भातखंडे वर्गीकरणपद्धतीनुसार आसावरी थाटात गंधार, धैवत, निषाद हे तीन स्वर कोमल व बाकीचे शुद्ध असतात. या थाटात आसावरी, जौनपुरी, गंधारी, देवगांधार, सिंधुभैरवी, देसी, कौशी, दरबारी कानडा, अडाणा, नायकी कानडा या रागांचा अंतर्भाव होतो. खट, झीलफ यांचाही समावेश याच थाटात करण्यात येतो. या सर्व रागांचे तीन उपवर्ग पडतात : (१) दोन्ही गंधार घेणारे खट, झीलफ, देवगंधार (२) दोन्ही ऋषभ घेणारे गंधारी, सिंधुभैरवी (३) अवरोहात धैवत वर्ज्य करणारे दरबारी कानडा व अडाणा. हिंदुस्थानी संगीतशास्त्रानुसार दरबारी कानडा, अडाणा व कौशी हे राग रात्री गायले जाणारे असून या थाटातील बाकीचे राग दिवसा गायले जाणारे आहेत. दाक्षिणात्य पद्धतीतील नटभैरवी मेल आसावरी थाटाशी जुळता आहे. या थाटातील काही राग हे तोडीचे प्रकार म्हणून मानले जातात.

समीक्षक : सुधीर पोटे