भिमा शिवय्या स्वामी : (१५ ऑक्टोंबर १९४३). मराठी कादंबरीकार. जन्म सोनसांगवी ता. केज, जि. बीड येथे झाला. प्राथमिक शिक्षण जन्मगावी तर हायस्कुलचे शिक्षण बार्शी येथे सिल्व्हर ज्युबिली हायस्कुल मध्ये झाले. पी. यु. सी., एस. पी. कॉलेज पुणे येथे झाले. बी. एस्सी. शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे झाले. पुढे बहिस्त विद्यार्थी म्हणून बी. ए. व एम. ए. चे शिक्षण मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पुर्ण केले.  यू. म. पठाण यांच्या मार्गदर्शना अंतर्गत मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पीएच. डी साठी लक्ष्मण महाराजः व्यक्ति आणि वाङ्मय  या विषयावर संशोधन केले. महाविद्यालयात शिक्षण घेते वेळी १९६६ ते १९७४ पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात अनुरेखक म्हणून काम केले. १९७४ ते २००३ या कालावधीत श्री कुमारस्वामी महाविद्यालय, औसा येथे अध्यापक म्हणून काम केले. २००३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

१९८० नंतरच्या पिढीतील कादंबरीकार व संत साहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांची मुख्य ओळख आहे. दिशा (१९८०) हा पहिला त्यांचा कथासंग्रह. यातून आलेल्या कथांचे विषय हे तरुण नोकरी करणार्‍या सामान्य तुटपुंज्या पगारातून घरातील अडीअडचणींवर मात करत जगण्याची धडपड मांडतात. मानवी मनातील भाव भावनांचा चढ उतार अत्यंत नेमकेपणाने टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कथा तत्त्वचिंतनाच्या पातळीवर वावरणारी आणि तरीही कथात्मक संवेदनशीलतेला बाधा न येऊ देणारी कथा आहे. ही कथा मानवी जीवनातील अटळ नियती, प्रखर वास्तव आणि माणसाची मर्यादित कुवत यातून मूर्त होते. व्यामिश्र प्रतितीच्या पातळीवर नेणारी अर्थघन भाषा या कथेला अधिकच तीव्र प्रत्ययी करते. तसेच मिस्कील विनोद हाही या कथेचा जरतारी पदर आहे. गणुराया (२०००) ही कादंबरी भ्रष्टाचाराने पोखरलेल्या दुनियेतला एका असहाय्य जीवाची कथा मांडते. सर्वसामान्य माणसाप्रमाणे तो भ्रष्टाचार करु शकत नाही. म्हणून आपल्या बायकोचं सामान्य, चारचौघीसारख स्वप्नही तो पुर्ण करू शकत नाही. विलक्षण एकटेपणा भोगणारा पण आपल्या स्वप्नातील दुनियेत रमणारा, किडलेल्या वातावरणात सर्वसामान्य माणूस गणूरायापेक्षा वेगळ जीवन जगुच शकत नाही याचे वर्णन या कादंबरीत येते. प्रजा (२०११) ही त्यांची दुसरी कादंबरी. लक्ष्मण महाराजःव्यक्ती आणि वाङ्मय (१९९४) हा  पीएच. डी. प्रबंधाचे ग्रंथरूपात आलेला ग्रंथ. लक्ष्मण महाराज विरचित शिवभक्त कथा (१९९६) हा संपादित ग्रंथ या कथांनमधुन लक्ष्मण महाराजांनी शिवभक्तीचे श्रेष्ठत्व प्रतिपादन केले आहे. शिवपूजन नकळत घडले तरी त्यामुळे पापात्म्यांचा उद्धार होतो हे भक्ती सूत्र त्यांना सर्वांच्या मनावर बिंबवायचे आहे. दृष्टावृत्ती नष्ट होऊन सत्प्रवृत्ती वाढावी, अभक्ताचा भक्त व्हावा अशी त्यांची कामना आहे. म्हणून ते या कथांच्या माध्यमातून अमंगलाचा मंगलाकडे झालेला प्रवास दाखवतात, भक्तीच्या परीस्पर्शाने मानवी जीवनाचे सोने झाल्याचे वर्णन करतात. ‘शिवभक्त’ हाच त्यांच्या विचार विश्वाचा केंद्रबिंदू आहे. या कथासंग्रहातून जाणवते. ‘मन्मथस्वामींची अभंगवाणी’ (२००३) या ग्रंथात साधकदशेपासुन साक्षात्कारापर्यंत मन्मथस्वामींच्या भावजीवनातील विविध छटा त्यांच्या अभंगात दृष्टिगोचर होतात. त्यांच्या अभंगातील जिव्हाळा व तळमळ लक्षणीय आहे. ‘माझ्या मना लागो चाळा | पहावया संत डोळा’, ‘भलरों जाय जेणे | ऐंसे रसायन घेणे’ अशी त्यांच्या अभंगातील सूत्रबद्ध वचने जिव्हेवर सहज खेळतात. वीरशैव संत साहित्यात भरीव काम करणारे एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे.

संदर्भ : क्षेत्र संशोधन