दलबेको, रेनेटो : ( २२ फेब्रुवारी, १९१४ – १९ फेब्रुवारी, २०१२) रेनेटो दलबेको यांचा जन्म दक्षिण इटलीच्या कॅटेन्झेर  (Catanzaro) येथे झाला. ते इटालीयन अमेरिकन होते. त्यांचे संपूर्ण लहानपण समुद्रकिनारी असलेल्या इम्पेरिया (Imperia) शहरात गेले. १६ व्या वर्षी उच्च शालेय शिक्षणानंतर त्यांनी टोरीनो (Torino) विद्यापीठात शिक्षण घेतले. गणित आणि भौतिकशास्त्र याविषयांमध्ये अतिशय रस असूनही त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शरीरशास्त्र आणि विकृतीशास्त्र या विषयामध्ये पदवी घेतली. त्यांना प्राध्यापक गुईसेप्पेलेवी (Giuseppe Levi) यांचे मार्गदर्शन लाभले. १९३६ ते १९३८ या कालखंडात त्यांनी सैन्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. १९४० साली द्वितीय महायुद्धात त्यांना फ्रांस आणि रशियामध्ये सीमेवर पाठवले गेले. तेथे ते जखमी झाले. बरे झाल्यानंतर त्यांनी जर्मनीच्या विरोधका बरोबर काम सुरू केले.

युद्धानंतर त्यांनी साल्वाडोर लुरिया (Salvador Luria) यांच्याबरोबर बॅक्टेरीयोफाजेस (Bacteriophages) वर काम सुरू केले. कॅल्टेक येथे त्यांनी विशेषत्वाने प्राण्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या पोल्योमा (Polyoma) कुटुंबातील विषाणूंवर संशोधन सुरू केले. १९५० च्या सुमारास आपला विद्यार्थी हॉवर्ड टेमीन (Howard Temin) यांच्याबरोबर अनेक महत्वाचे शोध लावले. अर्बुदाचे (ट्युमर) विषाणू आणि पेशींमधील जनुकीय पदार्थांमधील परस्परप्रक्रियांवर संशोधन करून त्यांनी निष्कर्ष काढले. अप्रत्यक्षपणे एका महत्वाच्या संशोधनासाठी दलबेको यांनी टेमीनआणि बाल्टिमोर यांना दोन प्रयोग शिकविले आणि रिव्हर्स ट्रान्स्कीप्टेज (Reverse Transcriptase) या संप्रेरकाचा शोध लागला. १९६२ पासून साक (Salk) संस्थेत आणि १९७२ पासून द इम्पेरीअल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट (आता–कॅन्सर रिसर्च यु. के. लंडन रिसर्च इन्स्टिट्यूट) मध्ये संशोधन केले. १९८६ साली मानवी जनुकीय प्रकल्पावर (Human Genome Project) काम करणाऱ्या अनेक वैज्ञानिकांपैकी ते एक होते. मिलन येथील नॅशनल कौन्सिल ऑफ रिसर्चच्या ऑफ बायोमेडिकल टेक्नोलोजीचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. ह्याच वेळी ते साक (Salk) इन्स्टिट्यूट ऑफ बायालॉजीकल स्टडीजमध्ये शिकवीत असत.

त्यांना १९७५ साली शरीरशास्त्र आणि औषधशास्त्र या विषयांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांना, सोसायटी फॉर जनरल मायक्रोबायालॉजी या संस्थेकडून मार्जोरी स्टीफन्सन पुरस्कार, कोलंबिया विद्यापीठ, थिओडोरपाक आणि हेरीइगल यांच्याकडून लुईसा ग्रोसहोर्वित्झ (Louisa Horwitz) पुरस्कार, नॅशनल अकादमी ऑफ सायन्सकडून सूक्ष्मजीवशास्त्रातील सेल्मान अ. वॉक्समन पुरस्कार, रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्यपद असे सन्मान मिळाले. डिसेंबर २०११ पर्यंत अत्यंत सक्षमपणे त्यांनी स्तनाच्या कर्करोगात ज्या स्टेम पेशींवर (स्कंध कोशिका) परिणाम होतो, त्यांच्या वर्गीकरणावर आणि त्यांना ओळखण्यासाठी लागणाऱ्याबाबींवर संशोधन केले. स्टेम पेशींची एक प्रतिकृती तयार करून त्यांनी प्रतिपादन केले की एकच कर्करोगबाधितपेशी, ज्यामध्ये कर्क स्टेमपेशींचे सर्व गुण आहेत, ती उंदरांमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. तिच्यामुळे गाठी किंवा ट्युमर तयार करणाऱ्या अनेक पेशींचे समूह तयार होऊ शकतात. या समूहांमध्ये कर्करोगाच्या स्टेम पेशींचे सगळे गुण असतात. त्यांच्या मते कर्करोग हा मानवी आयुष्यात कधीतरी अचानक उद्भवलेला रोग आहे ज्याचे मूळ जनुकांमध्ये अचानक होणारे बदल आहेत. त्यांनी असेही प्रतिपादन केले की घनगाठींमुळे स्तनांचा कर्करोग होतो. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सिद्ध केले की साध्या पेशींवर काही ऑन्को विषाणू हल्ला करतात ज्यामुळे त्यांच्यातील जनुके यजमान पेशींच्या जनुकांमध्ये जाऊन निगडीत होतात आणि त्या पेशींमध्ये निश्चित बदल घडवून आणतात. दलबेको यांना टेमीन आणि बाल्टिमोर यांच्या बरोबरीने नोबेल पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार या शोधासाठी होता की विषाणूंची जनुके साध्या पेशींपर्यंत पोचतात आणि त्यांचे मिळून प्रजनन होऊन रिव्हर्सट्रान्स्कीप्टेज नावाच्या संप्रेरकांमुळे विषाणूंच्या जनुकांच्या आरएनएच्या अनेक प्रती तयार होतात. त्यांचे कालांतराने डीएनएमध्ये रुपांतर होते आणि यजमान जनुकामध्ये सोडले जाते. दलबेको यांच्या संशोधनामुळे ऑन्को विषाणू कशा पद्धतीने वाढतात ह्याचे ज्ञान मानवाला झाले. त्याचा उपयोग योग्य प्रतिकार करण्याकरिता झाला. त्यांनी त्यांनी The design of life; Scienza; vita eav ventura; Virology, genieilnostrofuturo आणि The Human Genome ही पुस्तके लिहिली. त्यांचा मृत्यू ९८ व्या वर्षी झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे