सती राणकदेवी : (१९९७). विष्णु धोंडदेव कर्वे यांनी लिहिलेली स्वतंत्र ऐतिहासिक स्वरुपाची कादंबरी.दामोदर सावळाराम आणि मंडळी यांनी सन १८९७ साली प्रकाशित केली. पातिव्रत्याचा गौरव आणि सती प्रथेचे वर्णन हे या कादंबरीचे आशयसूत्र आहे. जुनागड संस्थानचे महाराज धैर्यासिंग यांची एकुलती-एक मुलगी राणकदेवी हिच्या आयुष्यात घडणार्‍या घडामोडींचे चित्रण प्रस्तुत कादंबरीत आले आहे. राणकदेवीची सावत्र आई भूवनसुंदरी हिला राणकदेवीचा विवाह पट्टण येथील सिद्धराजाशी होऊन, दत्तक पुत्राच्या निमित्ताने जुनागडची सत्ता आपल्या हाती रहावी असे वाटत असते. पण राणकदेवीने सौराष्ट्राचा राजकुमार खेंगार याला पसंत केलेले असते. इकडे भूवनसुंदरीचा हेर बिरबलही वेगळ्या प्रयत्नात असतो. राणकदेवीचा विवाह जर सिद्धराजाशी झाला तर त्याला सिद्धराजाकडून जहागिरी मिळणार असते. याच कामासाठी सिद्धराजाने त्याला जुनागडला पाठविलेले असते. पण आपला हेतू पूर्ण होत नाही असे पाहून भूवनसुंदरीला हाताशी धरुन बिरबल एक बेत आखतो व त्यानुसार राणकदेवीची दासी गुलाबी, वैद्य आणि काळ्या यांच्या मदतीने राणकदेवीला सिद्धराजापर्यंत पोहचवतो. दरम्यान राणकदेवीचा मावस भाऊ मदनसिंह त्याची प्रेयसी व राणकदेवीची जीवलग मैत्रीण इंदुमती यांच्या सहाय्याने या गुन्ह्याचा छडा लावतो. भूवनसुंदरीला हे कळल्यावर ती आत्महत्या करते. गुलाबी, वैद्य, काळ्या व बिरबल यांना मदनसिंह अटक करतो. इकडे राणकदेवीला पट्टणास आणली जाते, त्याच दिवशी सिद्धराज माळव्यावर स्वारी करण्याकरिता निघून जातो. पुढे राणकदेवी खेंगार राजाला पत्र लिहून झालेली घटना सांगून मदतीची अपेक्षा करते. त्यानंतर खेंगार राजा राणकदेवीची सुटका करतो. पुढे खेंगार राजा आणि राणकदेवीचा विवाह होतो. नंतर राणकदेवीच्या सांगण्यावरुन तिला कैदेत घालण्यासाठी सहभागी असणार्‍या सर्वांची सुटका होते. दरम्यान सिद्धराजाला सर्व हकीकत कळते. तो चिडून खेंगार राजाबरोबर लढाई सुरू करतो. खेंगार राजालाही सिद्धराजाकडून आपले वडील मोहनसिंग यांच्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो, तसे त्याने आपल्या पित्याला वचन दिलेले असते. सिद्धराज व खेंगार यांची लढाई बारा वर्षे चालते. पण अखेर बिरबल आपला भाऊ जुनागडचा किल्लेदार धीरवाल याला फितवतो व त्यामुळे सिद्धराजाला शहरात प्रवेश मिळतो. खेंगार राजाला व त्याच्या थोरल्या मुलाला सिद्धराज ठार मारतो, पण ऐनवेळी मदनसिंह तेथे येतो व सिद्धराजाचा पराभव करतो. तसेच बिरबलाला फाशी देतो. अखेर राणकदेवी सती जाते. राणकदेवीचा मुलगा मोठा होईपर्यंत मनसिंह राज्य सांभाळतो व त्यानंतर ते राज्य त्या मुलाच्या हवाली करुन आपल्या मुलाला प्रधानाच्या जागेवर नेमून इंदूमतीसह तिर्थाटन करण्यासाठी गिरणार पर्वतावर जातो.

कादंबरीची भाषा ओघवती असून, इ.स.१८२७ साली सतीबंदीचा कायदा होऊनही प्रस्तुत कादंबरीमध्ये सतीप्रथेचा गौरव करणारे लेखन केले आहे. सतीप्रथेचे गौरवीकरण आहे. शिवाय ही कादंबरी रंजकतेकडे झुकते.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन