टॉमस  क्राँबी  शेलिंग :  (१४ एप्रिल १९२१–१३ डिसेंबर २०१६). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. मेरीलंड विद्यापीठातील School Of Public Policy या संस्थेतील विदेशी कामकाज, राष्ट्रीय सुरक्षा तसेच अणुऊर्जा रणनीती (क्रिडा सिद्धांत–Game Theory) विश्लेषणाद्वारे विरोध-संघर्ष आणि सहकार्य या संकल्पनांच्या ज्ञानाची माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे कार्य केल्याबद्दल त्यांना रॉबर्ट जॉन ऑमन (Robert John Aumann) या गणिती व अर्थशास्त्रज्ञासमवेत २००५ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पारितोषिक विभागून देण्यात आले.

शेलिंग यांचा जन्म जॉन एम. शेलिंग आणि झेल्डा एम. आयरेस शेलिंग या दांपत्यापोटी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ऑक्लंड शहरात झाला. त्यांनी सॅन डिएगो हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९४४ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथून अर्थशास्त्र विषयातील ए. बी. ही पदवी त्यांनी मिळविली. १९५१ मध्ये त्यांनी प्रसिद्ध हार्व्हर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रविषयातील पीएच. डी. ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली. त्यांचा १९४७ मध्ये पहिला विवाह कॉरिन टिगे सॅपॉस यांच्याशी झाला. त्यांना तिच्यापासून चार पुत्र झाले. १९९१ मध्ये ते विभक्त झाले. त्याच वर्षी त्यांनी ऑलिस एम. कोलमन या युवतीशी दुसरा विवाह केला.

शेलिंग यांनी अमेरिकेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या युरोपमधील सुधारणाकार्यक्रमासाठी नियुक्त केलेल्या मार्शल प्लॅन संस्थेत १९५१–१९५३ या काळात काम केले. तसेच याच काळात अमेरिकेतील White House तसेच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकारी कचेरीत ते कार्यरत होते. १९५३ मध्ये त्यांनी शासकीय नोकरी सोडून येल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य सुरू केले. पुढे १९५८ मध्ये ते हार्व्हर्ड विद्यापीठांतर्गत जॉन एफ. केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथे ल्यूसिअस एन. लीटेराटर प्रोफेसर ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी म्हणून वीस वर्षांहून अधिक काळ अध्यापन केले. ते १९५८-५९ या मध्यंतरीच्या एक वर्षाच्या काळात Rand Corporation या संस्थेतही कार्यरत होते. त्याचप्रमाणे IIASA-लक्झेंबर्ग-ऑस्ट्रिया येथे १९९४ ते १९९९ या काळात संशोधन केले. शेवटी १९९० मध्ये त्यांनी मेरिलंड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला. अखेरपर्यंत ते तेथेच मानद प्राध्यापक म्हणून काम करीत होते.

शेलिंग यांनी १९६० मधील आपल्या द स्ट्रॅटिजी ऑफ कॉन्फ्लिक्ट या ग्रंथात सौदाशक्ती आणि व्यूहतंत्रवर्तन या संकल्पनांची मीमांसा केली आहे. यात प्रथमच शेलिंग यांनी केंद्रबिंदूची संकल्पना स्पष्ट केली असून ती ‘शेलिंग बिंदू’ (Schelling Point) या नावाने ओळखली जाते. त्यांचे अमेरिका व सोव्हिएट युनियन यांच्यातील अणुयुद्ध स्पर्धेसंबंधीचे कॉर्पोरेशनमधील विश्लेषण या ग्रंथाच्या रूपात प्रसिद्ध झाले. सदरच्या ग्रंथात त्यांनी सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठीची क्रीडाप्रणाली या गणिती तंत्राची मांडणी केली. जेव्हा स्पर्धा जिंकण्याच्या अनेक पर्यायांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी त्यांपैकी स्वेच्छेने निवडलेल्या एखाद्या पर्यायाची गुणकारिता (Efficacious) विचारात घेतली जाते, तेव्हा अनिश्चित प्रत्याघात हा निश्चित प्रत्याघातापेक्षा (Retaliation) जास्त परावर्तक (Deterrent) असतो व प्रत्याघाताचे सामर्थ्य हे कोणताही हल्ला परतविण्यासाठीच्या सामर्थ्यापेक्षा अधिक प्रत्याघाताक्षम असते, असे मत शेलिंग यांनी नोंदविले. याचाच अर्थ देशातील लोकांच्या संरक्षणापेक्षा तेथील शस्त्रसामग्रीचे रक्षण हा अणुयुद्धापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम उपाय असू शकतो. शेलिंग यांचा बदलासंबंधीचा हा दृष्टिकोण त्यांच्या १९६६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आर्म्स ॲण्ड इन्फ्ल्यूएन्स या ग्रंथात प्रतिबिंबित झाला. त्यांची Operation Rolling Thunder ही रणनीती अमेरिकेने १९६५ मध्ये उत्तर व्हिएटनाममधील निवडक क्षेत्रांवर हल्ले करून तेथील लोक युद्धापासून परावृत्त होतील या आशेने वापरली. जेव्हा सदरची रणनीती उत्तर व्हिएटनाम देशाला युद्धापासून परावृत्त करण्यास अपयशी ठरली, तेव्हा अणुबाँब हल्ले वाढविण्यात आले; तथापि पहिल्या तीन आठवड्यांत हल्ल्यांचा उपयोग न झाल्यास त्याचा त्याग करावा या शेलिंग यांच्या या संदर्भातील सल्ल्याकडे अमेरिकन सरकारने साफ दुर्लक्ष केले.

शेलिंग यांनी हार्व्हर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना आंतरराष्ट्रीय व्यापारवाटाघाटी करण्यासंदर्भात आपली क्रीडा सिद्धांत वापरात आणली. सदरच्या प्रयोगामुळे १९७८ मध्ये त्यांचे मायक्रोमोटिव्ह्ज ॲण्ड मॅक्रोबिहेव्हीअर आणि १९८४ मध्ये चॉइस ॲण्ड कॉन्सीक्वेन्स असे दोन अतिप्रभावशाली ग्रंथ साकार झाले. १९९१ मध्ये ते जेव्हा American Associationचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले, तेव्हा त्यांनी १९९२ मध्ये आपल्या Some Economics Of Global Warming या अध्यक्षीय संबोधनात Carbon Tax लागू करण्याबाबतची आग्रही भूमिका मांडली. त्यांच्या मते, हवामानबदल हे विकसनशील राष्ट्रांपुढे मोठे आव्हान असून, अमेरिकेपुढे उभारण्यात आलेले आव्हान हे अतिरंजित स्वरूपाचे आहे. मार्शल योजनोत्तर कालखंडात आलेल्या अनुभवांच्या आधारे त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, विश्वविषयक तापमान ही सौदाबाजीची समस्या मानली पाहिजे. जर सबंध जगाने उत्सर्जन कमी केले, तर विकसनशील देशांना सर्वाधिक फायदे मिळतील आणि विकसित देशांना सर्वाधिक खर्च सोसावा लागेल. २००२ मधील Foreign Affairs या वादग्रस्त लेखात शेलिंग यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बी. बूश यांच्या युनो परिषद Kyoto Protocol या वातावरणातील बदलासंबंधातील प्रस्तावाला विरोध करण्याच्या धोरणाचे Green House Gases व जागतिक तापमान यांमधील संबंध सिद्ध न झाल्याने व असे बहुद्देशीय सामंजस्य व्यवहारात आणणे कठीण असल्याचे समर्थन केले. २००३ मध्ये युनोच्या कोपनहेगेन सामंजस्य कराराचा मसुदा तयार करण्यासाठी नियुक्त केल्या गेलेल्या आठ सदस्यीय समितीचे ते तज्ज्ञ सदस्य होता. सदर समितीने पुढील सहस्रकासाठी जागतिक अग्रक्रम काय असावेत, तसेच एड्सनिर्मूलन, कुपोषणाविरोधी लढा व सीमाशुल्कातील अडथळे यांसंबंधी मौलिक सूचना केल्या. शेलिंग यांचे समस्याविश्लेषण केवळ गणिती पांडित्यावर (इसोटेरिक) आधारलेले नव्हते, तर ते तार्किक व व्यावहारिक पातळीवरचे होते आणि ते सर्वांना उपलब्ध होते. त्यामुळेच आर्थिक व राजकीय क्षेत्रावर त्याचा प्रबळ प्रभाव राहिला आहे.

शेलिंग यांनी १९७१ मध्ये वांशिक विलगतावादाच्या सिद्धांताचा शोधनिंबध प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी असे दाखवून दिले की, रंगरूपाने आपल्यासारख्याच असणाऱ्या आपल्या शेजारील लोकांविषयी अल्पसा आपलेपणा दाखविला, तर संपूर्ण विलगता नष्ट होईल.

https://www.youtube.com/watch?v=eJR_183h5VU

शेलिंग यांची स्वत: व सहकाऱ्यांबरोबर लिहिलेली ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : नॅशनल इन्कम बिहेव्हिअर (१९५१), इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स (१९५८), दि स्ट्रॅटेजी ऑफ कॉन्फ्लिक्ट (१९६०), स्ट्रॅटिजी  ऑफ कंट्रोल (सहलेखक – मॉर्टन एच. हॅलपेरिन, १९६१), आर्म्स ॲण्ड इन्फ्ल्युएन्स (१९६६), मायक्रोमोटिव्ह्ज अँड मॅक्रोबिहेव्हिअर (१९७८), थिंकिंग थ्रू दि एनर्जी प्राब्लेम (१९७९), दि टेररिस्ट यूज ऑफ न्युक्लिअर वेपन्स (१९८१), चॉइस ॲण्ड कॉन्सिक्वेन्स (१९८४), क्रायसिस गेम २७ इयर्स लेटर (१९९१–सहलेखन), बार्गेनिंग, कम्युनिकेशन, ॲण्ड लिमिटेड वॉर (१९९३), दि कॉन्व्हेन्शनल स्टेट्स ऑफ न्युक्लिअर वेपन (१९९४), कॉस्ट्स ॲण्ड बेनिफिट्स ऑफ ग्रीनहाउस गॅस रिडक्शन (१९९५), स्ट्रॅटिजिन ऑफ कमिटमेंट ॲण्ड अदर ऐसेज (२००६). शिवाय त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.

शेलिंग यांना नोबेल पस्मृती पुरस्काराबरोबर त्यांच्या संशोधनकार्याबद्दल पुढील पुरस्कार लाभलेत : नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस पुरस्कार (१९९३), येल विद्यापीठाची मानद डॉक्टरेट (२००९), तसेच मँचेस्टर विद्यापीठानेही त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून सन्मानित केले.

शेलिंग यांचे बेथिस्डा, मेरिलंड येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा