवळ असलेल्या पांढरीच्या टेकाडावर मोरेश्वर दीक्षित यांनी १९६५-१९६६ साली उत्खनन केले व तेथील सांस्कृतिक क्रम चार क्रमवारींत असल्याचे त्यांना दिसून आले. यामधील पहिला कालखंड सातवाहन असून चौथा कालखंड मध्ययुगीन आहे. पहिल्या कालखंडामध्ये सातवाहन काळातील काचेचे मणी, स्फटिकाची कर्णभूषणे, खुराचे पाटे इत्यादी वस्तुअवशेषांव्यतिरिक्त गजलक्ष्मीची प्रतिमा असलेली शिशाची दोन नाणी प्रथमच मिळाली.

गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर नवनाथ मंदिराशेजारी शनिमंदिराच्या समूहात असलेल्या ‘सोन टेकडी’ येथे १९९५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रामचंद्र मोरवंचीकर व महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्यातर्फे अरविंद जामखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच के. डी. कावडकर यांच्या देखरेखीखाली संयुक्तपणे उत्खनन केले गेले. या उत्खननात सातवाहन काळातील असंख्य वस्तू सापडल्या. त्यांत रोमन संस्कृतीचा प्रभाव असलेल्या मृद्भांड्यांचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरेल.

श्री. बाळासाहेब पाटील यांनी सातवाहन काळातील खुद्द पैठण येथे सापडलेल्या अद्वितीय वस्तूंचा केलेला संग्रह ‘ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय’ या स्वरूपात संत ज्ञानेश्वर उद्यानात महाराष्ट्र शासनातर्फे जतन करण्यात आला आहे. या संग्रहात उत्कृष्ट मनोहर मणी, मणी बनविण्याचे दगडी साचे, दुर्मीळ नाणी, नाण्यांचे साचे, रोमन मृद्भांडी, खेळणी, केओलीनच्या मनोवेधक यक्षमूर्ती इ. वस्तू आहेत. एफ. आर. अल्चिन यांच्या मते, पैठण हे दख्खन व गंगेचे खोरे या भौगोलिक प्रदेशामधील दक्षिण ठाणे होय. पैठण आज रेशीम आणि हातमागाद्वारा विणलेल्या ‘पैठणी’ या महावस्त्रासाठी प्रसिद्ध आहे.

 

संदर्भ :

  • Allchin, F. R. The Archaeology of Early Historic South Asia : Emergence of Cities and States, Cambridge, Cambridge University Press, 1995.
  • Deotare, B. C.; Joshi P.S. & Parchure, C. N. Glimpses of Ancient Maharashtra Through Archaeological Excavations, Pune, 2013.
  • Kennet, D. & Rao, J. V. P. Two Early Historic Brick Temples at Paithan in Maharashtra, South Asian Studies 19 (2003): 113-123, 2003.
  • जोशी, सु. ग., संपा. ‘पैठण : एक ऐतिहासिक समालोचनʼ, मराठवाडा संशोधन मंडळ वार्षिक, पुणे, १९७५.
  • मोरवंचीकर, रा. श्री. पैठण दर्शन, मुंबई पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८५.

                                                                                                                                                                                         समीक्षक – श्रीकांत गणवीर; अरुणचंद्र पाठक

प्रतिक्रिया व्यक्त करा