पंचसृष्टी सजीवातील (Five kingdom classification) दृश्य केंद्रकी पेशी. तिचा आकार गोलाकार किंवा अनियमित असून लांबी १०—३० मायक्रोमीटर असते. प्राणी पेशीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामध्ये पेशीभित्तिकेऐवजी पेशीआवरण असते. प्राणी पेशीत मुख्यत: पेशी पटल (पेशीद्रव्य पटल), पेशीद्रव्य, केंद्रक, आंतर्द्रव्यजालिका, गॉल्जी पिंड, लयकारिका, तंतुकणिका, रिक्तिका इत्यादी अंगकांचा समावेश होतो. परंतु, प्राणी पेशीत हरितलवके नसतात .

प्राणी पेशी रचना

पेशी पटल/प्रद्रव्य पटल (Plasma membrane) : प्राणी पेशीच्या भोवती असलेल्या पातळ, लवचिक व प्रवाही आवरणास पेशी पटल म्हणतात. पेशी पटल हे दोन थरांचे बनलेले असून हे थर फॉस्फोलिपिड मेदांचे (स्फुरील मेद) बनलेले असतात आणि त्यामध्ये प्रथिनांचे रेणू असतात. पेशी पटलातून विशिष्ट आयने व विशिष्ट आकारांच्या रेणूंचे वहन होते. रेणूंच्या वहनावर त्याचे नियंत्रण असते. प्राणी पेशीमध्ये पदार्थांचे वहन परासरणाद्वारे (Osmosis)  होते.  पाणी, क्षार आणि ऑक्सिजनची पेशीमध्ये देवाण-घेवाण करणे आणि पेशीबाह्य  बदलांपासून पेशीचे रक्षण करण्यासाठी पेशीची समस्थिती (Homeostasis) राखणे हे पेशी पटलाचे कार्य आहे.

पेशीद्रव्य (Cytoplasm) : पेशीच्या आंतरभागात असलेला द्रवरूप भाग म्हणजे पेशीद्रव्य. पेशीद्रव्याभोवती पेशीपटल असते. पेशीपटलामुळे पेशीद्रव्य आंतरभागातच सीमित राहते. पेशीद्रव्याची  सतत हालचाल होत असते. पेशीद्रव्याच्या आंतरभागात पेशी अंगके असतात. त्यांना मेद व प्रथिनांनी बनलेले स्वत:चे आवरण असते. पेशी अंगकांच्याद्वारा पेशीची कार्ये केली जातात. प्राणी पेशीत रायबोसोम या पेशी अंगकात प्रथिन संश्लेषण होते. पेशी अंगकांच्या व्यतिरिक्त असलेल्या पेशीद्रव्याच्या भागाला पेशीद्रव (Cytosol) म्हणतात. पेशीद्रव पातळ असून त्यात ग्लुकोज, अमिनो आम्ले, कलिले (Colloids), जीवनसत्त्वे व  क्षार  असतात. तसेच त्यात अव्याहतपणे रासायनिक क्रिया होत असतात.

केंद्रक (Nucleus) : पेशीचे सर्वांत महत्त्वाचे अंगक. हे बहुधा पेशीच्या मध्यभागी असते. केंद्रकाचे केंद्रकपटल, केंद्रकद्रव्य व केंद्रकी असे तीन भाग असतात. केंद्रकाभोवती केंद्रकपटलाचे (Nuclear membrane) दुहेरी आवरण असते.  त्याचा बाह्य थर आंतरद्रव्य जालिकेस जोडलेला असतो. केंद्रकपटल सच्छिद्र असते. त्याच्या छिद्रातून पाणी व प्रथिन यांचे पेशीद्रव्य आणि केंद्रकद्रव्य यात वहन होते. केंद्रक द्रव्यातील गोलाकार भागास  केंद्रकी (Nucleolus) म्हणतात. केंद्रकामधील सर्वांत मोठा भाग केंद्रकीने व्यापलेला असतो. केंद्रकीमध्ये रायबोसोम मधील काही आरएनएचे (RNA; Ribonucleic acid) भाग तयार होतात. प्रथिन तयार करणे आणि पेशी विभाजनात मदत करणे हे केंद्रकीचे महत्त्वाचे कार्य आहे.

केंद्रकामधील सूक्ष्म धाग्यासारख्या गुणसूत्रांचे पेशी विभाजनाच्या वेळी दुपटीकरण होऊन गुणसूत्रे विभाजित पेशींमध्ये समसमान वाटली जातात. गुणसूत्रामध्ये पेशीचा जनुकीय भाग डीएनएच्या (DNA; Deoxyribonucleic) स्वरूपात असतो. गुणसूत्रावरील संदेशानुसार प्रथिन निर्मितीसाठीचे आदेश संदेशदूत आरएनएच्या स्वरूपात आवरणावरील छिद्रामधून पेशीद्रवात पाठविले जातात. पेशीकेंद्रक पेशीच्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवते.

आंतर्द्रव्यजालिका (Endoplasmic reticulum) : हे पेशीमधील महाजाल आहे. हे सूक्ष्मनलिका आणि जाळीदार पट यांपासून बनलेले असून केंद्रक आणि प्रद्रव्यपटल यांना जोडलेले असते. त्याचे मृदू व खडबडीत असे दोन प्रकार आहेत. त्यांपैकी खडबडीत आंतर्द्रव्यजालिकेवर मोठ्या संख्येने रायबोसोमचे कण असतात. पेशीअंतर्गत वाहतूक हे आंतर्द्रव्यजालिकेचे प्रमुख कार्य आहे.

गॉल्जी यंत्रणा किंवा गॉल्जी पिंड (Golgi bodies/apparatus) : गॉल्जी पिंडाची रचना गुंतागुंतीची असते. चपट्या बशीच्या चवडीप्रमाणे रचलेल्या कोषांपासून गॉल्जी पिंड बनलेले असते. चपट्या कोषांना ‘कुंडे’(Cisternae) म्हणतात. कुंडाच्या या घड्यांमधे प्रथिने आणि मेदाचे रेणू गोलीय पीटिकांद्वारे (Vesicles) आणले जातात. तेथे त्यांच्यावर प्रक्रिया होते. प्रक्रिया झालेले रेणू परत गोलीय पीटिकांद्वारे बाहेर टाकले जातात. गॉल्जी पिंडाचे स्थान आंतर्द्रव्यजालिकेच्या पुढे आणि केंद्रकाजवळ असते. वनस्पती पेशीमधील गॉल्जी पिंडामध्ये गोलीय पीटिकांची संख्या जास्त असते. त्यामध्ये अनेक विकरे असतात. हे पेशीचे स्रावी अंगक आहे. पेशीमध्ये संश्लेषित झालेली प्रथिने, विकरे, वर्णके यांमधे बदल करून त्यांची विभागणी करणे, त्यांना अपेक्षित स्थळी पोहोचवणे, रिक्तिका आणि स्रावी पीटिका यांची निर्मिती करणे आणि पेशीभित्तिका, प्रद्रव्यपटल आणि लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे असे गॉल्जी पिंडाचे कार्य आहे.

लयकारिका (Lysosomes) : यांचा आंतरभाग आम्लधर्मीय  असतो. पेशींचा नाश करणे किंवा पेशीतील अनावश्यक घटकांची विल्हेवाट लावणे हे लयकारिकेचे प्रमुख कार्य आहे.

तंतुकणिका (Mitochondria) : तंतुकणिका गोल किंवा अंडाकृती असून त्याचा व्यास ०.५—१० मायक्रोमीटर आणि जाडी १ मायक्रोमीटर एवढी असते. त्यांची संख्या पेशीप्रमाणे बदलते. तंतुकणिकांचे आवरण दोन थरांचे असून बाह्यावरण हे एकसंध व त्यामधे खूप वाहिन्या असतात. या वाहिन्या सच्छिद्र प्रथिनांपासून (Porin) बनलेल्या असतात. तंतुकणिकांना पेशीचे ऊर्जागृह म्हणतात. यांमध्ये पेशीद्रवातील चयापचयाच्या अंतिम रेणूचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जानिर्मिती होते. स्नायू व हृदय स्नायूंमध्ये तंतुकणिकांची संख्या अधिक असते.

वनस्पती व प्राणी पेशी यांमधील प्रमुख फरक

रिक्तिका (Vacuole) : हे एकपदरी आवरण असलेले पेशीअंगक आहे. यात पेशीद्रव्य नसते. यामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात असल्याने आकार ठराविक नसतो. प्राणी पेशीमध्ये रिक्तिकांची संख्या तुलनेने वनस्पती पेशीहून अत्यंत कमी असते. पेशीमधील अतिरिक्त अन्नघटक रिक्तिकेत साठवले जातात.

रायबोसोम (Ribosome) : दृश्य केंद्रकी प्राणी पेशींमधील रायबोसोम आभासी केंद्रकी पेशींहून भिन्न व संख्येने अधिक असतात. रायबोसोम पेशीद्रवामध्ये विखुरलेले अथवा खडबडीत आंतर्द्रव्यजालिकेवर असतात. पेशीच्या स्रावी काळात त्यांची संख्या वाढते. रायबोसोमचा प्रथिन संश्लेषणात महत्त्वाचा सहभाग असतो .

ताराकेंद्र (Centriole) : हे सूक्ष्म नलिकांनी बनलेले असते. तीन-तीन सूक्ष्म नलिकांचे नऊ संच ताराकेंद्रामध्ये गोलाकार रचनेत असतात. प्राणी पेशीच्या विभाजन प्रक्रियेत ताराकेंद्र मदत करते. पेशी विभाजनात गुणसूत्रे विलग होण्याच्या प्रक्रियेत ताराकेंद्र आधार देते. वनस्पती पेशीमध्ये ताराकेंद्र नसते.

वनस्पती व प्राणी पेशी यांमधील मुख्य फरक तक्त्यात दिले आहेत –

पहा : तंतुकणिका, पेशी, वनस्पती पेशी.

संदर्भ :

  • www.biologydiscussion.com
  • https://www.britanica.com
  • https://biologydictionary.net
  • https://sciencedirect.com
  • https://en.m.wikipedia.org

समीक्षक : रंजन गर्गे