बाजारातील अशी परिस्थिती, जेथे दोन एकाधिकार संस्था म्हणजेच एकच विक्रेता आणि एकच ग्राहक एकमेकांच्या समोर खरेदी-विक्रीसाठी असतात. श्रमबाजारात जेव्हा श्रमाची मागणी व श्रमाचा पुरवठा करणाऱ्या दोन एकाधिकार संस्था एकमेकांच्या समोर येत असतात, तेव्हा द्विपक्षीय मक्तेदारी निर्माण होत असते. द्विपक्षीय मक्तेदारी हे अलीकडे निर्माण झालेल्या उद्योगसंस्थांच्या मालकांच्या संघटना व मजूर संघटना या दोन पक्षांच्या मजुरांच्या वेतननिश्चितीशी संबंधित आहे. या दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी परस्परांच्या सहकार्यातून वेतन, कामाचे तास, बोनस इत्यादी गोष्टी ठरवत असतात; परंतु ते ठरवत असताना मजूरसंघटनेला वेतन व रोजगार या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत मालक व मजूर या दोघांपैकी ज्यांची सौदाशक्ती जास्त असेल, त्यांच्या बाजूने करार ठरतो. मालकसंघटना कमीत कमी वेतन देण्याचा प्रयत्न करतात, तर मजूर संघटना जास्तीत जास्त वेतन घेण्याचा प्रयत्न करतात. रोजगारात मोठी वाढ मिळत असल्यास थोड्या वेतनकपातीला मजूरसंघटना मान्यता देतात. सांघिक करारात मालक व मजूर यांच्यातील सौदाशक्ती, उद्योगधंद्यातील परिस्थिती, संघटनेतील आर्थिक व राजकीय उद्दिष्टे यांवरून वेतनाचा दर ठरविला जातो.

श्रमबाजारातील द्विपक्षीय मक्तेदारी व वेतननिश्चिती : श्रमबाजारातील द्विपक्षीय मक्तेदारी या परिस्थितीत श्रमिक संघटनेतील मक्तेदारी पुरवठ्याच्या बाजूने असते, तर मालकाच्या संघटनेतील मक्तेदारी मागणीच्या बाजूने असते. मजूरसंघटना मजुरांना सीमांत प्राप्ती = वेतन मिळवून देण्यात व मजुरांचे शोषण थांबवण्यासाठी प्रयत्नशील असतात. श्रमबाजारातील द्विपक्षीय मक्तेदारी व वेतननिश्चिती हे खाली दिलेल्या आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करण्यात आले आहे :

आकृतीमध्ये ‘अक्ष’ अक्षावर मजुरांची संख्या व ‘अय’ अक्षावर सीमांत उत्पादकता व वेतन दाखवले आहे. सरासरी प्राप्ती वक्र व सीमांत प्राप्ती वक्र हे ऋणवक्र आहेत. ते डावीकडून उजवीकडे खालून वरच्या दिशेने जातात. या परिस्थितीत ‘इ३’ (जिथे सीमांत वेतन = सीमांत प्राप्ती उत्पादकता) समतोल प्राप्त होऊन ‘अव१’ मजुरांना ‘अक’ वेतन मिळते. भांडवलदार मजुरांना ‘अड’ (सरासरी प्राप्तीप्रमाणे- बिंदू ‘इ१’ येथे) वेतन देतो; परंतु हे सीमांत वेतन नसल्याने मजुरांचे शोषण होते. जेव्हा मजूर एकत्र येतात, तेव्हा मजुरांचा पुरवठा वक्र ‘अक्ष’ अक्षाला समांतर बनतो (सरासरी प्राप्ती=सीमांत प्राप्ती१ वक्र). या स्थितीत मजूरसंघटना बिंदू ‘इ२’ (जेथे सरासरी प्राप्ती=सीमांत प्राप्ती=सीमांत उत्पादकता) या समतोलाप्रमाणे ‘अब’ एवढ्या वेतनाची मागणी करतात. यामुळे ‘अव२’ मजुरांना रोजगार मिळतो. या प्रकारे सामूहिक सौदाशक्तीद्वारे मजूरसंघटना वेतन आणि रोजगारात वाढ करू शकतात. जर सीमांत प्राप्ती उत्पादकतेपेक्षा वेतन कमी मिळत असेल, तर मजूरसंघटना आपल्या प्रयत्नाने वेतनवाढ करू शकते. त्याचप्रमाणे मजुरांची सीमांत उत्पादकता कायम स्वरूपाने वाढून, उत्पादनवाढ करून वेतनवाढ करणेसुद्धा शक्य होऊ शकते.

समीक्षक : श्रीराम जोशी