पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी ब्रह्मचर्य हा चवथा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा:| योगसूत्र २.३०). ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रियांवरील संयम. व्यासभाष्यात “उपस्थ या गुप्तेंद्रियावरील संयम म्हणजे ब्रह्मचर्य होय”, अशी ब्रह्मचर्याची व्याख्या केली आहे (ब्रह्मचर्यं गुप्तेन्द्रियस्योपस्थस्य संयम:। व्यासभाष्य २.३०).
वाचस्पति मिश्र असे म्हणतात की, केवळ उपस्थावरील निग्रह नव्हे तर अन्य इंद्रियांच्याही लोलुपतेवर निग्रह म्हणजे ब्रह्मचर्य होय (२.३०). ब्रह्मचर्यात स्त्रीवर लालसेने कटाक्ष टाकणे, तिच्याशी प्रेमपूर्वक वार्तालाप करणे आणि कामोत्तेजक अंगस्पर्शाविषयी आसक्ती या सगळ्यांपासून परावृत्त होणे या सर्वांचा समावेश होतो. दक्षमुनींनी असे म्हटले आहे की, ब्रह्मचर्याचे पालन म्हणजे आठ प्रकारच्या विशेष सुख देणाऱ्या मैथुनाचा त्याग करणे. हे आठ प्रकार म्हणजे कामक्रीडांचे स्मरण करणे, त्याविषयी बोलणे, कामक्रीडा करणे, स्त्रीकडे बघणे, तिच्याशी एकांतात भाषण करणे, भोगाची इच्छा करणे, संभोगविषयक निश्चय करणे आणि त्या क्रियेपासून आनंद घेणे. (ब्रह्मचर्यं सदा रक्षेदष्टधा मैथुनं पृथक्| स्मरणं कीर्त्तनं केलि: प्रेक्षणं गुह्यभाषणम्|| संकल्पोऽध्यवसायश्च क्रियानिष्पत्तिरेव च| एतन्मैथुनमष्टाङ्गं प्रवदन्ति मनीषिणः|| दक्षस्मृति ७.३१-३२).
ईश्वरगीतेमध्ये ‘कर्म, मन आणि वाणीने सर्व अवस्थांमध्ये सर्वदा सर्वत्र मैथुन त्याग करणे’, अशी ब्रह्मचर्याची व्याख्या केली आहे (कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा| सर्वत्र मैथुनत्यागं ब्रह्मचर्यं प्रचक्षते|| ईश्वरगीता-कूर्मपुराण ११.१८). ‘सर्वावस्थासु’ म्हणजे यौवनात देखील आणि ‘सर्वदा’ म्हणजे रात्रीदेखील हा त्याग करावा असे नारायणतीर्थ योगसिद्धान्तचन्द्रिकेत (२.३०) म्हणतात. ब्रह्मचर्य स्थिर झाले असता योग्याला सामर्थ्य (वीर्य) प्राप्त होते असे पतंजली म्हणतात (ब्रह्मचर्यप्रतिष्ठायां वीर्यलाभ:|२.३८). ब्रह्मचर्यपालनामुळे योग्यामध्ये अप्रतिहत गुणांचा उत्कर्ष होतो आणि त्याला शिष्यांमध्ये ज्ञान प्रतिष्ठित करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, असा या सूत्राचा अर्थ व्यासांनी केला आहे (व्यासभाष्य २.३८). वाचस्पति मिश्र म्हणतात की, ब्रह्मचर्याचे यथोचित पालन केले असता प्राप्त झालेल्या सामर्थ्यामुळे योग्याला निरनिराळ्या सिद्धी प्राप्त होतात आणि तो शिष्यांना योगाचे आणि त्याच्या यम इत्यादी साधनांचे ज्ञान देण्यास समर्थ होतो (तत्त्ववैशारदी २.३८). भोज ‘वीर्य’ शब्दाचा शरीर, मन व इंद्रियांचे बल असा अर्थ करतात आणि तो संयुक्तिक वाटतो (भोजवृत्ति २.३८). विज्ञानभिक्षु ‘वीर्य’ शब्दाचा अर्थ जिच्यामुळे योग्यांमध्ये अप्रतिहत ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या गुणांचा उत्कर्ष साधतो अशी विशेष शक्ती असा आहे, असे मत व्यक्त करतात. ही शक्ती प्राप्त झाल्यामुळे ते स्वत: ज्ञानी होतात आणि शिष्यांमध्ये ज्ञानाची ग्रहणशक्ती निर्माण करतात (योगवार्त्तिक २.३८).
ब्रह्मचर्याचे पालन जन्म, देश, काल आणि विशिष्ट परिस्थितीत पाळावयाचा नियम यांनी सीमित न राहता सर्वदा करणे, याला ब्रह्मचर्य या सार्वभौम महाव्रताचे पालन करणे असे म्हणतात.
समीक्षक : प्राची पाठक