द्विविक्रेताधिकार हा बाजारातील एक अपूर्ण बाजार आकार आहे. अन्य आकारांमध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पविक्रेताधिकार इत्यादींचा समावेश होतो. या स्पर्धेच्या आकारांमध्ये विक्रेत्यांनी वस्तूचे स्वरूप, प्रवेशासंबंधीच्या शर्ती, अनिश्चिततेचे प्रमाण, परस्परावलंबित्व यांबाबतीत अनेकविध मिश्रणे शक्य आहेत. तसेच त्यांतील काही मिश्रणे व्यवहारात कमी आढळली आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ फ्रान्सिस इसीड्रो एजवर्थ, कुर्नो आणि चेंबरलीन यांनी द्विविक्रेताधिकारांच्या संदर्भात तीन अभिजात प्रारूपे विकसित केली आहेत. त्यांच्या प्रारूपानंतर ४५ वर्षांनी फ्रेंच गणितज्ज्ञ जोसेफ बरट्रँड यांनी इ. स. १८८३ मध्ये सदर प्रारूपांचे पुनरावलोकन करून किंमत हे चल निर्णय घेण्याच्या संदर्भात अधिक निर्णायक चल आहे, असे मत मांडले. त्यांनी विकसित केलेल्या प्रारूपामध्ये असे सूचित केले आहे की, प्रत्येक विक्रेत्याचे उद्दिष्ट महत्तम नफा मिळविणे हा असतो व दोघांना असलेली बाजारातील मागणी समान असते.

पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी या बाजारांच्या आकारांमध्ये विक्रेत्यांना स्पर्धेतील धोरणात्मक निर्णयाचा विचार करावा लागत नाही, ही एक गोष्ट समान असते. मक्तेदारीमध्ये स्पर्धेचा अभाव असल्याने स्पर्धेचा प्रश्नच उद्भवत नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धकाचे स्थान इतके नगण्य असते की, स्पर्धा करण्याचा तो विचारच करू शकत नाही. द्विवेक्रेताधिकार किंवा अल्पविक्रेताधिकार स्वरूपाच्या बाजारामध्ये स्पर्धकांची संख्या इतकी कमी असते की, प्रत्येक स्पर्धकाला दुसऱ्या स्पर्धकाच्या धोरणांचा, प्रतिक्रियांचा विचार लक्षात घ्यावाच लागतो. उदा., स्पर्धकाने बाजारात आणलेले उत्पादन, त्यांची किंमत इत्यादी.

बरट्रँड यांच्या प्रारूपानुसार उद्योगसंस्था अनेक चलांच्या आधारे व अनेक स्तरांवर स्पर्धा करू शकतात. तसेच त्या किंमतविषयक निर्णय, उत्पादनाचे प्रमाण, गुणवत्ता यांच्या आधारे स्पर्धा करू शकतात. सर्वांत प्राथमिक स्वरूपाची स्पर्धा वस्तूच्या किंमतविषयक निर्णयावर आधारित असते. बरट्रँड यांचे प्रारूप याचे परीक्षण करून स्पर्धकांच्या किंमतविषयक निर्णयांच्या परस्परावलंबित्त्वाचा अभ्यास करते. त्याच्या प्रारूपाची गृहिते पुढीलप्रमाणे : (१) बाजारात दोनच उद्योगसंस्था आहेत. (२) त्यांची उत्पादने एकजिनसी आहेत. (३) उद्योगसंस्था एकाच वेळी किमती ठरवितात. (४) प्रत्येक उद्योगसंस्थेचा सीमांत खर्च समान आहे. दोन्ही उद्योगसंस्था समान किंमत आकारतील, जी सीमांत खर्चाएवढी असेल. (५) द्विविक्रेताधिकार हा बाजारपेठेतील प्रत्येक उद्योग संस्थेच्या किंमतीपेक्षा थोड्या कमी किंमत पातळीपर्यंत उत्पादनाची विक्री करू शकतो. (६) कमी किंमत आकारताना त्याची अपेक्षा शेवटी अशी असते की, त्यामुळे विक्री वाढेल.

बरट्रँड यांच्या मते, किंमत वेगाने कमी केल्यावर ती अशा पातळीवर साध्य होईल जेथे किंमत =  सीमांत खर्च (सरासरी खर्च) आणि त्यानंतरच त्या संस्था बाजारातील प्रमाणात विभागून घेण्यास तयार होतील. यास पर्यायी विकल्पही आहेत. जर एका संस्थेचा उत्पादक खर्च दुसऱ्या संस्थेपेक्षा कमी असेल, तर ती संस्था दुसऱ्या किंमत कमी करण्याच्या धोरणाला रोखू शकणार नाही आणि कमी किमतीला विक्री करून जास्त नफा मिळवील (उत्पादन खर्च कमी असल्यामुळे) किंवा ती किंमत कमी करून बाजारपेठेवर पुन्हा ताबा प्रस्थापित करेल.

बरट्रँड यांच्या प्रारूपाचा भर हा उद्योगसंस्थेच्या किंमत निश्चितीच्या निर्णयावर आहे. कुर्नो व बरट्रँड यांच्या प्रारूपांच्या काही मर्यादा आहेत. दोन्ही चलांचा समावेश करण्यात त्यांना अपयश आले. उदा., जाहिराती, विक्रीविषयक अन्य कार्यक्रम, उद्योगसंस्थेची स्थाननिश्चिती व उत्पादनातील वस्तूभेद. दोन्ही प्रारूपांनी स्पर्धकांच्या तडजोडीची प्रक्रिया किती मर्यादेपर्यंत चालेल, ते निश्चित केलेले नाही. दोन प्रारूपांचा दृष्टीकोन स्थिर स्वरूपाचा आहे. तसेच दोन्ही प्रारूपे स्पर्धकांना बाजारपेठेतील मागणीचे अचूक ज्ञान आहे, असे मानतात. असे असले, तरी ज्या बाजारपेठांमध्ये उद्योगसंस्थांची संख्या दोनपेक्षा जास्त आहे, त्या बाजारपेठांमध्येही दोन्ही प्रारूपे लागू करता येईल.

समीक्षक : अनिल पडोशी