मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे : (१९७९). माधव गुणाजी कोंडविलकर यांचे दैनंदिनीवजा आत्मकथन. १९६९ ते १९७७ या कालखंडातील अनुभव त्यात मांडले आहेत. कोंडविलकर हे चांभार या अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातीत जन्माला आल्यामुळे जातीयतेचे भयंकर चटके त्यांना सोसावे लागले. आपल्या कविता, कथा, कादंबरी, आत्मकथन या प्रकारातून त्यांनी दलित, पीडित व उपेक्षित समूहाच्या व्यथा, वेदना व्यक्त केल्या आहेत. माधव कोंडविलकर यांच्यावर चार्वाक, भगवान बुद्ध , महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून पिढ्यानपिढ्या जातिभेदाच्या भिंतीत अडकलेल्या आणि भिंती तोडून मुक्त होऊ इच्छिणार्या दलित, कष्टकरी, श्रमिक वर्गाचे दु:ख मुखर केले आहे. मुंबई व कोकणातील दलित व कामगार वर्गाची होरपळ कोंडविलकरांनी आपल्या लेखनातून तीव्रपणे मांडलेली आहे.
माधव कोंडविलकर यांचा जन्म मौजे देवाचे गोठणे (सोगमवाडी) या खेड्यात झाला. कोकणातील खोत आणि कुळवाडी यांच्याकडून दलित, कष्टकऱ्यांचे शोषण केले जात होते. कोकणातील या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीतून कोंडविलकरांचे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे आत्मकथन आकाराला आले आहे. प्रथम ते १९७७ मध्ये तन्मयच्या दिवाळी अंकात छापले गेले. चांभार समाजातील रीतीरिवाज, श्रद्धा – अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, व्यसनाधीनता यावर त्यांनी मार्मिक भाष्य केले आहे. चर्मकार समाजातील आर्थिक दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, आपापसातील वादविवाद याचे प्रत्ययकारी वर्णन कोंडविलकरांनी केले आहे. या आत्मकथनात लेखकाने कौटुंबिक दारिद्र्याचे, संघर्षाचे, भुकेचे आणि व्यावसायिक उपेक्षेचे तटस्थपणे चित्रण केले आहे. एक सुशिक्षित – सुसंस्कृत मनाच्या शिक्षकाची सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर होणारी घुसमट हा या आत्मकथनाचा विषय आहे.
मुक्कामपोस्ट देवाचे गोठणेतून कोंडविलकरांचे कविमन डोकावते. पुस्तकांच्या वाचनातून ते डोळस बनले आहेत. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीचा परिणाम त्यांच्या मनावर झालेला आहे. म्हणूनच धर्म, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि जातीयतेला ते नकार देतात. चांभार कामाची त्यांना घृणा वाटते. चांभार म्हणून पदोपदी अपमानास्पद वागणूक दिली जाते. दलित जातीत जन्मलेल्या, शिकलेल्या आणि आत्मभान प्राप्त झालेल्या तरुणाच्या वाट्याला आलेले तुटलेपण मुक्कामपोस्ट देवाचे गोठणे मध्ये स्पष्ट जाणवते. त्यांचे अंतर्मन बंड करून उठते. पण प्रस्थापित व्यवस्थेचे ते काहीच करू शकत नाहीत. केवळ दैनंदिनीत प्रतिक्रिया नोंदविण्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही, या जाणिवेने कोंडविलकर अनेकदा अस्वस्थ होतात. गावोगावचे चांभार वाडे पेटून उठतील का? आपल्या न्याय्य हक्कासाठी झगडतील का? अन्यायाविरुद्ध बंड करतील का? असे असंख्य प्रश्न कोंडविलकर यांच्या मनाला पडतात. ‘मानसिक कोंडीत सापडलेल्या कोंडविलकरांना समाजव्यवस्थेविरुद्ध जाण्याचे बळ एकवटता येत नाही. त्यामुळे विद्रोहाचा सूर मोठा होताना आढळत नाही. निराशेची, हतबलतेची भावना मात्र सर्वत्र जाणवते.
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे मध्ये राजापूर परिसरात महार, चांभार, कुणबी इत्यादी जातींमध्ये बोलली जाणारी राजापुरी बोली वापरली आहे. संवादासाठी बोलीचा उपयोग केला असला तरी निवेदन प्रमाण भाषेत आढळते. वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळा, म्हणी आणि वाक्प्रचार यामुळे गोठण्याचा परिसर जिवंत होऊन अवतरतो. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे माधव कोंडविलकरांचे आत्मकथन जीवनानुभव, भाषा, अभिव्यक्ती व जीवनमूल्य यादृष्टीने दलित समाजाचे यथार्थ दर्शन घडविणारे आहे.
संदर्भ : १. मुलाटे वासुदेव, दलितांची आत्मकथने : संकल्पना व स्वरूप, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, १९९९. २. पगारे म. सु., दलित साहित्याचा इतिहास, प्रशांत पब्लिकेशन्स्, जळगाव, २००५.३. कुसरे – कुलकर्णी आरती, दलित स्वकथने : साहित्य रूप, विजय प्रकाशन, नागपूर, १९९१.