गवस, राजन : (२१ नोव्हेंबर १९५९). राजन गणपती गवस. मराठीतील नामवंत कथा-कादंबरीकार, कवी आणि ललितगद्यलेखक म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म कोल्हापूर येथील गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला.  मूळ गाव करंबळी ( जि. कोल्हापूर). त्यांचे एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण अत्याळ येथे झाले. त्यांनी १९८० साली गडहिंग्लज येथून बी.ए., १९८२ साली शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एम.ए.ची पदवी प्राप्त केली. तसेच ‘भाऊ पाध्ये यांचे कथात्म साहित्य’ या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली. मौनी विद्यापीठ, गारगोटी येथे २३ वर्षे, पुणे विद्यापीठ येथे २००५ ते २००७ या कालावधीत मराठीचे अध्यापन केले. ते २०१९ साली कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रांतातील गडहिंग्लज गारगोटी या प्रदेशातील सामाजिक सांस्कृतिक वातावरणात गवस यांची जडणघडण झाली. देवदासी व माकडवाला यांच्या चळवळीत त्‍यांनी सक्रीय सहभाग घेतला. राष्ट्रसेवा दल आणि युक्रांदमध्ये त्यांची वैचारिक घडण झाली. शोषितांविषयी आस्था, कृषिजन संस्कृतीचे वास्‍तवदर्शन आणि सामाजिक चळवळीतील अंतविरोधाचे प्रत्ययकारी चित्रण, अमानवी धर्मश्रद्धांचा प्रतिवाद, सामाजिक जीवनाकडे पाहण्याचा नवनैतिक दृष्टिकोण आणि सीमावर्ती बोलींचा सर्जनशील वापर हे गवस यांच्या साहित्यलेखनाचे विशेष होते.

हुंदका हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९८३ साली प्रसिद्ध झाला. ग्रामीण स्त्रियांच्‍या शोकात्म कहाण्या या कवितेत प्रकटल्‍या आहेत. चौंडकं (१९८५) आणि भंडारभोग (१९८८) या त्यांच्या दोन कादंबऱ्या अंधश्रद्धाळू धार्मिक मानसिकतेने लादलेल्या देवदासी, जोगत्यांची प्रथांमुळे व्यक्तींना सोसाव्या लागणाऱ्या दु:खाच्या व्यथा मांडणाऱ्या आहेत. सामाजिक अंधश्रद्धेतून स्त्रियांच्या वाट्याला येणारे लैंगिक गुलामी, वंचितता, कौटुंबिक अध:पतन आणि सामाजिक अवहेलना ही आशयसूत्रे चौंडकं कादंबरीत प्रथमतःच प्रभावीपणे आली. भंडारभोग ही कादंबरी जोगत्याच्या प्रथेचे चित्रण करते. धर्मसत्ता पुरुषाचे पौरुषत्व नाकारून त्याला नपुसंक बनविते. दु:ख, वेदना, सखोल परात्मता देते. याविषयीचेही चित्रण या कादंबरीत आले आहे. धिंगाणा (१९९२) आणि कळप (१९९७) या दोन कादंबऱ्यांतून गवस शिक्षित तरुणपिढीच्या नवनैतिक दृष्टिकोनातून सामाजिक वास्तवाचे मूल्यमापन करतात. तरुणांच्या वाट्याला आलेली निराशा, भणंगपणा आणि प्रस्थापित राजकीय प्रवृत्तीचा मुजोरपणा ही सूत्रे त्यांनी धिंगाणा कादंबरीत रेखाटली. आदर्श राजकीय व्यवस्था उभी करण्यासाठी प्रस्थापितांच्या अराजकी, भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला टक्कर देऊनही पदरी पडणार्‍या निराशेचे चित्रण केले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात साहित्य, राजकारण, शिक्षण, सांस्कृतिक चळवळी इत्यादी व्यवस्थांमध्ये आलेल्या भ्रष्टतेमुळे उद्विग्न झालेल्या संवेदनशील तरुणाची व्यथा कळप कादंबरीत चित्रित झाली आहे. कृषीव्यवस्थेच्या अपरिहार्यतेविषयीचे चिंतनही त्यांनी कळप मधून सूचकतेने मांडले आहे. साठीत जन्म घेतलेल्यांनी सामाजिक अभ्युदयासाठी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देऊनही सगळ्या व्यवस्था राजकारणाने पोखरल्याचा शोकात्म अनुभवाचे आणि परात्‍मभावाचे चित्रण या कादंबरीमध्ये आहे. साठीत जन्मलेल्या आणि ऐशीच्या दशकात चेहरा हरवलेल्या पिढीचे शोकात्म भावविश्व कळपमध्ये प्रभावीपणे आले आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तणकट (१९९८) या कादंबरीमध्ये ग्रामीण संस्‍कृतीतील जातीय ताणतणाव, जातसमूहांची अहंतेची मानसिकता, नेत्यांची भ्रष्ट मानसिकता, गावाच्या एकसंधतेसाठी समूहभावाची अपरिहार्यता अशी सूत्रे व्यक्त झाली आहेत. गावखेड्यांची सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्था विचारात न घेता गावगाड्यांसाठी गरजेच्या नसलेल्या विचारधारा जबरीने प्रसारित केल्यामुळे गावाची एकसंधता हरवत गेली आणि गावगाड्यात दुहीच्या विषारी मुळ्या फोफावत गेल्याचे वास्तव या कादंबरीत चित्रित झाले. आधुनिकतेच्या चुकीच्‍या हव्यास आघातांनी कोसळणारा गावगाडा एकसंधतेच्या जाणिवेने पुन्हा नवी उभारी घेऊ शकतो याचा जाणीवव्यूह या कादंबरीत आहे.ब बळीचा (२०१२)ही त्यांची अलीकडील कादंबरी कृषिव्यवस्थेत सर्व स्तरावर सुरू झालेल्या भ्रष्टतेविषयीचे वास्तव मांडते. शेतकर्‍यांच्या फसवणुकीचे अर्थशास्त्रामुळे सामान्य माणसांची विकासाची स्वप्न भंग पावल्याचे सूचन कादंबरीत आहे. समाज स्वार्थी, आत्मकेंद्री होत गेला, नागरीकरणामुळे शेतीनिष्ठ लोकसमूहाला अनेक प्रकारचे पीळ पडत गेले. या वास्तवाचे बहुपदर गवस यांनी या कादंबरीत मांडले आहेत.

रिवणावायली मुंगी (२००१) आणि आपण माणसात जमा नाही (२००९), ढव्ह आणि लख्ख ऊन (संपा. रणधीर शिंदे) असे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ग्रामीण स्त्रीबद्दलच प्रागतिक भावचित्रे, तिचा बंडखोरपणा, शोषण दारिद्र्य, अंधश्रद्धा, परंपरा आणि प्रतिष्ठेच्या कृतक कल्पनांचे चित्रण त्यात आहे. देणारी बंध झुगारून बंडखोर स्त्री या कथांच्या केंद्रस्थानी आहे. कृषी संस्कृतीतील सामान्‍य माणसांच्या व्यथांचे चित्रण आहे. शहर आणि खेडे यातील द्वंद्वशीलता हा त्यांच्या कथाचित्रणाचा एक आयाम आहे. काचाकवड्या (२००६), कैफियत (२०१०) आणि लोकल ते ग्लोबल (२०१९) हे त्यांचे ललितगद्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ललित-वैचारिक असे या लेखनाचे मिश्र स्वरूप आहे. या लेखनातून त्यांनी जागतिकीकरणोत्तर काळातील सामाजिक वास्तवाचे आणि बदलत्‍या सांस्कृतिक मूल्यांचे चित्रण केले आहे. गावगाड्यातील वर्तमान चिंतन त्‍यामध्ये आहे. ग्रामजीवनातील एकसंधतेला गेलेले तडे, नैसर्गिक शेतीचा विनाश, खेड्यांचे शोषण करणारी शहरी मानसिकता, कृषिमूल्यपरंपरा टिकवून ठेवणारी माणसे अशी अनेक सूत्रे काचाकवड्यामधील लेखनात आहेत. कैफियत मधील लेखनातही भोवताली घडणार्‍या घटनांविषयीचे चिंतन आहे.  हरवती मूल्यपरांपरा जपणारी माणसे आणि विनाशचक्रात गरगरणारी सृष्टीविषयीचे हे मूल्यात्मक लेखन आहे. जागतिकीकरणाच्‍या बहुमुखी आक्रमणाची नोंद लोकल ते ग्लोबल मधील लेखनात आहे.

भाऊ पाध्ये यांचे कथात्मक साहित्य (२००६), भाऊ पाध्ये यांची कादंबरी (२००७),भाऊ पाध्ये यांची कथा (२००९) हे त्यांचे स्वतंत्र समीक्षाग्रंथ प्रसिद्ध आहेत. तिरकसपणातील सरळता (रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावरील समीक्षा लेख) आणि चांगदेव चतुष्ट्याबद्दल (भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीवरील लेखसंग्रह) हे संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. मध्ययुगीन काळातील संत साहित्यात प्रकट झालेल्या गुरुशिष्य परंपरेविषयीचे मर्मग्राही चिंतन त्यांच्‍या रोकडे पाझर’ (२००९) ह्या समीक्षाग्रंथात आहे. केवळ पुरुषी गुरूपरंपरेला छेद देत चक्रधर-महदंबा, नामदेव-जनाबाई आणि तुकाराम-बहिणाबाई ह्या गुरूपरंपरेला त्यांनी चिंतनविषय बनविले आहे. मराठीचे आशययुक्त अध्यापन (१९९२),सीमा भागातील मराठी बोली (२००९) असे त्यांचे संशोधनावर आधारित ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

राजन गवस यांच्या लेखनाला राज्य शासन, साहित्य अकादमी, महाराष्ट्र फाउंडेशन, लाभसेटवार, भैरू रतन दमाणी इत्यादी विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या तणकट आणि भंडारभोग  या कादंबरीचे कन्नड आणि हिंदी अनुवाद झाले आहेत.

संदर्भ :

  • काजरेकर गोविंद, राजन गवस यांचे कथात्मक साहित्य, शब्द पब्लिकेशन.