महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ते कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस पंचगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. केवळ पुराततत्त्वीय उत्खननामुळे ते प्रकाशात आले. त्यामुळे करवीरच्या इतिहासाची दोन हजार वर्षांची परंपरा उजेडात आली.

ब्रह्मपुरी येथील प्राचीन टेकाडावर इ.स. १८७७ मध्ये इ. स. पू. कालीन बौद्ध स्तूपाचे अवशेष मिळाले. त्यांतील बहुतांश मूर्ती बौद्ध होत्या. स्तूप भाजलेल्या विटांत बांधलेला व त्याचा व्यास सु. २५ मी. आणि उंची सु. २.५ मी. होती. स्तूपामध्ये असलेल्या दगडी पेटीतील करंडकात काही अवशेष होते. पेटीच्या झाकणावर आतील बाजूस अशोककालीन ब्राह्मी लिपीत व पाली भाषेत ‘बम्मसा दानम् धम्मगुप्तेन करितम्ʼ असा लेख आहे. त्याचा अर्थ ‘धर्मगुप्ताने ब्रह्म दान दिलेʼ असा होतो. त्याच्या अक्षरवाटिकेवरून तो इ.स.पू. तिसऱ्या शतकातील असावा. याबाबतचा एक शोधनिबंध प्राच्यविद्यासंशोधक रा. गो. भांडारकर यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध केला. त्या आधारे स्थानिक राजाराम महाविद्यालयाचे प्राध्यापक के. जी. कुंडणगार व आर. एस. पंचमुखी यांनी कोल्हापूर संस्थानकडून परवानगी घेऊन नोव्हेंबर १९४४ मध्ये येथे चाचणीउत्खननास प्रारंभ केला. पुढे २५ जानेवारी १९४५  रोजी उत्खननादरम्यान तीन मीटर खोलीवर सातवाहन काळातील वास्तू-अवशेषांत वैशिष्ट्यपूर्ण ब्राँझनिधीचा शोध लागला. यात मोठ्या हंड्यावर ठेवलेला एक लहान हंडा असे दोन हंडे, कढईत १०२ भारतीय व ग्रेको-रोमन बनावटीच्या कलात्मक ब्राँझेस व इतर महत्त्वपूर्ण वस्तू सापडल्या; परंतु या सर्व वस्तू स्तरबद्ध आढळल्याची नोंद मिळाली नाही. यांतील पोसायडन या ग्रेको-रोमन सागरदेवतेची ब्राँझची मूर्ती (१४.३ सेंमी. उंच) मूळ अलेक्झांड्रिया येथील असल्याचे ज्ञात झाले. तिचा काळ इ. स. पहिल्या शतकातील असल्याचे आढळून आले. पोसायडनव्यतिरिक्त हत्तिस्वाराची एक ब्राँझमूर्ती (५.१ सेंमी. उंच), बैलगाडीची प्रतिकृती, आरसे व मद्यकुंभ अशा उल्लेखनीय वस्तू मिळाल्या.

या पार्श्वभूमीवर डेक्कन कॉलेज, पुणे या संस्थेतर्फे पुरातत्त्वज्ञ हसमुख धीरजलाल सांकलिया व मोरेश्वर गंगाधर दीक्षित यांच्या नेतृत्त्वाखाली १९४५ – ४६ दरम्यान ब्रह्मपुरी येथे विस्तृत उत्खनन करण्यात आले. त्यात प्राचीन वसाहतीचे स्तरबद्ध पुरावशेष मिळाले. यामध्ये इ. स. च्या दुसऱ्या शतकातील विटांची घरे, सातवाहन राजांची नाणी, काळ्या-तांबड्या रंगांची मृद्भांडी या वस्तीच्या स्तरात मिळाली. शिवाय रोमन देवतांचे पुतळे, रोमन पुतळ्या, ब्राँझची भांडी, काचसामान यांचे विविध नमुने सापडले. सांस्कृतिक कालक्रमासाठी येथील पहिल्या उत्खननाच्या जागेपासून (टेकाड क्र.१) पूर्व दिशेला असलेल्या टेकाड क्र. २ येथे उत्खनन करण्यात आले. उत्खननातील विविध पुरावशेषांच्या आधारे येथील सांस्कृतिक क्रम ठरविता आला. त्यातून पहिला कालखंड सातवाहन (इ. स. पू. दुसरे शतक किंवा पहिले शतक ते इ. स. तिसरे शतक), शिलाहार (११ – १२ वे शतक), बहमनी काळ (इ. स. १५ – १६ वे शतक) आणि मोगल काळ (औरंगजेब, कारकिर्द १६५८ – १७०७) असे तौलनिक स्वरूपाचे कालखंड ठरविता आले. या कालखंडांत या जागी वस्ती झाली. मात्र येथे सलग वसाहत झाल्याचे पुरावे उपलब्ध होऊ शकले नाहीत.

ब्रह्मपुरी उत्खननातील विविध पुराव्यांच्या आधारे असे अनुमान करता आले की, या भागात सातवाहन काळातील व त्या काळाच्या समकालीन उत्तरेकडील संस्कृतीतील घरांच्या रचनेत वेगळेपण आढळते; मात्र घरांच्या कौलारू छपराच्या रचनेत साम्य आहे. येथील घरे भक्कम दगडी पायांवर उभी असलेली व घरांच्या बांधकामाकरिता वापरलेल्या विटा या भाजलेल्या, तसेच बिनभाजलेल्या होत्या. घरांची कौले खिळ्यांच्या साहाय्याने लाकडी तुळयांना ठोकून बसवीत. दारांची योजना लोखंडी बिजागरी व लाकडी चौकट यांतून आकाराला आणली होती. प्रत्येक घराला स्वयंपाकघरासह चार खोल्या व पुढे पडवी असे. घरात एक किंवा दोन चुली व जमिनीत पुरलेला रांजण असे. सांडपाण्याची व्यवस्था पक्क्या विटांनी बांधलेल्या शोषणकुंडांच्या माध्यमातून केली होती. रोजच्या वापरात काळ्या-तांबड्या वर्गात मोडणारी भांडीकुंडी होती. मातृदेवता हे श्रद्धास्थान होते.

उत्खननात उपलब्ध झालेल्या नाण्यांमुळे सातवाहन आणि महारठींच्या इतिहासावर नवीन प्रकाश पडला आहे. त्यात सातकर्णी राजाचे तांब्याचे चौकोनी नाणे सापडले. त्यावर षडारचक्र व स्वस्तिक आहे. शिवाय ब्राह्मी लिपीतील अक्षरे आहेत. नाण्यावरील अक्षरे अशोककालीन अक्षरांशी साम्य दर्शवितात. याशिवाय सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी (कार. इ. स. ६२–८६) याचेही एक तांब्याचे नाणे प्राप्त झाले आहे. त्यावरून गौतमीपुत्र सातकर्णीचा काळ निश्चितपणे ज्ञात होतो. तसेच कुर घराण्यातील काही राजांची तांब्यांची नाणी येथे मिळाली. यावरून ब्रह्मपुरी परिसरात बहरलेली संस्कृती आणि भारतातील व भारताबाहेरील समकालीन संस्कृती यांची सांगड घालता आली. उदा., चुटु, कुर, महारठी आणि प्रारंभीचे सातवाहन राजे हे समकालीन होते. गौतमीपुत्र सातकर्णी व यज्ञश्री सातकर्णी यांची नाणी सातवाहन सांस्कृतिक कालखंडातील असून गौतमीपुत्र सातकर्णी याच्या काळात हे नगर वैभवाच्या शिखरावर होते. उत्खननातून प्राप्त रोमन देवतांचे पुतळे, रोमन नाण्यांच्या प्रतिकृती (पुतळ्या), रोमन मद्यकुंभ यांवरून इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत येथून रोमन साम्राज्याशी होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार व सांस्कृतिक संबंध या बाबी उजेडात आल्या. संपूर्ण अवशेषांची व्याप्ती लक्षात घेता सातवाहनांच्या उत्तर काळात ब्रह्मपुरी (कोल्हापूर) हे ख्यातकीर्त नगर होते, तसेच शिलाहारांच्या काळात या परिसरात भरभराट होती. शिलाहार राजा गंडरादित्य (११०५–११४०) याने इ. स. ११२६ मध्ये येथील सूर्यमंदिराचा जीर्णोद्धार केला, तसेच ब्रह्मा व विष्णू अशी दोन नवी मंदिरे बांधली. ब्रह्मपुरीतील उत्खननात मिळालेले काही अवशेष व कलाकृती कोल्हापूर येथील टाउन हॉल शासकीय वस्तुसंग्रहालयात आहेत.

संदर्भ :

  • Deotare, B. C.; Joshi, P. S. & Parchure, C. N. ‘Glimpses of Ancient Maharashtra Through Archaeological Excavationsʼ, Pune, 2013.
  • Khadalawala, Karl J. Brahmapuri : A Consideration of the Metal  Objects Found in the Hoard, Lalit Kala, 7:29-75, 1960.
  • Puma, Richard Daniel De Eds. Begely, Vimala & Puma, Richard Daniel De ‘Roman Bronzes from Kolhapurʼ, Rome and India : The Ancient Sea Trade, pp. 82-112, Madison, 1991.
  • Sankalia, H. D. & Dikshit, M. G.  ‘Excavations at Brahampuriʼ(Kolhapur  1945-46), Pune, 1952.
  • जोशी, प्रकाश; दंडवते, प्रमोद, संपा. देगलूरकर गो. बं.; राणे, अमरसिंह; खणे, बी. डी.  ‘सातवाहनकालीन कोल्हापूरʼ, युगयुगीन करवीर इतिहास दर्शन, कोल्हापूर, २०१०.
  • देव, शां. भा. ‘हिप्पोकुर म्हणजेच कोल्हापूरʼ, दैनिक केसरी, पुणे, ५ मार्च १९८४.

समीक्षक – भास्कर देवतारे

प्रतिक्रिया व्यक्त करा