मँगॅनीज ब्राँझ हा मिश्रधातू खरेतर पितळाचा एक प्रकार असून यात ५९ % तांबे, ३९ % जस्त, १.५ टक्का लोखंड, १ टक्का कथिल आणि ०.१ टक्का मँगॅनीज असते. याच नावाच्या दुसर्या मिश्रधातूमधील धातूंचे प्रमाण असे असते : तांबे ६६ %, जस्त २३ %, लोखंड ३ %, ॲल्युमिनियम ४.५ % आणि मँगॅनीज ३.७ %. मँगॅनीज ब्राँझ ही संज्ञा चुकीची असून ती ६०% तांबे व ४० % जस्त असणार्या पितळ या मिश्रधातूसाठी वापरतात. हा मिश्रधातू अधिक कठीण व बळकट होण्यासाठी त्यात थोड्या प्रमाणात मँगॅनीज व कथिल किंवा ॲल्युमिनियम घातलेले असते. मँगॅनीज सुमारे १ टक्का असते. जेव्हा मँगॅनीज व ॲल्युमिनियम हे दोन्ही समान पण अल्प प्रमाणात असतात, तेव्हा ओतीव परिस्थितीत या मिश्रधातूचे ताणबल दर चौ.सेंमी.ला ४,८७५ किग्रॅ. असते.
विशिष्ट पोलाद व वर्धनशील घडीव लोखंडाऐवजी वापरण्यात येणारी याची ओतीवे पाण्याच्या पंपाचे घूर्णक, सागरी पंखे यांसाठी वापरण्यात येणार्या मँगॅनीज ब्राँझमध्ये धातू पुढील प्रमाणात असतात : तांबे ५६ %, जस्त ४१.५ %, मँगॅनीज ०.२५ टक्का, लोखंड १ टक्का, कथिल १ टक्का आणि ॲल्युमिनियम ०.२५ टक्का. वाळूच्या साच्यात हा वितळलेला मिश्रधातू ओतून बनविलेल्या ओतिवांचा शरण बिंदू दर चौ. सेंमी. ला २,७६० किग्रॅ., ताणबल दर चौ.सेंमी.ला ५,५२० किग्रॅ. आयामवर्धन २८ % असते. याच्या समानुपातित्वाची मर्यादा दर चौ. सेंमी. ला १,७८५ किग्रॅ. आणि BHN (Brinell Hardness Number) १४० असते.
मँगॅनीज ब्राँझ या मिश्रधातूंचे बहिःसारण व उष्ण दाबकर्तन सहजपणे करता येते. हे मिश्रधातू मोटारगाड्यांमध्ये पुढील गोष्टींसाठी वापरतात. दंतचक्र पेटीतील विवेचक बेचक्या, विविध बुशेस (Bushes), नियंत्रक दंतचक्र जोडचक्रे (Pinions), उच्च तन्यता सिलिंडर (चिती, दंडगोल) आणि निष्कास सांधा नट. मँगॅनीज ब्राँझ लोकोमोटिव्ह आस. पेट्यांसाठीही वापरतात. नौकांच्या बांधणीत नळ, तोट्या वगैरे अनेक भागांसाठी संक्षारण प्रतिबंधक मँगॅनीज ब्राँझ वापरतात. त्याचे सागरी लवणयुक्त पाण्याने संक्षारण होत नाही. काही रासायनिक कारखान्यांसाठीही मँगॅनीज ब्राँझ उपयुक्त आहे.
समीक्षक : डॉ. प्रवीण देशपांडे