दुर्ग किंवा गडकोटांच्या दरवाजांवर असलेली शिल्पकला. हे शिल्प प्राणी, पक्षी, वनस्पती, पाने, फुले, फळे या स्वरूपांत असते. काही वेळा गणेशपट्टीवर गणपती अथवा इतर देव-देवता विराजमान असतात, तर कधी वेलबुट्टीसारखे नक्षीकाम दिसते. याशिवाय काही वेळा किल्ल्यांच्या दरवाजावर शिलालेख आढळतात.

अर्नाळा (जि. पालघर) किल्ल्याच्या दरवाजावरील शिल्प.

कौटिलीय अर्थशास्त्र, शुक्रनीति, अग्निपुराण, अभिलाषितार्थचिंतामणि, समरांगणसूत्रधार  यांसारख्या ग्रंथांमधून दुर्गांचे प्रकार, तसेच दुर्गांचे दरवाजे, तटबंदी यासंबंधीची विस्तृत माहिती मिळते. कोणती वास्तू तसेच कोणत्या देवतेचे मंदिर कोणत्या दिशेस असावे, यासंबंधीदेखील सूचना केलेल्या दिसतात.आकाशभैरवकल्पम् या ग्रंथात दुर्गद्वारशिल्पांबद्दल पुढील माहिती मिळते : प्रत्येक बाह्यदरवाजाखालील उंबरठ्यावर भद्रमुख कोरावे. वरच्या भागांवर यक्ष-राक्षसांच्या प्रतिमा उठावदार कोराव्यात. त्यावर अतिभयंकर सिंहाच्याही आकृती ठसठशीत कोराव्यात. तसेच पूर्वद्वारावर विघ्नराज म्हणजे गणपती, दक्षिण दरवाजावर कालिका, पश्चिम दरवाजावर भद्रकाली, तर उत्तरेकडे हनुमंत कोरावा.

आकाशभैरवकल्पम् ग्रंथात सांगितल्याप्रमाणे भयंकर सिहांच्या किंवा व्याघ्राकृतीच्या ठसठशीत प्रतिमा अनेक किल्ल्यांवर पाहायला मिळतात. दुर्गांवर आढळणाऱ्या ह्या सिंहाकृती त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार केवल सिंहाकृती, शरभ आणि व्याल असे प्रकार पडतात.

कोणतेही वैशिष्ट्य नसणारी सिंहाकृती म्हणजे केवल सिंहाकृती किंवा व्याघ्रकृती होय. ही सिंहाकृती किंवा व्याघ्राकृती बरेचदा हत्ती तसेच गंडभेरुंडासमवेत आढळतो. तोरणा किल्ल्याच्या चित् (चित्ता) दरवाजावर हरणावर झडप घालणाऱ्या व्याघ्राकृतीचे शिल्प आहे.

शरभ : शरभ म्हणजे मानव-पशू आणि पक्षी या तिन्हींचे एकत्रित वैशिष्ट्य असलेला काल्पनिक संमिश्र प्राणी. प्राचीन साहित्यामध्ये शरभ हे शंकराचे रूप मानले आहे. त्यामुळे अनेक मंदिरांतून शरभाची शिल्पे आढळतात. दुर्गांच्या दरवाजावर पंख असलेली विक्राळ मुखाची व तीक्ष्ण नख्या असलेली सिंहाकृती म्हणजे शरभ होय. केवल व्याघ्राकृतीप्रमाणेच शरभदेखील केवल शरभ, तसेच हत्ती व गंडभेरुंड यांच्यासमवेत आढळतो. माहुली तसेच अर्नाळा किल्ल्यावर केवल शरभाची शिल्पाकृती आढळते. शिवनेरीच्या दुसऱ्या (परवानगी) दरवाजावर गण्डभेरूण्ड तसेच दोन हत्तींना जेरबद्ध करणाऱ्या शरभाचे शिल्प आहे. याशिवाय रायगड, लोहगडसारख्या किल्ल्यांवरदेखील शरभ शिल्पाकृती पाहावयास मिळते.

अहमदनगर किल्ल्याच्या दरवाजावरील शरभाचे शिल्प.

व्याल : व्याल म्हणजे सिंह आणि ड्रॅगन (सापाप्रमाणे लांब शरीर असणारा प्राणी) यांच्या संमिश्र प्राणी होय. अनेक शिल्पांमध्ये छाती पुढे काढून पंजा उगारलेल्या अवस्थेत याचे शिल्पांकन केलेले असते. ओडिशामध्ये याला ‘विराळ’ तर दक्षिण भारतामध्ये ‘व्याल’ असे म्हणतात. व्याल या काल्पनिक प्राण्याचे शिल्पांकन भारतातील अनेक मंदिरांमध्ये केल्याचे दिसून येते. ड्रॅगनप्रमाणे लांब असणाऱ्या या प्राण्यास ज्या प्राण्याचे शिर असेल, त्या प्राण्याच्या नावाने ओळखले जाते. उदा., सिंहाचे तोंड असणाऱ्या प्राण्यास सिंहव्याल, तर हत्तीचे शिर असल्यास गजव्याल म्हणतात. यानुसार व्यालाचे नरव्याल, अश्वव्याल, अजव्याल अशी अनेक नावे आहेत. द्वारशिल्प म्हणून व्यालाचे शिल्पांकन दुर्मीळ आहे. रायगडावरील राजसभेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस मेंढ्याच्या शिंगाप्रमाणे बाकदार वळणाचे शिंग असलेल्या सिंहाकृतीचे शिल्प आहे. हे शिल्प शार्दूलाचे किंवा व्यालाचे असावे.

गंडभेरुंड : सिंहाकृतीशिवाय द्विमुखी पक्ष्याचे म्हणजे गंडभेरुंडाचे शिल्पदेखील अनेक किल्ल्यांवर पाहावयास मिळते. एका धडाला दोन डोकी असणारा काल्पनिक पक्षी म्हणजे गंडभेरुंड होय. जसे शरभ शंकराचे रूप मानले जाते, त्याप्रमाणे गण्डभेरूण्ड विष्णूचे रूप मानले जाते. त्यामुळे गंडभेरुंडाची शिल्पेदेखील किल्ल्यांपेक्षा मंदिरांमध्ये जास्त प्रमाणात आणि विविध स्वरूपांत आढळतात. किल्ल्यांच्या दरवाजावर गण्डभेरूण्ड हा स्वतंत्र न दिसता तो नेहमी हत्तीसमवेत अथवा शरभासमवेत आढळतो. काही वेळा शरभ गंडभेरुंडाच्या पायाखाली किंवा चोचीमध्ये दिसतो. तर हत्ती हा कायमच गंडभेरुंडाच्या पायाखाली किंवा चोचीमध्ये दिसतो. शिवनेरी किल्ल्यावर गंडभेरुंड हा शरभाच्या पायाखाली दिसतो. तर गाविलगडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हत्ती आणि व्याघ्राकृती अशा दोघांनाही आपल्या चोचीमध्ये आणि पायामध्ये पकडलेल्या गंडभेरुंडाचे शिल्प आहे. याशिवाय मानवीरूपातील गंडभेरुंडाचे शिल्पदेखील पाहावयास मिळते. सिंहगडावरील राजाराम महाराजांच्या समाधी मंदिरात असलेल्या वृंदावनाच्या मागील भिंतींवर मानवी देहधारी गंडभेरुंडाचे शिल्प आहे. या गंडभेरुंडाच्या दोन्ही हातांमध्ये दोन साप असून, तो त्यांचे भक्षण करीत आहे.

शरभ, व्याल व गंडभेरुंड यांसारख्या काल्पनिक संमिश्र पशु-पक्ष्यांच्या शिल्पांशिवाय इतर अनेक पशु-पक्ष्यांची शिल्पे आढळून येतात. शिवनेरी, सिंहगड तसेच रोहिडा, देवगिरी यांसारख्या किल्ल्यांवर हत्तीची स्वतंत्र शिल्पे आढळतात. ही सर्व शिल्पे दर्शनी बाजूकडून अर्धउठावामध्ये कोरलेली आहेत. अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याच्या महादरवाजावर मोर, हत्ती, हरीण आणि कोंबडा यांची शिल्पे कोरलेली आहेत. तर याच किल्ल्याच्या दर्या उर्फ यशवंत दरवाजावर ऋद्धिसिद्धिसह गणेश तसेच गरुड, हनुमान यांच्यासह दोन मगरी अमरवेलासह कोरलेल्या आहेत. जीवधन किल्ल्याच्या नाणेघाटाकडील प्रवेशद्वारावर सूर्य-चंद्राचे शिल्प आहे. पूर्णगडाच्या प्रवेशद्वारावरदेखील गणपतीसह चंद्र-सूर्य प्रतिमा आढळतात. शिवनेरी किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावर शरभ शिल्पाच्या पायाजवळ पाल किंवा सरडासदृश प्राण्याचे शिल्प आहे. प्रतापगडावरील रेडे बुरुजाजवळील चोरदिंडीवर घोरपडीचे शिल्प आहे. तर पुरंदरजवळील वज्रगडाच्या दुसऱ्या दरवाजावर अग्निशलाकेचे दुर्मीळ द्वारशिल्प आहे. इतिहास संशोधक ग. ह. खरे  यांच्या मते, ‘राजगडाच्या दुसऱ्या गुंजवणे दरवाजाच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. तेव्हा हे शिल्प गजलक्ष्मीचे असावे’.

दुर्गद्वार शिल्पांमध्ये पुष्कळ विविधता आढळते, तथापि त्यांतून नेमकी माहिती मिळत नाही. त्या संदर्भात केवळ अंदाज लावता येतो. याउलट किल्ल्यांच्या दरवाजांवरील शिलालेख मात्र इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात.

संदर्भ :

  • खरे, ग. ह. स्वराज्यातील तीन दुर्ग, मुंबई, १९६७.
  • घाणेकर, प्र. के. अथातो दुर्गजिज्ञासा,  पुणे, १९९१.
  • घाणेकर, प्र. के. ‘दुर्गद्वार-शिल्पे’, भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक ६२ (१-४), पुणे, १९८३-८४.
  • देशपांडे, प्र. न. राजगड दर्शन, मुंबई, १९८१.
  • पाळंदे, आनंद, दुर्ग तोरणा, पुणे, १९९८.

                                                                                                                                                                                                                              समीक्षक : सचिन जोशी