ख्रिस्ती धर्मातील न्यायमंडळाचे नाव. चर्चचा पाया हा जरी येशूच्या मूळ शिकवणुकीवर आधारित असला व तो तसा राहावा, अशी येशूची इच्छा असली, तरीसुद्धा वेगवेगळ्या मतांना व सुरांना तेथे जागा नव्हती, असा त्याचा अर्थ होत नाही. भाविक मंडळींचे सूर कधीकधी वेगवेगळे असायचे. मात्र, वेळप्रसंगी ते टोकाचे सूर एवढे ‘बेसूर’ व्हायचे की, ते सहन करणे चर्चच्या अधिकाऱ्यांना किंवा श्रद्धावंतांना केवळ अवघडच नव्हे, तर अशक्य व्हायचे.

पहिल्या हजारेक वर्षांच्या ख्रिस्ती परंपरेप्रमाणे मध्ययुगामध्ये रोमन कॅथलिक चर्चचा प्रभाव जगद्मान्य झाला होता. अशा वेळी दक्षिण फ्रान्समध्ये ‘आल्बिजेन्सेस’, ‘काथारिझम’ आणि उत्तर इटलीमध्ये ‘वॉल्डनसियन्स’ या नावांच्या विचारधारा बळ धरू पाहात होत्या व चर्चच्या मूळ सूराला ते मुद्दाम बेसूर करत होते. धर्मसत्याच्या बाबतीत टोकाची भूमिका घेणारे कट्टर कर्मठवादी व अतिउदारवादी असे हे तट होते. अशा विचारधारांच्या लोकांना यूरोपमध्ये ‘हेरेटिक्स’ ऊर्फ ‘पाखंडी’ असे म्हटले जाई. ‘माणसाला स्वतंत्र इच्छा नसल्यामुळे त्याच्या कृत्यांना तो सर्वस्वी जबाबदार नाही’, ‘विवाह हा प्रकार वाईट आहे’, ‘व्रत स्वीकारणे हे मानवी नियमबाह्य आहे’, ‘धर्माच्या भल्याकरता आत्महत्या करणे काही गैर नाही…’ असे घातक विचार ही मंडळी समाजात पेरू लागली. चर्चच्या अधिकाऱ्यांना ते पसंत पडले नाही आणि अशा विचारप्रणालीला वेळीच प्रतिबंध घालणे गरजेचे आहे, हा विचार पुढे आला व ‘असे विचारप्रवाह जे धर्मात आणतील त्यांना धार्मिक व्यवस्थेतून शासन झालेच पाहिजे’ या मताला पुष्टी मिळाली. ते सूत्र हाती धरून अशा लोकांच्या विचारधारेची कसून चौकशी करण्यासाठी इ.स. १२३१ मध्ये पोप नववे ग्रेगरी यांनी जागोजागी, विशेषत: फ्रान्स व जर्मनी या देशांत, बिशपांचे व धर्मगुरूंचे विचार तपासून व पडताळून घेण्यासाठी धर्मपातळीवर ‘चौकशी आयोग’ उर्फ धर्मसमीक्षण ‘ट्रायब्यूनल’ची स्थापना केली.

ख्रिस्ती अनुयायांनी आपली चुकीची भूमिका ओळखून वेळीच माघार घ्यावी, यासाठी सद्हेतूने केलेली ही उपाययोजना होती. या धर्मन्यायालयाचा उपयोग झाला व त्याच्या भीतीपोटी काही अव्यवहार व उग्रमतवादी वठणीवर आणण्यात यश प्राप्त झाले. ते मूळ धर्मप्रवाहात परत आले. समाजाचे वैचारिक रक्षण करण्यासाठी ते गरजेचे ठरले. जे ‘अतिरेकी’ म्हणून सिद्ध झाले त्यांना शासकीय न्यायव्यवस्थेच्या स्वाधीन करण्यात आले. अशा लोकांच्या मनपरिवर्तनासाठी त्यांना बर्‍याच वेळा प्रबोधन केले जाई. त्यांना दोन प्रकारची शिक्षा दिली जाई. आध्यात्मिक व शारीरिक. पण शारीरिक यातना देण्यापूर्वी त्यांना सुधारण्याची संधी म्हणून वेगवेगळ्या चर्चेसना प्रार्थना-भेटी देण्याची व तीर्थस्थानांची यात्रा करण्याची शिक्षाही सुनावली जाई.

मध्ययुगात सुरुवाती-सुरुवातीला ह्या आयोगाचा वापर धर्मसत्य शुद्ध राखण्यापुरताच व ख्रिस्ती धर्मीयांपुरताच सीमित होता. ख्रिस्ती धर्मसत्याच्या चौकटीला तडा देऊ पाहणाऱ्या लोकांनी आपली टोकाची भूमिका सोडावी व मूळ प्रवाहात राहावे, यासाठी त्यांना धर्माची जाणीव करून देण्यासाठी प्रशिक्षण संस्था व सुधारगृहे काढण्यात आली. ही पद्धत काही अंशी यशस्वीदेखील झाली; परंतु केवळ चौकशीने हे मतप्रवाह थोपवणे शक्य नव्हते. म्हणून यांना योग्य ते शासन करण्यासाठी एक यंत्रणा अमलात आणली गेली, तिला ‘इन्क्विझिशन’ असे म्हणण्यात आले. ‘इन्क्वायरी’ या मूळ शब्दावरून ‘इन्क्विझिशन’ हा शब्द पुढे रूढ झाला.

त्याची पार्श्वभूमी ही अशी होती. पंधराव्या शतकात स्पेनमध्ये ज्यू लोक व्यापार, अर्थकारण व राजकारण यांत अग्रेसर होत होते. ख्रिश्चन लोक त्यांचा मत्सर व द्वेष करू लागले. त्या असूयेपोटी धर्मसत्तेचा बेजबाबदार वापर करून लूटालूट व जाळपोळ सुरू झाले. धर्मशुद्धी करता-करता काहींची शुद्धी हरपली. अमाप अत्याचार झाले. होत्याचे नव्हते झाले.

परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे काम डॉमिनिकन फादरांवर सोपविण्यात आले; फादर विन्सेंट फरेरा यांची कामगिरी उल्लेखनीय ठरते. १४८१ मध्ये स्पेनमध्ये काहीशा राजकीय व धार्मिक वातावरणात या न्यायालयाची स्थापना झाली. पुढे १५३६ मध्ये ती पोर्तुगालला लिस्बन येथे गेली व लिस्बनमार्गे ती गोवा बंदरात आली. गोव्यातील आदिलशहाचा भूतपूर्व राजवाडा हे त्याचे न्यायालय म्हणून वापरण्यात येऊ लागले. या न्यायालयातून ५६ कलमांचे एक आज्ञापत्र अथवा फर्मान जाहीर करण्यात आले. ह्या हुकुमान्वये बरेच लोक चिरडले गेले. छळकोठडीत खितपत पडले. १५६१ पासून १७७४ पर्यंत गोव्यात इक्विझिशन उर्फ इंकिझीसांव या न्यायालयाचा प्रभाव होता. त्या काळात गोव्यातील काही ख्रिस्ती बांधव तेथील आपले घरदार सोडून मंगळूर येथे स्थायिक झाले. त्यांचे गोव्यातील मूळचे ख्रिस्ती आडनाव मात्र तसेच राहिले.

पुढे पुढे धर्मांतराची लाट जेव्हा यूरोपमधून भारताच्या किनाऱ्यावर येऊन थडकली, तेव्हा धर्मांतरित भाविकांपेक्षा जी मंडळी ख्रिस्ती धर्मसत्ये मानत नव्हती किंवा त्याला आव्हान देत होती, अशा बिगर ख्रिस्ती लोकांवर (Gentilidades) या धर्मन्यायालयाची कुऱ्हाड वापरली जाऊ लागली.

वसईसारख्या ख्रिस्ती वसाहतीत या धर्मन्यायालयाच्या शाखा उघडण्यात आल्या. धर्मन्यायालयाच्या निवाड्याने ज्या लोकांचे समाधान होऊ शकत नव्हते, अशा निरपराध लोकांना स्थानिक बिशपकडे किंवा पोपकडे न्याय मागण्याची मुभा होती. ‘Ejus regio; illius religio‘ज्याचे राज्य; त्याची धर्मसत्ता’ या लॅटिन भाषेतील उक्तीनुसार गोव्यातील धर्मन्यायालयाची झळ ख्रिस्ती लोकांप्रमाणे काही हिंदू लोकांनाही पोहोचू लागली, त्यांना मनस्ताप होऊ लागला, या शारीरिक व मानसिक शिक्षेविषयी त्यांच्यात एकप्रकारचा असंतोष खदखदू लागला. घृणा निर्माण झाली. त्यामुळे स्थानिक मंडळी या ‘इन्क्विझिशन’कडे तिरस्काराने पाहू लागली व या यंत्रणेची बदनामी होऊ लागली. आजवरही हा शब्द अप्रियच नव्हे; तर तिरस्करणीय ठरला आहे.

संदर्भ :

  • Hamilton, Bernard, The Medieval Inquisition, New York, 1981.
  • O’Brien, John A. The Inquisition, New York, 1973.

समीक्षक : फ्रान्सिस दिब्रेटो