फोगेल, रॉबर्ट : (१ जुलै १९२६ – ११ जून २०१३ ). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. आर्थिक व संस्थात्मक बदलांच्या विश्लेषणासाठी आर्थिक सिद्धांत व सांख्यिकी पद्धती लागू करण्याबाबतच्या संशोधनासाठी फोगेल यांना १९९३ मध्ये अमेरिकन अर्थतज्ज्ञ व त्यांचे सहकारी प्राध्यापक नॉर्थ डग्लस (North Douglass) यांच्या बरोबरीने अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देण्यात आला.
फोगेल यांचा जन्म न्यूयॉर्कमधील न्यूयॉर्क सिटी येथे झाला. त्यांचे वडील रशियन ज्यू होते. त्यांनी १९२२ मध्ये रशियातील हल ओडेसा प्रांतातून अमेरिकेकडे स्थलांतर झाले. फोगेल यांनी १९४४ मध्ये स्ट्यव्हेसंट हायस्कूल येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना वाङ्मय व इतिहास या विषयांची गोडी निर्माण झाली; परंतु १९४०च्या अखेरीस अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीकडे त्यांचे लक्ष वेधले गेले आणि ते अर्थशास्त्राचा अभ्यास करू लागला. १९४८ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून इतिहास हा प्रमुख, तर अर्थशास्त्र हा दुय्यम हे विषय घेऊन ते पदवीधर झाले. त्यादरम्यान विद्यापीठातील American Youth For Democracy या साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा ते अध्यक्ष झाले. पदवीनंतर तेथील साम्यवादी पक्षाचे (चळवळीचे) व्यावसायिक संघटक म्हणून त्यांनी काम केले. सदस्य या नात्याने आठ वर्षे काम केल्यानंतर साम्यवादी विचारधारा अशास्त्रीय असल्याचे मत बनल्याने त्यांनी संघटनेला सोडचिठ्ठी दिली व कोलंबिया विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ व नोबेल विजेते जॉर्ज जोसेफ स्टिग्लर (George Joseph Stigler) यांच्या मार्गदर्शनाखाली १९६० मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयातील एम. ए. पदवी मिळविली. पुढे १९६३ मध्ये जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली. तत्पूर्वी त्यांनी १९६० मध्येच साहाय्यक प्राध्यापक म्हणून रोचेस्टर विद्यापीठात संशोधनास सुरुवात केली.
फोगेल हे १९६४ मध्ये शिकागो विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक झाले. १९६८ ते १९७५ दरम्यान रॉचेस्टर विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी अध्यापन कले. १९७५ मध्ये ते हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक झाला. पुढे १९७८ पासून त्यांनी केंब्रिज येथील National Bureau Of Economic Research, Incorporated संस्थेत सहयोगी संशोधक या पदावर काम केले. १९८१ मध्ये ते पुन्हा शिकागो विद्यापीठात रुजू झाले. मृत्यूसमयी तेथील बूथ स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेत चार्ल्स वॉलग्रीन महनीय सेवा प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी Center For Population Economics व Booth School Of Business या संस्थांचे संचालकपदही सांभाळले.
फोगेल यांनी आपल्या संशोधनात आर्थिक इतिहासाच्या चिकित्सेबरोबरच लोकसंख्येची समस्या, शरीरक्रिया विज्ञान, कौटुंबिक मानसशास्त्र, आहारशास्त्र, विज्ञानाचे तत्त्वज्ञान चीनचा आर्थिक विकास यांसारखे विविध विषय हाताळले. अठराव्या शतकापासून ते विसाव्या शतकाअखेर अमेरिकेतील मृत्यूच्या दरात लक्षणीय घट झाल्याचा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास त्यांनी केला. तसेच इतिहास व अर्थशास्त्र या विषयांतील परस्परसंबंधांची त्यांनी मांडणी केली. सुरुवातीला त्यांनी अमेरिकेतील रेल्वे व आर्थिक विकास यांचाही अभ्यास केला. एकोणिसाव्या शतकामधील अमेरिकेच्या रेल्वेच्या योगदानाचा आढावा घेतला. रेल्वेमार्ग नसते, तर शेती व प्राथमिक क्षेत्राच्या वाहतूक खर्चांत मोठी वाढ झाली असती व शेती उत्पादनाचे क्षेत्रही (विभाग) बदलले असते. अमेरिकेतल्या गुलामगिरी संदर्भात स्टॅन्ले इंगरमन यांच्या सहकार्याने केलेले त्यांचे संशोधन टाइम ऑन दि क्रॉस (२ खंड, १९७४) या ग्रंथातून प्रसिद्ध झाले. गुलामांचा कपाशी तसेच तत्सम उत्पादनांच्या लागवडीसाठी वापर करणे शेतमालकांना फायदेशीर होते. गुलामांच्या टोळ्यांच्या साह्याने उत्तर अमेरिकेपेक्षा दक्षिण अमेरिकेतील शेतमळे अधिक उत्पादन देत असल्याने तेथील गुलामगिरी नष्ट होणे शक्य नसल्याचे निष्कर्ष त्यांनी नोंदविले.
फोगेल यांच्या २००० मध्ये प्रसिद्ध झालेल्या दि फोर्थ ग्रेट अवेकनिंग व फ्यूचर इक्वालिटेरीयनीझम या ग्रंथांत ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वज्ञानामुळे अमेरिका समानतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. तत्पूर्वीच्या गुलामगिरीच्या पार्श्वभूमीवरही धर्माचे तत्त्वज्ञान अमेरिकेला नैतिकतेकडे नेईल असा आशावादही त्यांनी प्रकट केला. फोगेल यांनी आपल्या अखेरच्या लेखनातून वेगाने होणारे तांत्रिक बदल व मानवी शरीरक्रियाविज्ञान यांमध्ये होणाऱ्या सुधारणा यांतील तांत्रिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेचे विश्लेषण केले आहे.
फोगेल यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : दि युनियन पॅसिफिक रेलरोड (१९६०), रेलरोड्स ॲण्ड अमेरिकन इकॉनॉमिक ग्रोथ (१९६४), टाइम ऑन दि क्रॉस : दि इकॉनॉमिक्स ऑफ अमेरिकन निग्रो स्लेव्हरी (२ खंड, १९७४ – सहलेखन), विच रोड टू दि पास्ट? (१९८३), विदाऊट कन्सेंट ऑर कॉन्ट्रक्ट : दि राइस ॲण्ड फॉल ऑफ अमेरिकन स्लेव्हरी (२ खंड, १९८९), इकॉनॉमिक ग्रोथ, पॉप्युलेशन थिअरी ॲण्ड फिजिऑलॉजी (१९९४), दि स्लेव्हरी डिबेट्स १९५२ – १९९० (२००३), दि एस्केप फ्रॉम हँगर ॲण्ड प्रिमॅच्युअर डेथ, १७०० – २१०० यूरोप, अमेरिका ॲण्ड दि थर्ड वर्ल्ड (२००४), दि चेंजिंग बॉडी : हेल्थ न्यूट्रिशन ॲण्ड ह्यूमन डेव्हलपमेंट इन दि वेल्स्टर्न वर्ल्ड सिन्स -१७०० (२०११ – सहलेखक), एक्सप्लेनिंग लाँग टर्मट्रेंडस इन हेल्थ ॲण्ड लाँजिव्हीटी (२०१२), पोलिटिकल अरीथमेटिक (२०१३ – सहलेखक). तसेच त्यांचे नव्वद लेख प्रसिद्ध झाले.
फोगेल यांस अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारव्यतिरिक्त त्यांच्या अर्थशास्त्रातील संशोधन कार्याबद्दल पुढील मानसन्मान प्राप्त झाले : अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्षपद (१९९८), नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकेडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेस, सोशल सायन्स हिस्टरी असोसिएशनेचे सदस्य इत्यादी पदे प्राप्त झाले.
फोगेल यांचे ऑकलॉन (इलिनॉय) येथे निधन झाले.
समीक्षक – संतोष दास्ताने