रीड, हर्बर्ट : (४ डिसंबर १८९३−१२ जून १९६८). इंग्रज कवी, साहित्यिक, समीक्षक, तत्वज्ञ कला-साहित्यसमीक्षक. यॉर्कशरमधील मस्कोएटस ग्रेंज, कर्बीमुर्साइड येथे शेतकरी कुटुंबात जन्मला. एका शेतकरी मालकाच्या अधीन हे कुटुंब राहत होते. त्यांच्या लहान वयात वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर हे कुटुंब शेतात भाडेकरू असल्याने त्यांना शेत सोडले लागले. अशा विपरीत परिस्थितीत वेस्ट यॉर्कशायरच्या हॅलिफॅक्स येथील अनाथ मुलांसाठी शाळेत त्याने पुढील शिक्षण घेतले. त्याच्या आईने कपडे धुण्याचे काम मिळवून उदरनिर्वाह चालविला. पुढे अभ्यासात आणि वाचनात गती असल्याने पुढील अभ्यासासाठी त्याला लीड्स विद्यापीठात प्रवेश मिळाला. प्रथम महायुद्ध सुरू झाल्यामुळे लीड्स विद्यापीठातील शिक्षणातही व्यत्यय आला होता. लीड्‌स विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. पहिल्या महायुद्धात अधिकारी म्हणून त्याने सेनादलात नोकरी केली. त्यानंतर लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्यूझिअम’मध्ये त्याने काम केले (१९२२−३१). तसेच एडिंबरो विद्यापीठात अध्यापन केले (१९३१−३२). बर्लिंग्टन मॅगझिन ह्या नियतकालिकांचा तो संपादक होता (१९३३−३९).

रीडच्या समीक्षात्मक ग्रंथांत फॉर्म इन मॉडर्न पोएट्री (१९३२), आर्ट नाउ (१९३३), आर्ट अँड इंडस्ट्री (१९३४), आर्ट अँड सोसायटी (१९३६), एज्यूकेशन थ्रू आर्ट (१९४३), द फिलॉसफी ऑफ मॉडर्न आर्ट (१९५२) आणि द टू व्हॉइस ऑफ फीलिंग : स्टडीज इन इंग्लिश रोमँटिक पोएट्री ह्यांचा समावेश होतो. नेकिड वॉरिअर्स (१९१९), म्यूटेशन्स ऑफ द फीनिक्स (१९२३), द एंड ऑफ अ वॉर (१९३३) व ए वर्ल्ड विदिन अ वॉर (१९४४) हे त्याचे उल्लेखनीय काव्यग्रंथ. द इनोसंट आय (१९३३) हा त्याचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ पुढे द काँट्ररी एक्स्पीरिअन्स (१९६३) ह्या आत्मचरित्रात्मक ग्रंथात समाविष्ट करण्यात आला. द टेम्स अँड हडसन एन्‌यासक्लॉपीडिआ ऑफ द आर्ट्‌स (१९६६) ह्या कला विश्वकोशाचा सल्लागार संपादक म्हणून त्याने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

समीक्षक ह्या नात्याने रीडने नवी दृष्टी असलेल्या प्रयोगशील कलावंतांना पाठबळ दिले. कला आणि शिक्षण ह्यांच्या संबंधावर त्याने भर दिला. कला आणि शिक्षण ह्यांसंबंधीच्या विचारांचा प्रभाव ग्रेट ब्रिटनमधील शिक्षणविषयक धोरणांवर पडला. कला आणि शिक्षण ह्या मानवी मनावर आणि मेंदूवर विलक्षण प्रभाव टाकतात आणि त्यातून संतुलित व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो अशी रीडची मांडणी होती. उपर्युक्त द ट्र व्हॉइस … ह्या ग्रंथामुळे इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवींना त्याने पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. रीडची कविता स्वच्छंदतावादी परंपरेतली. युद्धातले अनुभव आणि त्याचे बालपण ह्यांचे लक्षणीय संस्कार त्याच्या बऱ्याचशा कवितांवर दिसून येतात. ‘न्यू अपोकॅलिपस’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कविसमूहावर त्याचा प्रभाव होता. ऑडन ह्या इंग्रज कवींच्या प्रभावाखाली लिहिल्या गेलेल्या कवितेविरुद्ध ह्या कविसमूहाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. नवोदित लेखकांना उजेडात आणणारा प्रकाशक म्हणूनही त्याचा लौकिक होता.

त्याला १९५३ साली ‘नाइट’ हा किताब बहाल करण्यात आला. यॉर्कशरमधील मॉल्टन येथे तो निधन पावला.

संदर्भ :

  • Berry, F. Herbert Read, 1953.