पाणीपुरवठा प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र. निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते वापरण्यालायक करण्याचे मुख्य काम येथे केले जाते. घरगुती वापर, औद्योगिक वापर इत्यादींसाठी आवश्यक असलेली पाण्याची शुद्धता येथे उत्पन्न करून ती सातत्याने राखली गेल्यामुळे नागरिकांचे आरोग्य, औद्योगिक प्रत उच्च दर्जाची रहाते. हे साध्य करण्यासाठी प्रत्येक केंद्रामध्ये पुढील गोष्टी उपलब्ध असणे आवश्यक असते : १) शुद्धीकरण करणाऱ्या प्रत्येक यंत्रणेची सविस्तर माहिती त्याच्या रेखाचित्रांसह उपलब्ध असणे, २) ही यंत्रणा चालविण्यासाठी आणि तिची देखभाल, दुरुस्ती इत्यादि करण्यासाठी पाळण्याच्या सविस्तर सूचना, ३) केंद्रामधील सर्व पाईप्स, व्हॉल्व्ह आणि इतर यंत्रणा तसेच पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची पूर्ण माहिती रेखाचित्रांसह, ४) दैनंदिन कामाचा (प्रत्येक कर्मचाऱ्याच्या) तपशील, ५) यंत्रणेची पहाणी करण्याचे आणि देखभालीचे वेळापत्रक, ६) केलेल्या कामाची सविस्तर नोंद, ७) वापरलेल्या रसायनांची आणि विजेच्या वापराची नोंद, ८) प्रयोगशाळेमधील उपकरणे, रसायने इत्यादींची यादी, ९) पाण्याचे नमुने घेऊन त्याचे पृथःकरण करण्याचे वेळापत्रक, १०) केलेल्या पृथःकरणाची सविस्तर नोंद आणि त्याचे निष्कर्ष, ११) केंद्रामधील सुरक्षिततेचे नियम आणि त्यांची अंमलबजावणी इत्यादी., १२) केंद्राच्या कामाचे मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक अहवाल, १३) केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण.
जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वापरलेल्या प्रक्रियांचा क्रम ‘सहज काढता येणाऱ्या’ दूषितकांपासून ते ‘काढण्यास कठीण’ दूषितकांपर्यंत असा लावलेला असतो. त्याशिवाय एका प्रक्रियेमधून बाहेर पडलेले पाणी त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी योग्य असावे लागते. उदा., अत्यंत गढूळ पाणी सरळ निस्यंदकावर (Filter) सोडणे चुकीचे ठरते, कारण त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो. त्यासाठी प्रथम किलाटन (Coagulation), त्यानंतर कणसंकलन (Flocculation) आणि निवळण (Settling) या प्रक्रियांनंतरच पाणी निस्यंदकावर सोडणे योग्य ठरते. तसेच गढूळपणाबरोबर पाण्यामध्ये दुष्फेनता (Hardness) आणि लोह, मँगॅनीज इत्यादींसारखी इतर अनिष्ट दूषितके (Pollutants) असतील तर त्या सर्वांना एकाचवेळी काढून टाकण्यासाठी योग्य ती रसायने वापरून त्यांना गाळाच्या रूपांत निवळण टाकीमध्ये अलग करता येते (पहा – जलशुद्धीकरण : पाण्यातील लोह आणि मँगॅनीज काढणे). हेच तत्त्व निर्जंतुकीकरणाबाबत (Disinfection) पाळले जाते. कारण पाण्यामधील सूक्ष्मजंतू जंतुनाशकापासून (Disinfectants) आपला बचाव करण्यासाठी पाण्यातील आलंबित आणि कलील पदार्थांचा आसरा घेतात म्हणून प्रथम आलंबित (Suspended) व कलील (Colloidal) पदार्थ काढणे, त्यानंतर पाण्याचे निस्यंदन करून मग त्याचे निर्जंतुकीकरण करणे योग्य ठरते.
समीक्षक : सुहासिनी माढेकर