वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्ताचा प्रसिद्ध ताम्रपट. पुण्यातील बळवंत भाऊ नगरकर यांच्याकडून हा ताम्रपट प्राप्त झाला. त्यांच्याकडे हा ताम्रपट वंशपरंपरेने आला होता. ताम्रपटात आलेल्या नामनिर्देशांवरून तो मूळतः सध्याच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील असावा, असा प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांचा कयास आहे.

प्रभावतीगुप्ताचा पुणे येथील ताम्रपट.

सदरील ताम्रपटाचे दोन पत्रे असून त्यांची लांबी २३ सेंमी. व रुंदी १४.४ सेंमी. आहे. दोन्ही पत्रे कडीमध्ये घातलेले असून त्या कडीवर मुद्रा आहे. मुद्रेचा आकार लंबवर्तुळाकार असून त्याची लांबी ७.२ सेंमी. व रुंदी ५.६ सेंमी. आहे. मुद्रेवर वरच्या भागात सूर्य व चंद्र आहेत. त्यानंतर चार ओळींच्या खाली एक फूल कोरलेले आहे. दोन्ही पत्र्यांच्या केवळ आतील भागावरच मजकूर लिहिला असून पहिल्या पत्र्यावर दहा व दुसऱ्यावर बारा ओळी आहेत. पहिल्या पत्र्यावरील अक्षरे ही दुसऱ्या पत्र्यावरील अक्षरांपेक्षा काहीशी मोठी आहेत. तसेच प्रत्येक अक्षराचा आकार ०.६२ सेंमी. आहे. दुसऱ्या पत्र्यावरील अक्षरांचा आकार ०.४७ सेंमी. आहे. ताम्रपटाचे वजन १.११६ किग्रॅ. आहे.

ताम्रपटातील लिपी कीलकशीर्षक असून काही अक्षरे वाकाटकांच्या इतर अभिलेखांमध्ये दिल्याप्रमाणे पेटिकाशीर्षक लिपीत आहेत. उदाहरणार्थ ‘ब’ आणि ‘स’. मिराशींच्या मतानुसार हे दानपत्र सर्वप्रथम पेटिकाशीर्षकानुसार लिहावयाचे असावे, परंतु नंतर ते कीलकशीर्षक लिपीत लिहिले गेले. या वरून असे दिसते की, याचा कोरक्या उत्तर भारतातील रहिवासी असावा, जो कीलकशीर्षकात लिहिण्यात निपुण होता. ‘ग’ आणि ‘स’ या अक्षरांना डावीकडे किंचित बाक दिसत आहे. ‘ण’ या अक्षराच्या डोक्यावरील आडव्या दंडासही बाक दिसतो. ‘अ’, ‘क’ आणि ‘र’ या अक्षरांतील उभे दंड लांब असून ते डावीकडे वळले आहेत. लेखामध्ये जिव्हामूलीय १२ व्या आणि १५ व्या ओळीत आले असून सहाव्या ओळीमध्ये उपध्मानीयाची खूण आहे. लेखामध्ये  ‘र्’  नंतर आलेल्या व्यंजनाचे द्वित्व झालेले आहे.

ताम्रपटाची भाषा संस्कृत असून पहिल्या २० ओळी आणि २२ वी ओळ गद्यरूपात, तर २१ वी ओळ पद्यरूपात आहे. मुद्रेवरील मजकूरही पद्यात लिहिलेला आहे.

युवराज दिवाकरसेन राज्य करीत असताना त्याच्या राज्यकालाच्या १३ व्या वर्षी कार्तिक शुक्ल द्वादशीस हे दानपत्र दिले, असा ताम्रपटात उल्लेख आहे. गुप्त राजांची वंशावळ, प्रभावतीगुप्ताचा वाकाटक युवराज द्वितीय रुद्रसेन याच्याशी विवाह, त्याच्या मृत्युनंतर राणीने केलेला राज्यकारभार या सर्व तत्कालीन ऐतिहासिक घटनांवरून या ताम्रपटाचा काळ सर्वसाधारणपणे इ. स. ४१५ ते ४२० हा येईल, असे अनुमान पुराभिलेखतज्ज्ञा शोभना गोखले यांनी काढले आहे.

मुद्रेवर चंद्र-सूर्य असून त्याखाली वाकाटकांचे भूषण असलेल्या वारसाहक्काने राज्यपद मिळालेल्या मातेचे आणि युवराजाचे हे शासन शत्रूंचे पारिपत्य करो, अशा आशयाचा मजकूर आहे.

ताम्रपटाच्या पहिल्या पत्र्यावर प्रभावतीगुप्ताने आपल्या माहेर व सासरकडील मंडळी व त्यांच्या वैशिष्ट्यांची महती कोरवून घेतली आहे. दुसऱ्या पत्र्यावर आचार्य चनालस्वामी यांना प्रभावतीगुप्तेने दिलेले ग्रामदान व तत्संबंधित गोष्टींचे वर्णन केले आहे. लेखाचा कोरक्या चक्रदास आहे.

ताम्रपटात उल्लेखिलेल्या स्थलनामांपैकी ‘नंदिवर्धन’ हे गाव रामटेकजवळील नगरधन असावे, असे पुरातत्त्वज्ञ रावबहादूर हिरालाल यांनी सांगितले. त्यानंतर मिराशी यांनी ताम्रपटातील उर्वरित गावे वर्धा जिल्ह्यात शोधली. ‘सुप्रतिष्ठ आहार’ म्हणजे सामान्यतः सध्याचा हिंगणघाट तालुका, तर ‘दंगुण’ म्हणजेच सध्याचे हिंगणघाट असावे. ‘विलवणक’ ग्रामाचा संदर्भ हिंगणघाटाच्या पश्चिमेस ४ किमी अंतरावरील ‘वणी’ या स्थानाशी लावला जातो. कदापिंजन हे आग्नेय दिशेस सुमारे ४.८ किमी. अंतरावरील कधाजन असावे, असे मिराशींचे मत आहे. या ताम्रपटात शीर्षग्राम व सिदिविवरक या स्थलनामांचाही उल्लेख आलेला आहे.

प्रभावतीगुप्ता ही गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त आणि महाराणी कुबेरनागा यांची कन्या. या ताम्रपटात राणीने आपल्या माहेरच्या घराण्याची वंशावळ दिली आहे. शके ३८० मधील देवसेनाचा हिस्सेबोराळा प्रस्तरलेख वाकाटकांचा कालक्रम ठरविणारा महत्त्वाचा दुवा आहे, परंतु हा प्रस्तरलेख उजेडात येण्यापूर्वी पुणे ताम्रपट हा त्यातील गुप्त सम्राटांच्या उल्लेखांमुळे वाकाटक राजांचा कालक्रम ठरविणारा एकमेव ऐतिहासिक आधार होता.

या ताम्रपटामुळे हे स्पष्ट होते की, गुप्त सम्राट तसेच प्रभावतीगुप्ता विष्णूची उपासना करीत असत. राणीने स्वतःस ‘भगवदभक्ता’ म्हटले असून कार्तिक शुद्ध द्वादशीस दान केले आहे. वैष्णव-पंथामध्ये एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथी अतिशय पुण्यकारक मानल्या आहेत. प्रभावतीगुप्ता रुद्रसेनाची अग्रमहिषी होती आणि युवराज दिवाकरसेनची माता होती, असे म्हटले आहे. रुद्रसेनाच्या मृत्यूनंतर तिने सु. १५ वर्षे राज्यकारभार पाहिला. तिने स्वतंत्रपणे ताम्रपट दान दिले. या सर्व गोष्टींवरून तिचे राजकारणातील श्रेष्ठत्व सिद्ध होते.

संदर्भ :

  • Pathak, K. B. & Dikshit, K. N. ‘Poona Plates of the Vakataka Queen Prabhavati- Gupta: The 13th Yearʼ, Epigraphia Indica, 15 (1919-20), 39-44, New Delhi, 1982.
  • Mirashi, Vasudev Vishnu, Corpus inscriptionum Indicarum, Vol. 5, Inscriptions of the Vakatakas, Ootacmund, 1963.
  • गोखले, शोभना, पुराभिलेखविद्या,  पुणे, २००७.

                                                                                                                                                                                                                                 समीक्षक : श्रीनंद बापट