भगत, दत्ता : (१३ जून १९४५). दत्तात्रय गणपतराव भगत. महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, वक्ते, नाटककार, समीक्षक आणि समाजसुधारक महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारकार्याचे व्यासंगी अभ्यासक. परिवर्तनवादी चळवळीचे भाष्यकार. कथा, ललितनिबंध, वैचारिक लेखन आणि संपादक म्हणूनही कार्य. त्यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील वाघी या गावी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण पीपल्स हायस्कूल, नांदेड (१९६२) येथे झाले.औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून बहिस्थ बी.ए.(१९६७) तर पीपल्स काॅलेज नांदेड येथून पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.१९७०) त्यांनी पूर्ण केले. माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी अध्यापनाला सुरूवात केली. श्री.शारदाभवन हायस्कूल, नांदेड (१९६२-१९६३) व पीपल्स हायस्कूल,नांदेड (१९६३-१९७०) येथे त्यांनी शिक्षक म्हणून प्रारंभी सेवाकार्य केले. त्यानंतर पदव्युत्तर विभाग, पीपल्स काॅलेज, नांदेड येथे मराठी विषयाचे अधिव्याख्याता म्हणून जून १९७० ते जून १९९७ या कालावधीत अध्यापनकार्य केले. याच दरम्यान मराठी विभागप्रमुख (१९८८-१९९७), उपप्राचार्य (१९९१-१९९५) आणि प्राचार्य (१९९५-१९९७) म्हणून या महाविद्यालयात प्रशासकीय काम पाहिले. जुलै १९९७ ते नोव्हें १९९७ या काळात ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक होते. डिसें १९९७ ते ३० जून २००५ या कालावधीत त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे प्रपाठक, प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून सेवा केली. भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य व्दारा आयोजित अमराठी भाषकांसाठी मराठी भाषेचे अध्यापन (१९६९-१९७०) या उपक्रमातही त्यांनी अध्यापन केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समितीचे उपाध्यक्ष आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे सदस्य सचिव म्हणून त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. साहित्य अकादमी,महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र शासन प्रयोगपूर्व निरीक्षण मंडळ, थिएटर अकादमी, विविध विद्यापीठे व इतरही संस्थांवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

दत्ता भगत यांनी विपुल साहित्य निर्मिती केलेली आहे. एकांकिका संग्रह – आवर्त आणि इतर एकांकिका (१९७८),चक्रव्यूह आणि इतर एकांकिका (१९८०), जहाज फुटलं आहे आणि इतर एकांकिका (१९८२) आणि निवडक एकांकिका (१९९६) ; नाटक – अश्मक (१९८५), खेळिया (१९८६), वाटा पळवाटा (१९८६) पुस्तकी वांझ चर्चा (२०१९); समीक्षा दलित साहित्य : दिशा आणि दिशांतर (१९९२), निळी वाटचाल (२००१), आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी (२००५), समकालीन साहित्य आणि साहित्यिक (२०१०), साहित्य समजून घेताना (२०१४) आणि विजय तेंडूलकर: व्यक्ती आणि वाङ्मय. मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास (२०२०) या त्यांच्या ग्रंथात आरंभापासून ते १९९० पर्यंतच्या मराठी नाटक आणि रंगभूमीचा समग्र इतिहास आलेला आहे. विजयी विश्व तिरंगा प्यारा (२००१) आणि मंडल आयोग: गैरसमज आणि आक्षेप (२००७) ही त्यांची वैचारिक लेखनाची पुस्तके आहेत. शोध पायवाटांचा (२००८) व पिंपळपानांची सळसळ (२०१०) ही दोन ललित लेखांची पुस्तके आहेत. मुलांसाठी वैचारिक संस्कार करणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली आहे. गोष्ट गोधराजाची (नाटिका,२००५), राष्ट्रभक्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर (चरित्र,२००३) आणि गोष्टी बिसापाच्या (२०१२) ही ती तीन पुस्तके होत. कै.नरहर कुरूंदकर यांचे दहा लेखसंग्रह, परिवर्तन: संकल्पना,वेध आणि वास्तव (डाॅ.जे.एम.वाघमारे गौरवग्रंथ) व तृतीय रत्न-महात्मा जोतीराव फुले ही त्यांची संपादने महत्त्वाची आहेत. आवर्त, जहाज फुटलं आहे या एकांकिका आणि अश्मक, वाटा पळवाटा या नाटकांचा इंग्रजी, हिंदी, तेलगू आणि कन्नड भाषेत अनुवाद आणि सादरीकरण झालेले आहे.

दत्ता भगत यांनी वेगवेगळे लेखनप्रकार हाताळले असले ; तरी नाटककार हीच त्यांची प्रतिमा अधिक ठळक झालेली आहे. त्यांची नाट्यनिर्मिती ही मराठी नाटक आणि रंगभूमीला नवा आशय प्रदान करणारी आहे. दलित नाट्य चळवळीचे ते साक्षीदार आणि विकासक आहेत. त्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. आवर्त ही त्यांची नाट्यलेखक म्हणून ओळख देणारी पहिली एकांकिका. ह्या एकांकिकांचे महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सादरीकरण झाल्यामुळे लेखन आणि सादरीकरण ह्या दोन्ही अंगाने दत्ता भगत हे नाव स्थिरावले. त्यात हिंदी – इंग्रजी भाषेत रूपांतर व सादरीकरण झाल्यामुळे त्यांचे नाव मराठी भाषेच्या वर्तुळाबाहेर पोचले. त्यानंतर प्रसिध्द झालेल्या तीन एकांकिका संग्रहामुळे ‘एकांकिका’लेखन प्रकारातले महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांचे स्वत:चे वेगळे स्थान मराठीत निर्माण झाले. त्यांच्या एकांकिका लेखनात सामाजिक विषमतेच्या समस्या केंद्रस्थानी आहेत. त्यातही प्रामुख्याने सर्व लेखन जन्मदलितांच्या वेदनेशी निगडीत आहे. पण या जाणीवेने ते सिमीत होत नाही. जन्मदलितांच्या वेदनेच्या निमित्ताने त्यांची लेखणी सर्वच जन्मजातींच्या वर्तुळापर्यंत विस्तारत जाते. त्यामुळे त्यांचे लेखन हिंदू समाजव्यवस्थेतल्या शोषणवृत्तीचे प्रातिनिधिक स्वरूपाचे चित्रण करते. म्हणूनच त्यांच्या एकांकिका लेखनास सार्वत्रिक स्वरूपाचे मूल्य लाभले आहे. तेच त्यांच्या पूर्ण नाटकांचेही वैशिष्ट्ये आहे.

दत्ता भगत यांच्या एकांकिकांच्या जाणीवरूपांचा विस्तार अधिक प्रभावीपणे त्यांच्या पूर्ण नाटकात झालेला आहे. त्यांनी लिहिलेल्या चार नाटकांमुळे ते एक भारतीय पातळीवरचे नाट्यलेखक म्हणून प्रसिध्द पावले. अश्मक हे नाटक पौराणिक परिवेषातले राजकीय संघर्ष चित्रित करणारे नाटक आहे. तर खेळिया नाटकात शोषण प्रवृत्ती सुधारकी वळणाच्या पोषाखात दडवून ठेवणाऱ्या एका वडिलाशी त्यानेच लहानाचा मोठा केलेल्या जन्मदलित नारायणाशी उडालेला संघर्ष केद्रस्थानी येतो. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या तीन पिढ्यातील परस्पराशी होणारा संघर्ष आणि त्याच वेळी त्यांच्या भोवती असणाऱ्या सवर्ण शोषकांचा विळखा असा दोन्ही पातळीवरील उडणारा संघर्ष एकजीव होऊन व्यक्त झाल्यामुळे वाटा पळवाटा हे मराठी भाषेतले एक आगळेवेगळे नाटक ठरले. या नाटकांमुळेच भगत यांचे नाव सर्वतोमुखी झाले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर न पचलेल्या आंबेडकरवाद्यांच्या बुध्दीप्रामाण्यवादातील वांझपणाची चर्चा पुस्तकी वांझ चर्चा  या नाटकातून भगत यांनी केलेली आहे. त्यांच्या समग्र नाट्यलेखनाचा सामाजिक आशय अस्वस्थकारी नि आत्मशोधात्मक आहे.

नाट्य लेखनाइतकीच भगत यांची समीक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी आपल्या समीक्षा लेखनातून सामाजिक-सांस्कृतिक दृष्टीने साहित्याचे तटस्थपणे मूल्यमापन केले आहे. त्यातून त्यांचा समंजस व समन्वयवादी दृष्टीकोन प्रकट होतो. त्यांनी दलित साहित्याच्या वाटचालीची परखड मीमांसा करत आपली स्वतंत्र भूमिका विशद केली आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या महापुरूषांचा वाटा आहे, अशा महापुरूषांसंबंधीच्या लेखनाचा परामर्शही घेतला आहे. आधुनिक मराठी साहित्याच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे त्यांनी मांडलेले नवे आकलन अभ्यासकांना नवा दृष्टीकोन देणारे आहे. समकालीन साहित्य आणि साहित्यिक यांचा घेतलेला वेध व साहित्यशास्रातील संकल्पनांचे सामाजिक दृष्टीतून केलेले विवेचन मोलाचे आहे. विजय तेंडूलकरांच्या लेखनाची समग्रताही त्यांनी अधोरेखित केली आहे. त्यांची समग्र समीक्षा ही सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने बध्द आहे. आस्वादक स्वरूपाच्या या समीक्षेचा वैचारिकता हा मूलधर्म आहे.

समीक्षेसोबतच मूलभूत असे इतिहासलेखनही त्यांनी केले आहे. आरंभापासून ते इ.स.१९९० पर्यंतच्या मराठी नाटक आणि रंगभूमीचा विस्तृत आढावा त्यांनी इतिहासविषयक ग्रंथातून घेतलेला आहे. नाटक(संहिता) आणि रंगभूमी (प्रयोग) यांच्या एकत्रित इतिहास लेखनाचा हा मराठीतील पहिलाच प्रयत्न आहे. समग्र मराठी नाट्यव्यवहार कवेत घेण्याचा प्रयत्न या लेखनातून झालेला आहे. स्वत:ची यासंबंधीची निरिक्षणे, मते आणि सम्यक दृष्टी ठेवून ऐतिहासिक संदर्भांची फेरतपासणी करत मूल्यमापनात्मक मांडणी केल्याने मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास हा ग्रंथ वेगळा ठरला आहे. दलितांचे प्रश्न हे सुटे नसतात तर समग्र समाजाचे प्रश्न असतात या भूमिकेतून त्यांनी दलितांना स्पर्श करणाऱ्या सर्वच प्रश्न नि वास्तवाची मीमांसा आपल्या वैचारिक व ललित लेखांतून केलेली आहे. मंडल आयोगाच्या अनुषंगाने त्यांनी केलेले चिंतन मूलगामी आहे. समकालाचे प्रगल्भ सामाजिक भान, इतिहास आणि वर्तमानाची वस्तुनिष्ठ चिकित्सा आणि सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय,आर्थिक, धार्मिक,जातीय अशा विविध व्यवस्थांमधील पेच समर्पकपणे त्यांच्या वैचारिक-ललित लेखांतून प्रकटतात. म्हणूनच त्यांचे हे लेखन मूल्यवान ठरते. मुलांसाठी लिहिलेले लेखन प्रबोधनात्मक असून त्यातून नवा विचार व्यक्त होतो.

दत्ता भगत यांच्या संपूर्ण साहित्यनिर्मितीला वैचारिकतेचा स्पर्श झालेला आहे. परिवर्तनवादी विचाराच्या भूमिकेतून त्यांनी वर्तमान प्रश्न गांभीर्याने मराठी नाटक आणि रंगभूमीवर मांडले. बुध्द-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी विषम व्यवस्थेची पोलखोल केली. भारतीय संविधानाने दिलेल्या मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी प्रस्थापित व्यवस्थेविरूध्द लेखनाच्या माध्यमातून संघर्ष केला. जात-वर्ण-लिंग-धर्म यातून निर्माण झालेल्या भेदभावांना नाकारून त्याविरूध्द विद्रोह केला. समतोल दृष्टी ठेवून दलित जाणीवेचा आविष्कार सर्जनशील आणि समीक्षणात्मक लेखनातून केला. ही मराठी साहित्यातील महत्त्वाची उपलब्धी आहे. त्यांच्या लेखनावर महात्मा जोतीराव फुले आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्याचा वैचारिक प्रभाव आहे. नरहर कुरूंदकर यांच्या प्रभावातून त्यांची समीक्षा व वैचारिक लेखनाची स्वतंत्र शैली घडलेली आहे.

जाॅन हाॅपकिन्स या अमेरिकेतील न्यूयार्क येथील प्रकाशन संस्थेने आशिया खंडातील निवडक नाटक या मालेत थिएटर इंडिया नावाने भारतातील पाच नाटकांचा संग्रह प्रसिध्द केला. त्यात एरीन बी मी ह्यांनी Drama Contemporary India या संपादित ग्रंथात वाटा पळवाटा या नाटकाचा माया पंडित यांनी Routes and escape routes या नावाने केलेला इंग्रजी अनुवाद समाविष्ट केला गेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे पाच लेखन पुरस्कारसह आदर्श शिक्षक आणि दलितमित्र पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. महाराष्ट्र फाऊंडेशन या अमेरिकास्थित सन्मानानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. २००६साली नांदेड येथे झालेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

संदर्भ :

  • राहेगावकर, मधुकर (संपा), वाटा पळवाटा : कलन आणि आकलन, कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद,२००३.
  • लुलेकर, प्रल्हाद (संपा), जातक (दत्ता भगत गौरवग्रंथ), कैलास पब्लिकेशन्स,औरंगाबाद,२००५.