पाटील, स्मिता : (१७ ऑक्टोबर १९५५−१३ डिसेंबर १९८६). मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील श्रेष्ठ अभिनेत्री. स्मिता पाटील यांचा जन्म पुणे येथे झाला. शिरपूर (धुळे) येथील मूळ रहिवासी असलेले त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे सहकारक्षेत्रातील अग्रणी नेते व माजी मंत्री होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील यासुद्धा सामाजिक कार्याशी जोडल्या गेलेल्या होत्या. राष्ट्र सेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिता पाटील यांनी प्रारंभीच्या काळात मुंबई दूरदर्शन येथे वृत्तनिवेदिका म्हणून काम केले, त्यानंतर पुणे येथील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ मधून त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.
स्मिता पाटील यांचे सुप्त गुण हेरून दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी निशांत (१९७५) व चरणदास चोर (१९७५) या चित्रपटांत त्यांना अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर गुजरातमधील सहकारी दूधचळवळीवर आधारित मंथन (१९७६) व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारलेला भूमिका (१९७७) या बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. भेदक आणि बोलके डोळे यांचा वापर करून त्यांनी केलेल्या संवेदनशील अभिनयामुळे त्यांना कलात्मक चित्रपटसृष्टीत मान्यता मिळाली. सावळा वर्ण असला, तरी विलक्षण बोलका (फोटोजेनिक) चेहरा हेही त्यांचे वैशिष्ट्य होते. याच बळावर त्यांनी भारतीय सिनेमात सत्तरीच्या दशकापासून प्रवाहित झालेल्या समांतर सिनेमातील वास्तववादी भूमिका साकारल्या आणि वास्तववादी अभिनयशैलीचा प्रत्यय जगभरातील सिनेरसिकांना दिला.
१९७९ ते ८६ च्या दरम्यान त्यांनी काही कलात्मक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या. भूमिका जगणे म्हणजे काय, याचा प्रत्यय त्यांनी प्रत्येक भूमिकेतून दिला. त्यामुळे त्यांच्या अभिनयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. यांत गमन (१९७९, दिग्द. मुजफ्फर अली); आक्रोश (१९८०, दिग्द. गोविंद निहलानी); चक्र (१९८१, दिग्द. धर्मराज); अर्धसत्य (१९८३, दिग्द. गोविंद निहलानी); मिर्च मसाला (१९८७, दिग्द. केतन मेहता) आदी चित्रपटांचा समावेश होतो. त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांतून समाजातील शोषित घटकांच्या व्यथा, वेदना आपल्या भूमिकांतून अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर साकारल्या. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी प्रादेशिक भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या. त्यांत मराठी जैत रे जैत (१९७७, दिग्द. जब्बार पटेल) व उंबरठा (१९८२, दिग्द. जब्बार पटेल) हे चित्रपट महत्त्वाचे आहेत. तसेच अकालेर संधाने (बंगाली, १९८०, दिग्द. मृणाल सेन); भवानी भवई (गुजराती, १९८०, दिग्द. केतन मेहता) या प्रादेशिक चित्रपटांत त्यांनी लक्षणीय भूमिका केल्या.
समांतर सिनेमात भूमिका करीत असताना त्यांनी व्यावसायिक चित्रपटांतूनही भूमिका केल्या. त्यांत नमक हलाल (१९८२, दिग्द. प्रकाश मेहरा); शक्ती (१९८२, दिग्द. रमेश सिप्पी) या चित्रपटांतून त्या वेळचे व्यावसायिक चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या समवेत, तर आखीर क्यों? (१९८५, दिग्द. जे ओमप्रकाश) या चित्रपटातून त्यांनी राजेश खन्ना यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर भूमिका केल्या. सद्गती (१९८१, दिग्द. सत्यजित रे) या दूरदर्शनपटासाठीही त्यांनी भूमिका केली होती. अभिनयात संवेदनशील असलेल्या स्मिता पाटील यांनी जाणीवपूर्वक सामाजिक चळवळींशी स्वत:ला जोडले होते, त्यातून येणारे अनुभव त्यांनी आपल्या भूमिका साकारण्यासाठी पूर्वपीठिका म्हणून वापरले. त्यांनी छायाचित्रणाचाही छंद जोपासला होता. त्यांचा एकाच वेळी समांतर आणि व्यावसायिक सिनेमाच्या क्षेत्रांत सारखाच वावर होता.
आपल्या अभिनयकारकिर्दीत त्यांना भूमिका, चक्र या चित्रपटांतील भूमिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. चक्रमधील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. १९८५ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्रीʼ किताब देऊन गौरविले होते. स्मिता, स्मित आणि मी हे त्यांच्याविषयी ललिता ताम्हणे यांनी लिहिलेले पुस्तक लोकप्रिय ठरले आहे. चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या अभिनेत्रीचा विवाह प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर यांच्याशी झाला होता. त्यांचा मुलगा प्रतीक बब्बर हा नवोदित अभिनेता आहे.
या सर्जनशील अभिनेत्रीचे मुंबई येथे अकाली निधन झाले.
समीक्षक – संतोष पाठारे