मन्वंतर : दीनानाथ मनोहर यांची १९९९ साली प्रसिद्ध झालेली मन्वतंर ही एक महत्त्वाची कादंबरी आहे. मराठीतील ऐतिहासिक कादंबरी लेखनाचे एक उत्तम प्रारूप म्हणून या कादंबरीचा विचार महत्त्वाचा ठरतो. या कादंबरीत गतकालीन व समकाळातील दुर्लक्षित, वंचित, शोषितांच्या लढ्याला केंद्रवर्ती स्थान दिले आहे. या कादंबरीत दोन भिन्न काळ,दोन स्वतंत्र कथा आहेत. एक जागातिकीकरणाच्या विरोधात वडाळा गावच्या रहिवाशांचा लढा आणि दुसरे १८५७ च्या उठावातील टोपीकरांच्या विरुद्धचा भिल्ल आदिवासींचा लढा. पहिल्या भागाचा नायक गौतम आहे, तर दुसर्या भागाचा नायक नर्मद आहे. वर्तमान काळातील नायक गौतम आणि गौतमला पडणार्या स्वप्नातून वसाहतकालीन नर्मदचा जीवनपट लेखकाने साकारला आहे. या दोन्ही काळातील भोवतालच्या परिस्थितीचे सूक्ष्मपणे चित्रण आले आहे. यासाठी स्वप्न हा दुवा महत्त्वाचा ठरला आहे.
या कादंबरीचा महत्त्वाचा विशेष म्हणजे दोन्ही काळातील नायकांना विशिष्ट अशा संक्रमणावस्थेतून जावे लागते. दोन्ही नायक, निसर्गाच्या सानिध्यात स्वत:ला हरवू पाहणारे आहेत. दोघांनाही शोषित, वंचितांबद्दल कमालीचा आत्मीयभाव आहे. वंचितांच्या नजरेतून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा यातून प्रयत्न केला आहे. या दोन्ही नायकांच्या मनामध्ये एतदेशीयांच्या (नेटिव) लक्षाबद्दल साशंकता आहे. यासंदर्भात या दोन्ही नायकांना पडणारे प्रश्न विचारप्रवृत्त करतात. काळ-अवकाशाची प्रचंड गुंतागुंत, अनेक पात्रे-प्रसंग असतानाही वाचयनीयतेला कुठेही बाधा येत नाही, हे या कादंबरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
या कादंबरीतील दोन्ही भागातील निवेदक कथाबाह्य आहे. तो गौतम आणि नर्मदची कथा सांगतो. परंतु या कथा सांगत असताना त्याचा आवाज मंद होत जातो व गौतम व नर्मदचा आवाज पृष्ठस्तरावर येतो. बर्याचजागी पात्रच कथन करत आहे असे वाटते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींना सुसंघटित आकार प्राप्त झाला आहे. हा निवेदक प्रमुख पात्रांच्या माध्यमातून समाजव्यवस्थेतील विसंगतीवर बोट ठेवतो. यामागे उपरोधिकता आहे. ही कादंबरी अनेक प्रदेशात घडते, त्यामुळे त्या त्या प्रदेशातील बोलीरूपेही त्यांच्या कादंबरीत सहजपणे सामावलेली आहेत. काळानुरुप भाषिक पातळीवर झालेली बदल हाही या कादंबरीचा एक महत्त्वाचा विशेष आहे. या कादंबरीची शैली ही वैचारिकतेकडे, चिंतनशीलतेकडे झुकणारी आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून अनुभव चित्रणाला आकार दिला आहे.
संदर्भ : मनोहर दिनानाथ, मन्वंतर, राजहंस प्रकाशन, पुणे.