हिंदुस्थानी अभिजात संगीत पद्धतीच्या गायनप्रकारांतील गीताचे (चीज) दोन भाग आहेत : पहिला अस्ताई (स्थायी), दुसरा अंतरा. पूर्वांगप्रधान रागात अस्ताईचा विस्तार व रागाचे स्वरूप साधारणत: मंद्र व मध्य सप्तकांतील स्वर घेऊन दाखवितात. अंतर्यामध्ये मध्य आणि तार या सप्तकांतले स्वर येतात. उत्तरांगप्रधान रागांच्या विस्तारात मात्र तारसप्तकातील स्वरही अस्ताईमध्ये (स्थायीमध्ये) येतात. अस्ताई-अंतरा मिळून गीतकल्पना पूर्ण होते. अस्ताई व अंतरा यांमध्ये पहिल्या समेपर्यंतचा भाग पुन:पुन्हा म्हटला जातो. काहीवेळा स्थायीनंतर लगेच अंतरा म्हंटला जातो, तर काहीवेळा स्थायीच्या मध्य सप्तकातील आलापाच्या शेवटी तार स्वर घेऊन अंतर्याची सुरुवात होते.
समीक्षक : सुधीर पोटे