योगदर्शनानुसार चित्तवृत्तींच्या पाच प्रकारांपैकी विकल्प ही एक प्रकारची वृत्ती आहे. विकल्प या शब्दाचा सर्वसामान्य अर्थ ‘पर्याय’ असा आहे. परंतु, योगशास्त्रात विकल्प शब्दाचा ‘वि + क्लृप्’ (विशेष कल्पना करणे) असा व्युत्पत्तीनुसार होणारा अर्थ स्वीकारला जातो. महर्षि पतंजलींनी विकल्प वृत्तीचे लक्षण पुढीलप्रमाणे सांगितले आहे – ‘शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प:|’ (योगसूत्र १.९). जी वस्तू प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही, परंतु शब्दांच्या सामर्थ्यामुळे ज्या वस्तूची आकृती चित्तामध्ये उमटते, अशा कल्पित (अवास्तविक) वस्तूचा आकार धारण करणारी चित्ताची वृत्ती म्हणजे विकल्प होय. उदा., ‘शशशृङ्ग’ (सशाचे शिंग) हा शब्द ऐकल्यानंतर आपोआपच चित्त सशाच्या शिंगाची कल्पना करते. परंतु, प्रत्यक्षात सशाचे शिंग अस्तित्वात असू शकत नाही. त्यामुळे हा शब्द ऐकल्यानंतर जरी चित्त सशाच्या शिंगाची कल्पना करीत असेल, तरी ते यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. अशाप्रकारे शब्दज्ञानाचे अनुसरण करणारी कल्पित वस्तुविषयी निर्माण होणारी चित्ताची वृत्ती म्हणजे विकल्प होय. सापाचे पाय, आकाशातील फूल, गंधर्व नगर इत्यादी शब्दप्रयोग ऐकल्यानंतरही चित्तात उत्पन्न होणारी त्या त्या कल्पित वस्तूविषयीची वृत्ती ही विकल्प वृत्तीच होय.

विकल्प वृत्तीचे दोन भेद होतात –

(१) भेदे अभेद: – जर दोन वस्तू एकमेकांपेक्षा वेगळ्या असतील, तरीही शब्दांच्या माध्यमातून त्या दोन्ही एकच आहेत, असे ज्ञान उत्पन्न होत असेल तर ती भेदामध्ये अभेद दाखविणारी विकल्प वृत्ती होय. उदा., ‘तव्याचा चटका’. तवा हा लोखंडाचा असल्यामुळे त्याचा चटका बसू शकत नाही, तर तव्याचा अग्नीशी संयोग झाल्यावर अग्नीच्या उष्णतेमुळे चटका बसतो. तवा आणि अग्नी दोन भिन्न वस्तू असतानाही उष्णता, जो अग्नीचा धर्म आहे त्याला तव्याचा धर्म मानून त्यांमध्ये एकता आहे असे गृहीत धरले जाते व त्यामुळे ‘तव्याचा चटका’ असा प्रयोग केला जातो. दोन भिन्न वस्तू अभिन्न मानून केल्या जाणाऱ्या शब्दप्रयोगामुळे ऐकणाऱ्याच्या चित्तामध्ये ‘तव्यामुळे चटका बसला’ अशा प्रकारची विकल्प वृत्ती तयार होते.

(२) अभेदे भेद: – वस्तू एकच असतानाही शब्दांच्या माध्यमातून दोन आहेत, अशा प्रकारचे ज्ञान उत्पन्न होत असेल तर ती अभेदामध्ये भेद दाखविणारी विकल्प वृत्ती होय. उदा., राहूचे मस्तक. पुराणांमधील समुद्रमंथनाच्या कथेनुसार विष्णूने मोहिनी अवतार धारण केल्यावर देवतांना अमृत दिले, परंतु कपटाने एक असुर देवांच्या पंगतीत येऊन बसला व त्यानेही अमृत प्राशन केले. ही गोष्ट लक्षात आल्यावर विष्णूने त्याचे मस्तक छाटले. त्याच्या मस्तकाला राहू व धडाला केतू हे नाव पडले. राहू हे स्वत:च मस्तक असल्यामुळे ‘राहूचे मस्तक’ असे काही असू शकत नाही. परंतु, ‘राहूचे मस्तक’ असा शब्दप्रयोग ऐकल्यावर चित्त एक असुर व त्याचे मस्तक अशी कल्पना करते, तीच वृत्ती म्हणजे विकल्प वृत्ती होय. व्यासभाष्यामध्ये स्वरूप विकल्प, क्रिया विकल्प आणि अभाव विकल्प अशा विकल्प वृत्तीच्या अन्य तीन प्रकारांच्या अनुषंगाने तीन वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत.

कोणत्याही गोष्टीची केवळ कल्पना म्हणजे विकल्प वृत्ती नव्हे. जर शब्दांच्या सामर्थ्याने चित्तामध्ये एखाद्या कल्पित वस्तूचे चित्र उत्पन्न होत असेल, तरच ती विकल्प वृत्ती होय. ज्या भाषेमध्ये अशा प्रकारचा शब्दप्रयोग होत आहे, तो ऐकणाऱ्या व्यक्तीला त्या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे,  अन्यथा चित्तात विकल्प वृत्ती उत्पन्न होऊ शकत नाही. विकल्प वृत्तीचा समावेश प्रमाण वृत्तीत केला जाऊ शकत नाही, कारण प्रमाण वृत्तीद्वारे वास्तविक वस्तूचे यथार्थ ज्ञान होते. परंतु, विकल्प वृत्तीद्वारे असत्य वस्तूचे कल्पित ज्ञान होते. या वृत्तीचा समावेश विपर्यय वृत्तीतही केला जाऊ शकत नाही. कारण विपर्यय वृत्तीमध्ये एका वास्तविक वस्तूच्या ऐवजी अन्य वस्तूचे भ्रमात्मक ज्ञान होते व त्यात शब्दज्ञानाचा समावेश नाही. परंतु, विकल्प वृत्तीमध्ये केल्या जाणाऱ्या अवास्तविक वस्तूची कल्पना ही शब्दाच्या द्वारेच होते. त्यामुळे योगदर्शनात विकल्प ही चित्ताची एक वेगळी वृत्ती मानलेली आहे.

पहा : चित्तवृत्ति, विपर्यय.

संदर्भ : स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, पातञ्जलयोगदर्शन, वाराणसी, २००३.

                                                                                                 समीक्षक : साबिर शेख