जेम्स, विल्यम : (११ जानेवारी १८४२ –१९ ऑगस्ट १९१०). प्रसिद्ध अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व फलप्रामाण्यवादाचा एक संस्थापक. जन्म न्यूयॉर्क येथे. पित्याचे नाव हेन्री जेम्स (१८११–८२). ते धर्मशास्त्रवेत्ते होते. अमेरिकन कादंबरीकार हेन्री जेम्स (१८४३–१९१६) हा विल्यमचा भाऊ. पाच भावंडांत विल्यम वयाने सर्वांत मोठा होता. आपल्या मुलांनी स्वतंत्रपणे विचार करायला शिकावे व जगाच्या धकाधकीत त्यांनी आपले जीवनविषयक विचार घडवावे, असे विल्यमच्या वडिलांचे मत होते. यामुळे विल्यम व त्याच्या भावंडांचे शिक्षण औपचारिक रीतीने झाले नाही. लंडन, जिनीव्हा, पॅरिस इ. विविध ठिकाणी ही मुले शिक्षण घेत फिरली.
या प्रकारच्या शिक्षणाचा परिणाम असा झाला की, विल्यमला फ्रेंच आणि जर्मन भाषा उत्तम प्रकारे अवगत झाल्या; एका विशाल यूरोपीय संस्कृतीत त्याचे मन घडले. १८६४ मध्ये त्याने हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमध्ये नाव दाखल केले. १८६९ मध्ये तो एम्.डी. झाला; पण त्याने वैद्यकीय व्यवसाय केला नाही. त्यानंतर त्याला हार्व्हर्ड विद्यापीठात शारीर व शारीरक्रियाविज्ञानाच्या अध्यापकाची नोकरी मिळाली. या नोकरीत असताना त्याने एका नव्या विषयावर व्याख्याने दिली. तो विषय म्हणजे ‘शारीरक्रिया मानसशास्त्र’. या विषयाच्या संशोधनासाठी त्याने १८७६ मध्ये हार्व्हर्ड येथे दोन खोल्यांत आपली प्रयोगशाळा थाटली. प्रायोगिक मानसशास्त्राची अमेरिकेतील ही पहिली प्रयोगशाळा होती. लवकरच नोकरीत बढती मिळून साध्या अध्यापकाचा तो दुय्यम प्राध्यापक झाला. शारीरक्रिया मानसशास्त्र या विषयाला मान्यता मिळून १८८५ मध्ये जेम्स त्या विषयाचा मुख्य प्राध्यापक बनला. हार्व्हर्ड विद्यापीठात तो प्रथम तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक (१८८५–८९), नंतर मानसशास्त्र प्राध्यापक (१८८९–९७) आणि पुन्हा तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक (१८९७–१९००) म्हणून होता. १९०७ मध्ये तो सेवानिवृत्त झाला. हार्व्हर्डमध्ये त्याची कीर्ती सारखी वाढत गेली. प्रॅग्मॅटिझम ह्या ग्रंथाच्या प्रकाशानंतर तर त्याला त्या काळातील एक अग्रगण्य अमेरिकन तत्त्वज्ञ म्हणून सर्वत्र मान्यता मिळाली. शकॉरूआ (न्यू हँपशर) येथे त्याचे निधन झाले.
तत्त्वज्ञानाच्या नियतकालिकांतून तो ग्रंथपरीक्षणे, निबंध आणि लेख लिहीत होता. त्यामुळे एक तत्त्वज्ञ म्हणून तो सुरुवातीस प्रसिद्ध होता. त्याचा प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी हा ग्रंथ १८९० मध्ये दोन खंडांत प्रसिद्ध झाला आणि या विषयावरचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून त्याचे सर्वत्र स्वागत झाले. या ग्रंथाने जेम्सला आंतरराष्ट्रीय कीर्तीही मिळाली. मानसशास्त्रावर आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या ग्रंथांत या ग्रंथाइतका सहजसुंदर भाषेत लिहिलेला अन्य ग्रंथ नाही. ह्या ग्रंथाची महत्त्वाच्या यूरोपीय भाषांत भाषांतरे झाली. यातील निवडक भागाचा एक खंड तर अमेरिकेत मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक म्हणून अनेक वर्षे अभ्यासक्रमात होता. विल्यम जेम्सच्या या ग्रंथाने मानसशास्त्रीय क्षेत्रात महत्त्वाची वैचारिक क्रांती घडवून आणली. जेम्सच्या काळापर्यंतच्या बहुतेक सर्व मानसशास्त्रीय लेखनात बुद्धी आणि विचार यांनाच प्राधान्य देण्यात आले होते. जेम्सने मनाच्या इतर व्यापारांकडे आणि क्रियांकडे–भावना, इच्छाशक्ती, उद्देश इ.–लक्ष वेधविले. मनाची घडण संवेदनांच्या कणाकणांच्या जुळवणुकीने वा साहचर्याने होत नसून मनाच्या सर्व क्रियांमध्ये प्रवाहित्त्वाचे वा सातत्याचे तत्त्व कसे अनुस्यूत आहे, हे त्याने प्रथम निदर्शनास आणून दिले. पुढे उदयाला आलेल्या समष्टिवादी मानसशास्त्राच्या भूमिकेशी ही भूमिका जुळणारी होती. मानसशास्त्राला शारीरक्रियाविज्ञानाचा, विशेषतः मेंदूतील क्रियांचा पाया आहे, हे त्याने सिद्ध करून दाखविले. ह्यामुळे जेम्सचे मानसशास्त्र हे तत्त्वमीमांसात्मक शास्त्र नसून ती शारीरक्रियाविज्ञानाची एक महत्त्वाची शाखा आहे, अशी वैज्ञानिक जगात त्याला मान्यता मिळाली. स्वप्न, संमोहनविद्या, अंतर्मनातील व्यापार इ. अतर्क्य मानल्या गेलेल्या गोष्टींविषयी शास्त्रशुद्ध सिद्धांत कसे मांडता येतील, हे जेम्सने प्रथम दाखवून दिले.
विल्यम जेम्सच्या ग्रंथातील अत्यंत महत्त्वाचे प्रकरण ‘संज्ञाप्रवाह’ (The Stream of Consciousness) हे होय. आधीच्या मानसशास्त्रज्ञांनी जाणिवेसंबंधी लिहिताना जाणीव म्हणजे जणू घटनाघटनांचे एक गाठोडे आहे, अशा प्रकारचे विचार मांडले होते. जाणीव ही तुकड्या-तुकड्यात कापलेली नाही. ‘साखळी’ किंवा ‘श्रेणी’ यासारख्या शब्दांनी तिचे यथार्थ वर्णन होऊ शकत नाही. ती मुळी जोडलेली गोष्टच नाही. जाणीव एक प्रवाह आहे. तिच्याविषयी बोलताना आपणाला जाणिवेचा प्रवाह, संज्ञाप्रवाह, विचारप्रवाह असे शब्द वापरायला हवेत. जेम्सच्या या शोधाने बौद्धिक जगात मोठी क्रांती घडून आली. संज्ञाप्रवाहासंबंधी लिहिताना भाषेच्या मर्यादांची आपणाला तात्काळ जाणीव होते, असे जेम्सने म्हटले आहे. आपल्या मनातील संज्ञाप्रवाहाचे यथार्थ वर्णन करू शकणाऱ्या नव्या भाषेची निर्मिती करणारी लेखकांची एक नवी पिढी जेम्सच्या या वैचारिक क्रांतीमुळे उदयास आली.
जेम्सच्या मानसशास्त्राची प्रसिद्धी त्याने मांडलेल्या भावनेच्या सिद्धांताने विशेष झाली. हा सिद्धांत मानसशास्त्रात ‘जेम्स-लांग सिद्धांत’ या नावाने ओळखला जातो. सी. जी. लांग (१८३४–१९००) या डॅनिश शारीरक्रियाविज्ञानवेत्त्याने या प्रकारचा सिद्धांत याच सुमारास मांडला म्हणून त्याचेही नाव जेम्सच्या नावाबरोबर ह्या सिद्धांतास जोडण्यात आले. तत्कालीन मानसशास्त्रात आणि सर्वसामान्य व्यवहारात असे मानण्यात येते की, भावनांचा परिणाम म्हणून काही शारीरिक घटना दृष्टोत्पत्तीस येतात. उदा., राग आला की माणूस लाल होतो, भीतीने शरीरात कंप निर्माण होतो इत्यादी. जेम्सचे म्हणणे असे की, राग किंवा भीती ही शरीरात त्या त्या स्थितीत निर्माण झालेल्या शारीरिक घटनांची संविती आहे. भीतीमुळे कंप निर्माण होतो असे नसून, कंप निर्माण होऊ लागताच त्या शारीरिक अवस्थेची जी जाणीव तिला आपण ‘भीती’ असे नाव देतो. जेम्स-लांग यांच्या या सिद्धांतावर पुष्कळ चर्चा व वाद झाले; परंतु आता शेरिंग्टन वगैरेंच्या शास्त्रशुद्ध प्रयोगानंतर हा सिद्धांत मागे पडला आहे.
जेम्सच्या लेखनशैलीचा लौकिक त्या काळात झाला आणि आजवरही तो टिकून आहे. अत्यंत कठीण सिद्धांत सोपे करून मांडण्याची त्याची हातोटी इतरांना क्वचितच साधेल. उपमा, चटकन मनाची पकड घेतील असे दृष्टांत आणि सहजस्फूर्त विनोद हे त्याच्या लेखनशैलीचे विशेष आहेत.
प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी हा ग्रंथ फार विशाल असल्याने, दोन वर्षांनी जेम्सने त्याची संक्षिप्त आवृत्ती काढली. आर्थिक दृष्ट्या या पुस्तकाने त्याचा खूप फायदा झाला. यानंतर १९०२ मध्ये जेम्सने द व्हारायटीज ऑफ रिलीजियस एक्सपीरियन्स हे पुस्तक प्रसिद्ध केले. धार्मिक अनुभवाचा तटस्थपणे व मानसशास्त्रीय दृष्टीने विचार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता; पण हा प्रयत्न करीत असता जेम्सने जी मते प्रगट केली आहेत, ती त्याची स्वतःची मते आहेत. जेम्सचे पहिले मत असे की, जगात जे श्रेष्ठ धर्म प्रस्थापित झाले आहेत त्यांच्या श्रेष्ठतेचे कारण त्यांचे तत्त्वज्ञान नसून त्यांच्या योगे येणारा अनुभव, हे होय. दुसरे असे की, धर्माचे सिद्धांत आणि आचरणतत्त्वे कितीही विचित्र वाटली, तरी धर्मामुळे अनुभवाला येणारे जीवन हे माणसाला अगदी हवेहवेसे आहे. तत्कालीन वैद्यकीय भौतिकवादाप्रमाणे माणसांचा धर्मभोळेपणा अथवा त्यांना येणारे धर्मानुभव ही त्यांच्या शारीरिक व मानसिक वैगुण्यांची किंवा विकृतींची निदर्शने होत. जेम्सला हे मान्य नाही. ‘दुरित’, ‘पाप’ आणि ‘दुःख’ ही दैनंदिन जीवनातील विदारक सत्ये आहेत, त्यांच्यामुळे माणसाने ईश्वरी श्रद्धेचा मार्ग स्वीकारणे स्वाभाविक आहे व साधुसंतांनी सांगितलेला प्रेमाचा मार्ग समाजव्यवस्थेला आवश्यकही आहे.
जेम्स हा फलप्रमाण्यवादाचा (Pragmatism) एक प्रवर्तक मानला जातो. फलप्रामाण्यवादाचा उल्लेख जेम्सने प्रथम ‘द विल टू बिलिव्ह’ या निबंधात (१८९७) केला आणि १९०७ मध्ये त्याने या विषयावर प्रॅग्मॅटिझम हा स्वतंत्र ग्रंथही लिहिला. जेम्सला कोणतेही तत्त्वमीमांसकीय तत्त्वज्ञान पटत नसे. त्या काळात हेगेलने रचलेले तत्त्वज्ञान फार मान्यता पावले होते. केवळ बुद्धीने सत्य हुडकून काढता येते, या हेगेलच्या मताला जेम्सने कसून विरोध केला. जेम्सच्या मते तत्त्वज्ञान हे विज्ञानाप्रमाणे अनुभवप्रणीत व अनुभवाधिष्ठित तर्कमार्गाने जाणारे असले पाहिजे. एका सत्यापासून दुसऱ्या सत्याकडे, एका गृहीतकाकडून दुसऱ्या गृहीतकाकडे जाणे हा तत्त्वज्ञानाचा क्रम असतो. ‘हे सारे फोल नाही’ अशी श्रद्धा असणे हेच खरे धार्मिक गृहीतक आहे, असे त्याने ‘द विल टू बिलिव्ह’ मध्ये मानले आणि हे गृहीतक सिद्धही करता येत नाही व खोटेही ठरविता येत नाही, हे विशद केले. मग ते मानण्याचे जर सुखी जीवन जगता येत असेल, तर तसे का मानू नये? असल्या विचारातच जेम्सचा फलप्रमाण्यवाद घडला गेला. त्याला एका गोष्टीची मनोमन खात्री पटली होती की, आपल्या सर्वच श्रद्धा आपण अगदी बुद्धिपुरस्सर विचार करून घडवीत नसतो. बऱ्याचशा श्रद्धा गृहीतकेच असतात. मग सत्य श्रद्धा म्हणजे जे गृहीतक आपल्याला वापरता येते, ज्याच्यायोगे आपणाला सुख मिळते, इच्छित फळ मिळते ते, असे मानायला काय हरकत आहे?
जेम्सच्या फलप्रामाण्यवादावर अनेक आक्षेप घेतले गेले आहेत. एखादे गृहीतक वापरता येते, त्यांचे उपयोजन करता येते व म्हणून ते स्वीकारार्ह आहे, असे म्हटले तर त्याचा अर्थ असा होतो की, त्या गृहीतकाने बऱ्याचशा गोष्टी सुसंगतपणे समजून घेता येतात. वैज्ञानिक विचारात गृहीतकाच्या संकल्पनेचा अर्थ असा लावण्यात येतो. परंतु हा अर्थ मान्य करून जेम्सने त्याच्याशी दुसऱ्या एका अर्थाची गल्लत केली आहे, असा टीकाकारांचा आक्षेप आहे. जे गृहीतक मान्य करण्याने सुख मिळते, ते गृहीतक स्वीकारार्ह असते असे मानण्याने आपण अर्थांतराची तार्किक चूक करीत आहो, हे जेम्सच्या ध्यानात आले नाही. नोकरीतून जेम्स १९०७ साली निवृत्त झाला. आपल्या शेवटच्या पुस्तकात आपले शेवटचे महत्त्वाचे विचार प्रगट करावे या उद्देशाने त्याने १९०९ साली अ प्लूरॅलिस्टिक यूनिव्हर्स हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकाची शैली व्याख्यानांच्या शैलीसारखी आहे. पुस्तकाच्या अर्ध्या भागात हेगेल, फेक्नर आणि बेर्गसाँ यांच्या सिद्धांतांचा सुबोध परिचय करून देण्यात आला आहे व उरलेल्या भागात जेम्सचे मौलिक अनुभववादाचे (Radical Empiricism) आणि बहुसत्तावादाचे (Pluralism) तत्त्वज्ञान विशद करण्यात आले आहे. आपली संवेदने, भावना, विचार या सर्वांचा जो प्रवाह आपण सतत अनुभवीत असतो तो व त्याने व्यापलेले बाह्य, सदैव बदलणारे विश्व या एकमेकींशी गुरफटलेल्या दोन गोष्टींनी आपले ‘वास्तव’ बनलेले आहे. या वास्तवापलीकडे शुद्ध, केवल, अज्ञेय अशी सत्ता असते, असे तत्त्वज्ञानात अनेकदा मानण्यात येते; पण तसे काही मानण्याची जरूर नाही. मौलिक अनुभववादाच्या दृष्टीने सारे वास्तव विविधतेने, संघर्षाने परिपूर्ण आहे. अद्वैताने मानलेली सुसंगतता, एकजिनसी पारलौकिकता कुठेही नाही. बहुसत्तावाद मानण्यानेच तत्त्वज्ञानातील कित्येक कूट प्रश्न सुटतात. जसजशा मानवी श्रद्धा, गृहीतके अधिक सफल बनतील, तसतसे मानवी जीवन अधिकाधिक परिपूर्ण बनत जाईल, अद्वैताच्या पूर्णतेवर श्रद्धा ठेवण्यासाठी हे विश्व माया आहे, असे जे मानावे लागते, तसे ते बहुसत्तावादाच्या बाबतीत मानावे लागत नाही. यामुळे अद्वैतापेक्षा बहुसत्तावाद तत्कालीन शास्त्रीय जगात विशेष मान्यता पावला.
जेम्सच्या कामगिरीचे समालोचन करताना त्याच्या मानसशास्त्रीय लेखनाला जसा पहिल्या प्रतीचा मान दिला जातो, तसा त्याच्या तत्त्वज्ञानातील विचारांना दिला जात नाही. ‘संशयवादाच्या आधारावर बांधलेला श्रद्धेचा डोलारा’, अशी त्याच्या तत्त्वज्ञानावर बर्ट्रांड रसेलने टीका केली आहे. देवाऐवजी देशावर श्रद्धा ठेवली तर ती चालते, म्हणून ती मानणारा जेम्सचा फलप्रामाण्यवाद अस्सल धर्म आणि दांभिकता यांच्या सीमारेषेवर उभा आहे, असे इतर काही तत्त्वज्ञांचे मत आहे.
https://www.youtube.com/watch?v=vbB2IUhUY_U
संदर्भ :
- Allen, G. W. William James, A Biography, New York, 1967.
- Perry, R. B. The Thought and Character of William James, 2. Vols., Boston, 1935.
- https://plato.stanford.edu/entries/james/
- https://psychology.fas.harvard.edu/people/william-james
- https://www.biography.com/scholar/william-james
- https://www.iep.utm.edu/james-o/