एरियूजेना, जोहॅनीझ स्कॉटस : (सु. ८१०—८७७?). आयरिश तत्त्ववेत्ता, ख्रिस्ती धर्मशास्त्रवेत्ता, नव-प्लेटोवादी, भाषाकोविद आणि कवी. जोहनीझ स्कोटस किंवा जॉन स्कॉटस एरिजेना या नावांनीही तो ओळखला जातो. आयर्लंडमधील जन्म म्हणून एरिजेना हे नाव पडले असावे. त्याच्या जन्म-मृत्यूच्या तारखा व साल यांविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. आयरिश ही त्याची मातृभाषा होती. त्याखेरीज ग्रीक, हिब्रू, लॅटिन, अशा अनेक भाषा जाणणारा तो तत्त्वचिंतक होता. त्याने जी भाषांतरे केली, त्यातून प्रेरणा घेऊन त्याने स्वतंत्र लेखन केले. तो विचारस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता होता.
ख्रिश्चन असूनही प्लेटोचा, नव-प्लेटोवादाचा आणि त्याअनुषंगाने एकूणच ग्रीक तत्त्वज्ञानाचा पाश्चात्त्य जगाला परिचय करून देणारा एरियूजेना हा पहिला तत्त्ववेत्ता होय. त्याच्यामुळेच ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञान’ आणि त्यानंतर ‘ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान’ निर्माण झाले. एका अर्थाने तोच पाश्चात्त्य-यूरोप व अमेरिकन तत्त्वज्ञानाचा अध्वर्यू आहे. “नवव्या शतकात तत्त्वज्ञानास प्रारंभ झाला तो फक्त जॉन स्कॉटस एरियूजेनापासूनच..!” अशी महती हेगेलने त्याच्या एका व्याख्यानात सांगितली आहे.
ऑक्सफर्ड येथील थॉमस गेल (१६३५‒१७०४) या संशोधक-तत्त्ववेत्त्याने एरियूजेनाचा पेरीफिजन : ऑन द डिव्हिजन ऑफ नेचर (मूळ ग्रंथनाम-De divisione naturae) हा ग्रंथ लॅटिनमध्ये १६८१ साली प्रसिद्ध केला. तेथून तो चर्चाविश्वात अग्रस्थानी आला. “स्पिनोझाच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी एरियूजेनाच्या लेखनाला अखेर सूर्य दिसला”, अशी महत्त्वाची नोंद ऑर्थर शोपेनहौवर करतो. “एरियूजेना हा नवव्या शतकातील सर्वांत जास्त आश्चर्यकारक माणूस होता आणि तो पाचव्या किंवा नवव्या शतकात जन्मला असता, तरी ते काही कमी आश्चर्यकारक झाले नसते”, अशी टिप्पणी बर्ट्रंड रसेल करतो.
मध्ययुगीन काळात आयर्लंड हा देश यूरोपातील महत्त्वाच्या सांस्कृतिक देशांपैकी एक होता. आयर्लंडमध्ये सातव्या ते आठव्या शतकांमध्ये ग्रीकविद्या आणि अभिजात लॅटिन भाषा व साहित्याची जपणूक व संवर्धन आयरिश संस्कृतीने केले. सातव्या शतकात तर तेथे अध्ययन व अध्यापन रूपात ज्ञानाची तहान कळसाला पोहोचलेली होती. अशा खुल्या वैचारिक व उच्च बौद्धिक पार्श्वभूमीवर एरियूजेनाचा जन्म झाला. मात्र नवव्या शतकात आयर्लंडमध्ये जे बदल झाले, ते शिक्षणाला उपकारक नव्हते. आयर्लंडसह अनेक प्रांत चर्चच्या दडपणाखाली गेले, तेथे भयावह वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचा राजा म्हणजे वेस्ट फ्रँकीशचा राजा दुसरा चार्ल्स द बाल्ड याच्या आधिपत्याखालील फ्रान्समध्ये मुक्त वातावरण होते. साहजिकच आयर्लंड आणि इतरही प्रांतांतून जणूकाही जथ्याजथ्याने तत्त्ववेत्ते आणि धर्मशास्त्रज्ञ फ्रान्समध्ये स्थलांतरित होत होते. फ्रान्स हे त्यांचे मुक्त आश्रयस्थान बनले होते. ही पार्श्वभूमी एरियूजेनाच्या बंडखोर विचारांना पोषक ठरली.
एरियूजेनाचे सगळे शिक्षण आयर्लंडमध्ये झाले. फ्रान्सचा राजा चार्ल्स द बाल्डच्या निमंत्रणानुसार तो फ्रान्सला गेला (सु. ८४५). सुरुवातीला त्याने व्याकरणाचा शिक्षक म्हणून लीआँ येथे काम केले. त्यानंतर त्याने राजाच्या लीआँ येथील पॅलेटीन अकॅडमीत प्रमुख म्हणून काम करून ती नावारूपाला आणली. तेथे तो तीस वर्षे राहिला. चार्ल्सच्या मृत्यूनंतर ऑक्सफर्डचा राजा आल्फ्रेड द ग्रेटने त्याला निमंत्रित केले. ते स्वीकारून त्याने इंग्लंडमध्ये बराच काळ काम केले.
फ्रान्समध्ये असताना एरियूजेनाला एका धार्मिक वादाला तोंड द्यावे लागले. हा वाद ‘युखॅरिस्ट’ या ख्रिस्ती धार्मिक विधीबद्दल होता. बायबलच्या जुन्या करारानुसार युखॅरिस्ट म्हणजे प्रभुभोजन. प्रसंगी येशूने शिक्षा भोगण्यापूर्वी शिष्यांना भाकरी आणि द्राक्षारस दिला आणि संदेश दिला की, “ही भाकरी म्हणजे माझे शरीर आहे आणि द्राक्षारस म्हणजे माझे रक्त”. ह्या घटनेच्या संदर्भात त्या वेळी ‘पूर्वनियततत्त्ववाद आणि विचारस्वातंत्र्य’ असा मोठा वाद झाला.
एरियूजेनाच्या मते ह्या कथेकडे सत्यघटना म्हणून न पाहता रूपकात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. अशा घटनांमधून ‘आधीच काहीतरी ठरविले गेले आहे, असा पूर्वनियतवाद सूचित केला जातो आणि तो स्वीकारणे अनिवार्य केले जाते. त्यापेक्षा अशा घटनांचे चिकित्सापूर्वक परीक्षण करणे आणि मानवी विचारस्वातंत्र्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. तो म्हणतो, “खरा धर्म हेच खरे तत्त्वज्ञान असते आणि खरे तत्त्वज्ञान हाच खरा धर्म असतो”. बुद्धी व साक्षात्कार हे सत्याकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत, त्यांच्यात संघर्ष होत नाही; पण समजा यदाकदाचित त्यांच्यात संघर्ष झालाच, तर बुद्धीला प्राधान्य द्यावे. मानवी विचारस्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे, असे त्याने आग्रहाने मांडले.
तत्त्वज्ञानातील कार्य : एरियूजेनाचे तत्त्वज्ञानातील योगदान तीन प्रकारचे आहे. ‘भाषांतरे, भाष्ये आणि स्वतंत्र लेखन’. राजा चार्ल्सच्या आज्ञेनुसार त्याने काही भाषांतरे केली. त्यांपैकी पाचव्या शतकातील एका ख्रिस्ती नव-प्लेटोवादी तत्त्ववेत्त्याच्या ग्रीक भाषेतील निवडक ग्रंथांचे स्यूडो-दियोनिशिअस हे एरियूजेनाने केलेले लॅटिन भाषांतर, त्याची मौलिक तात्त्विक कामगिरी होय. स्यूडो-दियोनिशिअसच्या भाषांतरासाठी त्याने जे वाचन केले, त्यातून त्याचा पेरीफिजन : ऑन द डिव्हिजन ऑफ नेचर (म.भा. निसर्गाच्या विभाजनासंबंधी) हा स्वतंत्र मौलिक ग्रंथ साकारला गेला (८६२‒८६५). हा ग्रंथ त्याने ग्रीक भाषेत लिहिला. हे त्याचे महत्त्वाचे स्वतंत्र मूलगामी ग्रंथलेखन असून ते मध्ययुगातील पहिले सुव्यवस्थित तत्त्वज्ञानात्मक लेखन समजले जाते. ह्या ग्रंथाच्या रूपाने एरियूजेनाने तत्त्वचिंतन आणि धर्म या दोन्ही गोष्टींना समान मूल्य दिले.
निसर्गाचे विभाजन (सत्ताशास्त्र) : पेरीफिजन : ऑन द डिव्हिजन ऑफ नेचर या ग्रंथातील निसर्ग म्हणजे ईश्वर आणि संपूर्ण ब्रह्मांड या दोन्हीसह सकल सत्ता किंवा अस्तित्व होय. हा ग्रंथ चार भागांत असून गुरू आणि शिष्य यांच्या संवादरूपात तो रचलेला आहे. ग्रंथातील विचारपद्धती निगमनात्मक संवाक्य स्वरूपाची आहे. एरियूजेना ‘निसर्ग काय आहे’ आणि ‘निसर्ग काय नाही’ हे स्पष्ट करतो. ते चार भाग असे :
- पहिले तत्त्व : ‘निसर्ग’, जो निर्मितो परंतु जो निर्माण होत नाही, असा : ह्या तत्त्वात निसर्ग म्हणजेच अनुभवाला येणारे समग्र वास्तव आणि ईश्वर. जगतनिर्मिती ही वस्तुतः मानवाला ईश्वराचे घडणारे दिव्यदर्शन (Theophania) असते. ही सत्ता म्हणजेच ईश्वर होय. कल्पना आणि घटित वस्तूंनी बनलेले वास्तव हे खऱ्या अर्थाने स्वरूपतः ईश्वरच आहे. या तत्त्वात प्रत्येक अस्तित्वाच्या मूलद्रव्याचा समावेश होतो. किंबहुना ते प्रत्येकाचे मूलद्रव्य आहे, ते सारतत्त्व आहे.
- दुसरे तत्त्व : ‘निसर्ग’, जो निर्माण केलेला आहे आणि जो निर्माण करतो, असा : निर्माण करणाऱ्या आणि निर्मित झालेल्या वस्तूंच्या वर्गात सर्व आदिकारणे, आदिबंध किंवा प्लेटोच्या कल्पना आहेत. त्यांची एकच एक सारतत्त्वता म्हणजे ‘लोगोस’ (विचारतत्त्व). या अमूर्त कल्पनांचे जग अनादी-अनंत आहे आणि तरीही कल्पना ह्या निर्मित आहेत, स्वयंसिद्ध नाहीत.
- तिसरे तत्त्व : ‘निसर्ग’, जो निर्माण केलेला आहे आणि जो निर्माण करत नाही, असा : येथे निसर्ग म्हणजे निर्माण झालेले स्थलकालबद्ध मूर्त जग आहे. ईश्वर स्वतःची अमूर्तता सोडतो आणि मूर्त-व्यक्त होतो. तो स्थल व काल यांना व्यापणारा निसर्ग बनतो. म्हणजेच जग निर्माण होते. ही ‘जगतनिर्मिती’ वस्तुतः ईशघटित आहे. ते अशा स्वरूपाचे ईश्वराचे सार आहे की, ज्यामुळे सारे काही निर्मित होते. येथे ईश्वर स्वतःला मानवाच्या मन आणि आत्मा यांच्यात उच्च बौद्धिक व आध्यात्मिक सत्य म्हणून प्रकट करतो. त्याचप्रमाणे तो त्यानेच निर्मिलेल्या जगात ‘इंद्रियांचा विषय’ या स्वरूपातही प्रकट होतो. हे जग वास्तव आहे आणि स्थलकाल युक्त आहे. दुसऱ्या अर्थाने ह्या जगात निखळ ‘शुद्ध दिव्य चित् तत्त्वे’ नसतात, तर त्यांच्या केवळ प्रतिकृती असतात. ती घटिते असतात; ती नाशवंत, अपूर्ण आणि सतत परिवर्तनशील असतात. म्हणूनच तर ही जगत निर्मिती हीच दिव्यनिसर्ग उलगडण्याची गूढ प्रक्रिया आहे. निर्मिती ही अनंत-अनादी प्रक्रिया आहे.
- चौथे तत्त्व : ‘निसर्ग’, जो ना निर्माण केलेला आहे, ना निर्माण करतो, असा : हे खुद्द पुन्हा ईश्वरच आहे की ज्याच्यात जगत, मानव, वस्तू सारेकाही विलीन होते. विलय प्रक्रिया घडताना आदितत्त्व प्रथम प्रकाश बनते, प्रकाश जीवन होते, जीवन इंद्रिये बनतात, इंद्रिये बुद्धी बनतात, बुद्धी प्रज्ञा होते. अशा निसर्गाच्या कल्पनेमुळे एरियूजेनाला सर्व वस्तुंच्या, विशेषत: मनुष्याच्या शेवटी आपल्या तत्त्वांमध्ये लय होतो. या नव-प्लेटोवादाच्या एका सिद्धांताचा येथे अंतर्भाव करता आला.
पहिले आणि चौथे तत्त्व ईश्वर आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. मधली दोन तत्त्वे ही ईश्वराच्या दिव्यदर्शनाची पूर्वतयारी आणि साक्षात दर्शन आहे. पहिले तत्त्व अमूर्त आहे आणि चौथे अनुभवाने साक्षात जाणीव झाल्यानंतरचे मुक्तिनिधन आहे.
ईश्वर सर्वांची सुरुवात, मध्य आणि अंत आहे, असे एरियूजेनाला सांगायचे आहे. ईश्वराचे सारतत्त्व माणसाला अज्ञात असतेच; पण खुद्द ईश्वरालाही अज्ञात असते. हा ईश्वर स्वतःला जाणू शकत नाही. जर तो जाणला जात असता, तर त्याने स्वतःला काही वर्गीकरणतत्त्वात समाविष्ट केले असते; पण तसे जाणवत नाही.”खुद्द ईश्वरसुद्धा एका अर्थाने स्वतःला जाणत नाही, कारण एका वेगळ्या अर्थाने तो ‘काय’ नाही आहे. तो स्वतःला अगम्य आणि साहजिकच इतर कोणत्याही प्रज्ञेला (म्हणजे माणसाला) अगम्यच आहे. ईश्वर स्वतःलाच अगम्य असेल, तर इतरांना गम्य कसा असेल? कारण इतर मानव, वस्तू, कल्पना या त्याच्यापेक्षा कमी आहेत; कारण त्याच ईश्वराची निर्मिती आहेत. निर्मात्यापेक्षा निर्मिती जास्त असू शकत नाही. या वस्तूंच्या अस्तित्वात ईश्वराचे ‘अस्तित्व’ पाहता येते, त्यांच्या ‘व्यवस्थे’त ईश्वराचे ‘शहाणपण’ जाणवते, त्याच्या हालचालीत त्याचे ‘जीवन’ अनुभवता येते. ईश्वराचे अस्तित्व म्हणजे परमपिता, त्याचे ‘शहाणपण’ म्हणजे त्याचा पुत्र, त्याचे जीवन म्हणजे ‘पवित्र सैतान’. पवित्र सैतानाच्या प्रभावाखाली या कल्पनांमधून विशिष्ट वस्तूंचे जग निर्माण होते, ती भौतिकता निर्माण होते जी मर्त्य, नाशवंत व भ्रम आहे.
जे निर्मित आहे ते म्हणजे ‘जीव’ हे काही ईश्वरापासून भिन्न अस्तित्व नाही. ते ईश्वरातच सामावलेले आहेत. ईश्वर स्वतःलाच शक्य असेल त्या सर्व रूपांमध्ये आविष्कृत करत राहतो. “ती पवित्र त्रयी आपल्या आत वसणाऱ्या स्वतःवर स्वतःच प्रेम करते. स्वतःला ती अवलोकीते आणि स्वतःच गतिमान होते.”
पापाला मानवी स्वातंत्र्यात मार्ग सापडतो. पापाला ईश्वरात स्थानच नाही, कारण ईश्वरात पापाची कल्पनाच नसते. दुरित ‘नसतेपण’ आहे आणि त्याला अधिष्ठान नाही; जर अधिष्ठान असते, तर ते अनिवार्य ठरले असते. दुरित हा शिवाचा, शुभत्वाचा अभाव आहे. पाप उद्भवते कारण माणूस ईश्वराकडे वळणे अपेक्षित असतानाही तो स्वतःकडे, इंद्रियोपभोगाकडे वळतो.
विचारतत्त्व सर्व निर्मित वस्तूंना, जीवांना त्या ‘मूल एक’मध्ये परत फिरवणारे आणि माणसाला ईश्वराकडे वळवून आणणारे ‘तत्त्व’ आहे. हे तत्त्व जगताचे ‘उद्धारक’ आहे. विचारतत्त्वाद्वारेच माणूस ईश्वराशी सायुज्जता साधू शकतो आणि दिव्यत्वाशी एकरूप होऊ शकतो.
ईश्वरशास्त्राचे प्रकार : येथे एरियूजेना सकारात्मक ईश्वरशास्त्र (Kataphatic) आणि नकारात्मक ईश्वरशास्त्र (Apophatic) असा प्रकारभेद मांडतो. ही संकल्पना त्याने स्यूडो-दायोनिशियसकडून घेतली. सकारात्मक ईश्वरशास्त्र याचा अर्थ ‘जरी ईश्वर अतीत असला आणि कोणत्याही शाब्दिक वर्णनापलिकडे असला, तरी त्याच्याविषयी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणे, त्याला जाणण्याचा प्रयत्न करणे. उलट, ईश्वराची अज्ञेयता जाणणे म्हणजे नकारात्मक ईश्वरशास्त्र होय. तो सर्वातीत आहे, ज्याला ‘आहे’ म्हणता येते त्याच्याही अतीत ईश्वर आहे, म्हणून तो खऱ्या अर्थाने मुदलातच ‘नाही’. ‘नसणे’ हेच त्याचे स्वरूप आहे, असे नकारात्मक ईश्वरशास्त्र सांगते.
नव-प्लेटोवादानुसार अनंत, अतीत आणि ‘अज्ञात ईश्वर’ अस्तित्व आणि न-अस्तित्व यांच्या पलीकडे, म्हणजे अतीत आहे. एरियूजेना हे स्वीकारतो आणि त्यात पुढे बदल करतो. त्याच्या मते, ईश्वर स्वतःला व्याख्येय करू पाहतो. त्या व्याख्येय करण्याच्या प्रयत्नातून, त्या प्रक्रियेद्वारे किंवा ‘आत्म-निर्मिती’द्वारे त्याच्या दैवी तमरूपाचे, अंध:काराचे किंवा न-अस्तित्वाचे रूपांतर ‘अस्तित्वाच्या रूपात’, दिव्य तेजोमय प्रकाशात आविष्कृत करतो, या जगताच्या रूपात प्रकट होतो, ख्रिस्ताच्या रूपात अवतरतो आणि सारेकाही त्याच्यातच विलीन होते. एरियूजेनाला ‘सर्व वस्तूंचा, विशेषत: मानवाला शेवटी आपल्या उगम तत्त्वामध्येच आपला लय होतो’ या नव-प्लेटोमताच्या एका सिद्धान्ताचा येथे अंतर्भाव करता आला. पापाद्वारे मनुष्याची पशूवृत्ती वर्चस्व गाजविते, ती उफाळून येते; परंतु पापविमोचनामुळे (पापक्षालनामुळे) तिचे ईश्वरात पुनर्मीलन होते, अशी मांडणी तो करतो.
थोडक्यात, एरियूजेनाच्या मते निसर्ग म्हणजे चार प्रजातीत विभागली गेलेली ‘अस्तित्वाची समग्रता’ जो दिव्यनिसर्ग आहे आणि त्या चारही प्रजातींचे सम्यक समग्र दर्शन म्हणजे ‘ईश्वर दर्शन’ होय.
एरियूजेनाचे ईश्वरशास्त्र त्याच्या सत्ताशास्त्राशी समांतर आहे.
एरियूजेनाचे जीवन, कार्य आणि प्रभाव यांवर विसाव्या शतकात खऱ्या अर्थाने प्रकाश पडला. बेल्जियन विद्वान-लेखक मेउल कॅप्प्यूइन्स याने १९३३ साली एरियूजेनावर पीएचडी केली आणि तो प्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशित केला. त्यानंतर एरियूजेनावर सखोल संशोधन सुरू झाले. १९७० साली जॉन जे ओमियारा या संशोधकाने सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ एरिजेनियन स्टडिज ही संस्था स्थापन केली. त्यानंतर अशा अनेक संस्था विसाव्या शतकात यूरोप-अमेरिकेत सुरू झाल्या. गेल्या काही वर्षांत त्याच्या अध्ययन व संशोधनासाठी अनेक संकेतस्थळे, अनुदिनी, फेसबुक पानेही सुरू करण्यात आली आहेत. भारतीय विद्यापीठांमध्ये मात्र एरियूजेनाचे कार्य अजूनही दुर्लक्षित आहे.
संदर्भ :
- Carabine, Deirdre, Great Medieval Thinkers : John Scottus Eriugena, New York, 2000.
- Hegel, G. W. F.; Brown, George F. Ed. Lectures on the History of Philosophy : Medieval and Modern Philosophy, Vol. III, New York, 2009.
- Russell, Bertrand, A History of Western Philosophy, and Its Connection with Political and Social Circumstances from the Earliest Times to the Present Day, London, 1961.
- Schopenhauer, Arthur, Parerga and Paralipomena : Six Long Philosophical Essays, Vol. 1, New York, 1974.
- https://www.newworldencyclopedia.org/entry/Johannes_Scottus_Eriugena
- https://plato.stanford.edu/archives/win2019/entries/scottus-eriugena
- http://www.irishphilosophy.com/2013/04/10/benedict-erigena/
- http://www.vatican.va/content/benedict-xvi/en/ audiences /2009 /documents /hf_ben-xvi_aud_20090610.html
समीक्षक : हिमानी चौकर