आनंद, चेतन : (३ जानेवारी १९२१ – ६ जुलै १९९७). हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेता. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधील लाहोर येथे झाला. त्यांचे वडील पिशोरीलाल आनंद हे लाहोरचे प्रथितयश वकील होते. चेतन आनंद यांनी भारतीय व पाश्चात्त्य अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण घेतले. हरिद्वारच्या गुरूकुल कागंडी विश्वविद्यालयात त्यांनी हिंदू शास्त्रवचनाचा अभ्यास केला व नंतर शासकीय महाविद्यालय, लाहोर येथून इंग्रजी भाषेची पदवी मिळवली. चित्रपटक्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी बीबीसी व डून स्कूल, डेहराडून येथे काहीकाळ नोकरी केली.  ते भारतीय काँग्रेसचे सदस्य देखील होते (१९३०).

इतिहासाचे प्राध्यापक असताना त्यांनी सम्राट अशोकवर एक पटकथा लिहिली होती (१९४०). ही पटकथा घेऊन ते मुंबईला आले व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक फणी मुजूमदार यांना दाखविली. मात्र त्यांनी चेतन आनंद यांना त्यांच्या राजकुमार या चित्रपटाकरता मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी करारबद्ध केले. हा चित्रपट १९४४ मध्ये प्रदर्शित झाला. याच काळात चेतन आनंद इंडियन पीपल्स थिएटर (इप्टा) या नाट्य चळवळीशी संबंधित संस्थेशीही जोडले गेले आणि दिग्दर्शनाकडे वळले. चेतन आनंद यांच्याव्यतिरिक्त इप्टा या संस्थेने रंगमंच आणि चित्रपटसृष्टीला अण्णाभाऊ साठे, ख्वाजा अहमद अब्बास, बलराज साहनी, विमल राय, उत्पल दत्त इत्यादी अनेक प्रतिभावंत अभिनेते व दिग्दर्शक दिले आहेत. मुख्यत्वे हे सर्वजण डाव्या विचारसरणीचे होते.    चेतन आनंद यांनी पहिल्या दिग्दर्शित केलेल्या नीचा नगर (१९४६) या चित्रपटाने भारतात वास्तववादी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली. या चित्रपटात जरी वर्ग संघर्षाची कथा असली, तरी ती गुलामगिरीसारख्या विषयावरही भाष्य करते. सरकार हा वाईट प्रवृत्तीचा बांधकाम व्यावसायिक गरीब वस्तीतील जागा ताब्यात घेतो. वस्ती तिथून हटवता यावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्त्या आखतो. यातून वस्तीतले लोक बिल्डरच्या विरोधात एकत्रित होतात व नायकाच्या मदतीने त्याच्याविरुद्ध यशस्वी संघर्ष करतात. या चित्रपटातील संवाद अतिशय प्रभावी आहेत. या चित्रपटासंदर्भात एक लक्षणीय बाब म्हणजे या चित्रपटाचे निर्माते रशीद अन्वर फाळणीनंतर या चित्रपटाची मूळ प्रत आपल्यासोबत घेऊन गेले; मात्र बऱ्याच वर्षानंतर प्रकाशचित्रणकार सुब्रतो मित्रा यांना कोलकात्याच्या एका रद्दीच्या दुकानात खराब होण्याच्या मार्गावर असलेली या चित्रपटाची रीळं सापडली. ही रीळे पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हकडे सुपूर्द करण्यात आली. या चित्रपटाला फ्रान्सच्या आतंरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवात ‘ग्रॅन्ड प्रीक्स’ हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारा भारताचा हा पहिला व एकमेव चित्रपट आहे.

१९५० मध्ये चेतन आनंद यांनी आपले दोन्ही लहान भाऊ देव आनंद व विजय आनंद यांना घेऊन ‘नवकेतन’ ही चित्रपटनिर्मिती संस्था स्थापन केली. या बॅनर अतंर्गत अफसर, बाझी, टॅक्सी ड्रायव्हर, फन्टुश, काला पानी, काला बाजार इत्यादी यशस्वी चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. १९५३ मध्ये हमसफर या चित्रपटात देव आनंद सोबत त्यांनीही भूमिका केली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अंजली आणि अर्पण या चित्रपटांसह काला बाजार, कांच और हिरा, किनारे किनारे, हिंदुस्तान की कसम इत्यादी चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. १९६० पर्यंतच चेतन आनंद नवकेतन बरोबर राहिले. त्यानंतर त्यांनी स्वतःची वेगळी ‘हिमालया फिल्मस्’ ही चित्रपटनर्मिती संस्था स्थापन केली.

टॅक्सी ड्रायव्हर (१९५४) या चित्रपटात चेतन आनंद यांनी महानगरातील जीवनाचा धांडोळा घेताना क्लबमधील जीवन, काळाबाजार करणारे, गुंड व मवाली यांच्या कात्रीत सापडलेली तरूणी इत्यादींचा परामर्ष घेतलेला आहे. फन्टुश (१९५६) हा त्यांचा वेगळ्या धाटणीचा लोकप्रिय विनोदी चित्रपट आहे. १९६२ मधील भारत-चीन युद्धावर बेतलेला हकीकत हा चेतन आनंद यांचा महत्त्वाचा युद्धपट मानला जातो. हा चित्रपट भारतीय सैनिकांच्या लढाऊ बाण्यावर तर प्रकाश टाकतोच; पण सैनिकांच्या कुटुंबाची व एक संवेदनशील माणूस म्हणून जगण्याची दुसरी बाजूही अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर आणतो. चित्रपटाची सशक्त पटकथा, अभिनय, गीतकार कैफी आझमींची सुंदर गाणी व संगीतकार मदन- मोहन यांचे तितकेच कर्णमधुर संगीत हे सर्व या चित्रपटची जमेची बाजू होय. या चित्रपटात केलेला पार्श्वध्वनीचा वापरही उल्लेखनीय होता. या चित्रपटाला त्या वर्षीचा उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

आखरी खत (१९६६) हा चेतन आनंद यांच्या प्रतिभेच्या विविधतेची साक्ष पटवणारा चित्रपट. बंटी नावाच्या एका दीड वर्षाच्या मुलाभोवती या चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. एका लहान मुलाच्या दृष्टीकोनातून संबंध चित्रपट सादर करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. जाल मिस्त्री या प्रतिभावान छायाचित्रकाराने या मुलाचे विविध अंगाने अप्रतिम छायाकंन केले. या चित्रपटातून तेवीस वर्षांच्या राजेश खन्नाला नायक म्हणून पहिली संधी मिळाली. हीर राँझा या चित्रपटात आणखी वेगळा प्रयोग त्यांनी केला होता. हा चित्रपट काव्यात्मक शोकांतिकेचा प्रकार होता. चेतन आनंदनी हा संपूर्ण चित्रपट एका कवितेसारखा चित्रित केला आहे. कैफी आझमी या शायरकडून त्यांनी संवाद लिहून घेतले. या संवादाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व संवाद काव्यमय (पद्यमय) होते. यानंतर एकाच वर्षी प्रदर्शित झालेले हँसते जख्म आणि हिंदुस्तानकी कसम हे दोन भिन्न प्रकृतीचे चित्रपट होते. १९८१ मधील कुदरत या राजेश खन्ना नायक असलेल्या चित्रपटाच्या कथेला ‘फिल्म फेअर’ पुरस्कार मिळाला.

विविध रेजिमेंटमधील भारतीय जवानांच्या सत्य घटनांवर आधारित परमवीर चक्र ही १९८८ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेली मलिका चेतन आनंद व केतन आनंद यांनी दिग्दर्शित केली होती.

चेतन आनंद यांचा विवाह उमा आनंद यांच्याशी झाला (१९४३). त्यांना केतन आनंद आणि विवेक आनंद ही दोन मुले. पण दोघांचे सूर न जुळल्याने ते विभक्त झाले. पण त्यांचा घटस्फोट झाला नाही. नंतर चेतन आनंद आणि अभिनेत्री प्रिया राजवंश हे दोघे अखेरपर्यंत एकमेकांच्या सोबतीने राहिले.

चेतन आनंद यांच्या जीवनावर आधारित चेतन आनंद : द पोएटिक्स ऑफ फिल्म या नावाचे पुस्तक त्यांची पत्नी उमा आणि मुले केतन व विवेक यांनी २००६ मध्ये प्रकाशित केले; तर यावर आधारित वृत्तचित्र २००८ मध्ये प्रदर्शित करण्यात आले. चेतन आनंद यांच्या सर्व चित्रपटांचे विषय अतिशय भिन्न होते. चित्रपटात वेगवेगळे प्रयोग करण्याचे धाडस त्यांनी केले.

समीक्षक : संतोष पाठारे