टॉड, कर्नल जेम्स : (२० मार्च १७८२–१७ नोव्हेंबर १८३५). राजपुतांच्या इतिहासाचा आद्य संशोधक व लेखक. इंग्लंडमधील इझ्लिंगटन येथे जन्म. १७९८ साली तो एक सामान्य शिपाई म्हणून भारतात आला. स्वतःच्या योग्यतेने तो लेफ्टनंट कर्नलच्या पदापर्यंत पोहोचला. पेंढाऱ्यांच्या विरुद्ध केलेल्या कार्यवाहीच्या वेळी त्याने रोटाह येथे गुप्तहेरखाते संघटित केले (१८१७). त्याने तयार केलेल्या युद्धक्षेत्राच्या व माळव्याच्या नकाशांचा पेंढाऱ्यांच्या पारिपत्याकरिता उपयोग झाला.
पश्चिम राजपुतान्यातील संस्थानांकरिता १८१८ साली पोलिटिकल एजंट म्हणून त्याची नेमणूक झाली. या काळात मेवाड व बूंदी संस्थानांत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने तेथील राजांना त्याने साह्य केले. त्याने केलेल्या संशोधनात १२२६ चा बिजोलियाचा शिलालेख महत्त्वाचा मानण्यात येतो. १८२२ साली त्याने प्रकृतीच्या सबबीवर आपल्या पदाचा राजीनामा दिला. बरोबर नेलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या व इतर साधनसामग्रीच्या साहाय्याने त्याने ॲनल्स अँड अँटिक्विटीज ऑफ राजस्थान हा बहुमोल ग्रंथ दोन खंडांत लिहिला (१८२९, १८३२). हा ग्रंथ म्हणजे राजस्थानच्या प्राचीन इतिहासाचा सुसंगत व पद्धतशीर वृत्तांत असून त्यात राजपुतांच्या सामाजिक, वांशिक व धार्मिक परिस्थितीची सांगोपांग चर्चा आढळते. १८२६ मध्ये तो विवाहबद्ध झाला. ट्रॅव्हल्स इन वेस्टर्न इंडिया हा त्याचा प्रवासवर्णनपर ग्रंथ त्याच्या मृत्यूनंतर १८३९ मध्ये प्रसिद्ध झाला.
हृदयविकाराच्या झटक्याने लंडन येथे तो मरण पावला. त्याने भारतातून नेलेली ऐतिहासिक सामग्री लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीत संगृहीत केली आहे.