स्केल्टन, जॉन : (१४६० – २१ जून १५२९). इंग्रज उपरोधकार. त्याचे जन्मस्थळ आणि बालपण ह्यांविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही पण तो यॉर्कशरचा असावा. केंब्रिज विद्यापीठात त्याने शिक्षण घेतले. ग्रीक आणि लॅटिन भाषांवर त्याचे उत्तम प्रभुत्व होते. ऑक्सफर्ड, ल्यूर्व्हे आणि केंब्रिज ह्या विद्यापीठांनी त्याला ‘पोएट लॉरिअट’ ही सन्माननीय पदवी बहाल केली होती (१४९३). १४८९ मध्ये इंग्लंडचा राजा सातवा हेन्री ह्याच्या दरबारी स्केल्टनचा प्रवेश झाला.
तो स्वभावाने निर्भीड आणि स्पष्टवक्ता असला, तरी राजदरबारी त्याच्यावर अनुग्रह होताच. पुढे ड्यूक ऑफ यॉर्क ( हाच नंतर आठवा हेन्री म्हणून इंग्लंडच्या सिंहासनावर बसला) ह्याचा शिक्षक म्हणून तो नेमला गेला. १४९८ मध्ये स्केल्टनने धर्मगुरूची दीक्षा घेतली. १५०२ मध्ये नॉर्फकमधील डिस येथे रेक्टर म्हणून त्याची नेमणूक झाली आणि त्याचे निधन होईपर्यंत तो ह्या पदावर राहिला. मात्र १५१२ पासून त्याचे वास्तव्य लंडनमध्येच होते. त्याच सुमारास आठव्या हेन्रीने त्याला ‘ऑरेटर रेजिअस’ ह्या पदावर नेमल्यामुळे सार्वजनिक प्रश्नांच्या तसेच चर्चच्या संदर्भात राजाला सल्ला देण्याचे अधिकार त्याला प्राप्त झाले.
स्केल्टनच्या महत्त्वाच्या काव्यरचनांमध्ये द बौज ऑफ कोर्ट (१४९९) द टनिंग ऑफ एलिनोर रमिंग (१५१६) स्पीक पॅरट (१५२१) फिलिप स्पॅरो कोलिन क्लाउट (१५२२) व्हाय कम यी नॉट टू कोर्ट ? (१५२२) यांचा समावेश होतो. द बौज… मध्ये दरबारी जीवनावर उपरोधप्रचुर टीका आहे. फिलिप स्पॅरोचा सूर थट्टामस्करीचा आहे. एका तरुण मुलीचा लाडका पक्षी मांजराने खाल्ला, ह्या प्रसंगावर हे काव्य आहे. कवितेच्या पहिल्या भागात मरून गेलेल्या त्या पक्ष्यासाठी होणारा मॅस, त्या मुलीला झालेले दु:ख ह्यांचे वर्णन असून नंतर त्या मुलीची स्तुती केलेली आहे. कोलिन क्लाउटचा रोख धर्मगुरूंच्या आक्षेपार्ह वर्तनाविरुद्ध आहे. व्हाय कम यी नॉट... आणि स्पीक पॅरट मध्ये त्याने इंग्लंडचा धर्माधिकारी आणि मुत्सद्दी कार्डिनल वुल्झी ह्याच्यावरच हल्ला केला. त्याचे परिणामही त्याला भोगावे लागले. द टनिंग ऑफ … ह्या काव्यात तत्कालीन समाजातील कनिष्ठ स्तरावरचे जीवन त्याने चित्रित केलेले आहे.
मॅग्निफिसन्स (१५१६) हे एक सदाचार नाटकही ( मोरॅलिटी प्ले ) त्याने लिहिले. मध्ययुग आणि प्रबोधनकाल ह्यांच्यामधील संक्रमण काळातला हा कवी. आपले अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व त्याने जोमदारपणे जपले. अनघड आणि निर्भय काव्याविष्कार, सातवा हेन्री आणि आठवा हेन्री ह्यांच्या दरबारांशी त्याचे असलेले संदिग्ध संबंध, त्याच्या अनेक समकालीनांशी त्याने ओढवून घेतलेले शत्रुत्व आणि त्याचा सात्त्विक संताप त्याच्या कवितेतून प्रकट होताना दिसतात. १९२० नंतरच्या काही इंग्रज कवींवर त्याच्या विशिष्ट काव्यशैलीचा प्रभाव पडला. १४९० मध्ये इंग्लंडला भेट देणार्या इरॅस्मस (१४६६ – १५३६) सारख्या थोर व्यक्तीने स्केल्टनची कवी म्हणून प्रशंसा केली होती.
स्केल्टनच्या काही कविता सोळाव्या शतकात मुद्रित-पुनर्मुद्रित झाल्या आहेत. १८४३ मध्ये त्याच्या कवितांची प्रमाण, आधुनिक आवृत्ती प्रसिद्ध झाली.
लंडन येथे तो निधन पावला.
संदर्भ : https://www.britannica.com/biography/John-Skelton