सजीवाच्या उत्क्रांतीमध्ये कमी विकसित किंवा कार्यक्षमता कमी झालेल्या शरीरातील काही अवयवांना अवशेषांगे (Vestigial organs) म्हणतात. लॅटिन भाषेमध्ये vestigium म्हणजे वाळूतून किंवा ओल्या मातीतून चालत गेल्यानंनतर उठलेल्या पावलांच्या खुणा. एखाद्या सजीवातील अवशेषांग दुसऱ्या सजीवामध्ये कार्यक्षम असते. उदा., मानवी अन्ननलिकेमधील लहान व मोठे आतडे जेथे जोडलेले असते त्यापासून एक लहान बोटाच्या आकाराचे आंत्रपुच्छ (Appendix) नावाचा कोठेही बाहेर न उघडलेला भाग असतो. मानवी अन्नमार्गामधील आंत्रपुच्छ निरुपयोगी असते. परंतु, रवंथ करणाऱ्या गाय, म्हैस अशा जनावरांमध्ये आंत्रपुच्छ भरपूर लांब असते. यामध्ये अन्नातील सेल्युलोजचे पचन होते. मानवी अन्नमार्गात सेल्युलोजचे पचन होत नाही.
डार्विन यांनी उत्क्रांती सिद्धांत मांडण्यापूर्वी अवशेषांगांचे अस्तित्त्व व कार्य याबाबत वैज्ञानिकांनी अनेक शक्यता वर्तविल्या होत्या. ख्रिस्तपूर्व चवथ्या शतकात ॲरिस्टॉटल यांच्या हिस्टरी ऑफ अॅनिमल्स (History of Animals) या ग्रंथात मोल नावाच्या वाळूखाली राहणाऱ्या चिचुंदरीसारख्या प्राण्याच्या डोळ्यावरील आवरणामुळे आंधळ्या प्राण्यांच्या न दिसण्याबद्दल कुतुहल व्यक्त केले होते. १८०९ मध्ये लामार्क यांनी फिलोसोफी झूलोजीक (Philosophie Zoologique) या ग्रंथात अवशेषांगाचा ऊहापोह केला होता. त्यांच्या मते सूर्यप्रकाशाच्या संपर्कात न आल्यामुळे एका अंध प्रजातीतील मूषकाचे निरुपयोगी ठरलेले डोळे हे अविकसित स्वरूपात पुढील पिढ्यांत संक्रमित झाले.
भिन्न परिस्थितीला तोंड देण्याकरिता आणि परिस्थिती बदलानुसार उत्पन्न झालेली नवीन कार्ये पार पाडण्याकरिता प्राणी अचानक नवी इंद्रिये तयार करू शकत नाहीत. त्याऐवजी त्यांच्या जुन्या इंद्रियांत क्रमाक्रमाने बदल होतो. एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु बदललेल्या स्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा वेळी नैसर्गिक निवडीच्या क्रियेने निरुपयोगी अवयव लहान होत जाऊन ते नाहीसे होण्याच्या मार्गाला लागतात. त्यांचा आकार जरी लहान झाला तरी अवयव पूर्णपणे नष्ट होत नाही. उत्क्रांती इतिहासात याच्या अनेक अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरांत आढळतात.
मानवी शरीरात अनेक अवशेषांगे आहेत; उदा., सुळे व अक्कलदाढा. दातातील सुळा अन्न फाडण्यासाठी उपयोगी पडतो. मांसाहारी प्राण्यांचे सुळे अत्यंत टोकदार व तीक्ष्ण असतात. मानवी खाद्य जसे बदलत गेले तसे मानवातील सुळ्यांची लांबी कमी कमी होत गेली. मानवी जीवाश्म कवटीच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते. मानवामध्ये वरच्या जबड्यात व खालच्या जबड्यात प्रत्येकी सोळा असे एकूण ३२ दात असतात. याची पुढील चार पटाशीचे दात, त्यानंनतर सुळे, त्यानंतर उपदाढा व शेवटी दाढा अशी रचना असते. दाढांच्या तीन जोड्या असतात, त्यातील शेवटच्या दाढेस अक्कलदाढ म्हणतात. उत्क्रांतीमध्ये मानवी जबडा आकाराने लहान होत गेल्याने शेवटच्या दाढेस जबड्यात पुरेशी जागा उरली नाही. तसेच ही दाढ खूप उशीरा येते. या दाढेचा अन्न चावण्याशी फार संबंध येत नाही. यामुळे ही दाढ अवशेषांग आहे.
अस्थिपुच्छ (Coccyx or tail bone) : हे मानवाच्या पूर्वजांमधील शेपटीचे अवशेषांग असावे असे अभ्यासकांचे मत आहे. मानव उत्क्रांतीच्या विविध अवस्थांमधून विकसित होत असताना सरळ ताठ उभा राहून चालू लागल्यावर तोल सांभाळण्यासाठी शेपटीची आवश्यकता न राहिल्याने शेपटीला आधार देणारे मणके आखूड झाले. असे मणके सर्व सस्तन प्राण्याच्या भ्रूणावस्थेत पाठीच्या कण्याच्या शेवटाला दिसून येते. मात्र तोल सांभाळण्याचे त्याचे कार्य संपुष्टात आल्याने पुढील भ्रूणावस्थेत ते नाहीसे झाले. क्वचित हा अवयव मानवी अर्भकात जन्मवेळीही कायम राहतो. शस्त्रक्रियेने असे अस्थिपुच्छ काढून टाकले जाते.
निमेषक पटल (Nictitating Membrane) : मानवी डोळ्यातील नाकाजवळील डोळ्याच्या कोपऱ्यातील अर्धचंद्राकृती भागाला निमेषक पटल म्हणतात. याला तिसरी पापणी असे सामान्य नाव आहे. बेडूक, सरडा व पक्षी यांच्या डोळ्यामध्ये तीन पापण्या असतात. वरील पापणी व खालील पापणी याप्रमाणेच तिसरी पापणी देखील धूळ व पाणी यांपासून डोळ्याचे संरक्षण करते. माणूस मात्र आपले डोळे बोटांनी स्वच्छ करू शकतो. त्यामुळे मानवी डोळ्यातील ही तिसरी पापणी निरुपयोगी झाली. त्यामुळे मानवी शरीरातील हे अवशेषांग आहे.
आंत्रपुच्छ (Vermiform Appendix) : मानवाच्या शरीरात मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला असणारे शेपटीसारखे आंत्रपुच्छ हे अवशेषांग आहे. उत्क्रांतीपूर्व काळात अन्नातील सेल्युलोजचे विघटन करण्याचे कार्य त्यातील मित्रजीवाणूंमार्फत होत असे. मात्र, उत्क्रांतीच्या काळात मानवाच्या खाद्यसवयी बदलत गेल्या. मानव शिजवलेले अन्न खाऊ लागला. अन्नातील सेल्युलोजचे प्रमाण कमी होत गेल्याने आंत्रपुच्छातील जीवाणूंची गरज भासेनाशी झाली व कालांतराने आंत्रपुच्छ नाहीसे झाले.
कानाला जोडणारे स्नायू : झाडांवर वस्ती करणारा आदिमानव दोन पायांवर ताठ उभा राहून जमिनीवर चालू लागला. स्वसंरक्षणासाठी कान फिरवून शत्रूपासून असलेला धोका कानाने टिपण्याच्या क्षमतेचा वापर न झाल्याने कानाला जोडणाऱ्या स्नायूंचा विकास पुढील पिढीत झाला नाही. मात्र वानरे, माकडे ही झाडांवर वस्ती करत असल्याने त्यांच्या कानाला जोडणारे स्नायू आजही ती क्षमता टिकवून राहिले आहेत.
मानवाच्या शरीरातच नव्हे तर इतर अनेक प्राण्यांमध्ये अवशेषांगे आढळली आहेत. सापामध्ये पाय नाहीत; परंतु, अजगराच्या श्रोणी मेखलेजवळ मागील पायांच्या हाडांची अवशेषांगे आहेत. व्हेल (देवमासा) या सस्तन प्राण्यांनी आपले राहण्याचे माध्यम आणि आहार बदलले. माध्यम बदलल्यामुळे त्यांचे मागचे पाय आणि त्यांना आधार देणाऱ्या श्रोणि-अस्थी (नितंबाची हाडे) नाहीशा झाल्या. व्हेलमध्ये कधीकधी श्रोणि-अस्थींची एक जोडी आढळते. परंतु, तिचा पृष्ठवंशाशी (पाठीच्या कण्याशी) असणारा संबंध पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. या अवशेषांचे टिकून राहणे चतुष्पादीय पूर्वजपरंपरा दर्शविते. त्याचप्रमाणे व्हेलच्या भ्रूणाला दातांचे अंकुर असतात परंतु, प्रौढ अवस्थेत दात केव्हाही नसतात. गंगा नदीतील डॉल्फिनच्या डोळ्याच्या ठिकाणी फक्त एक उंचवटा असतो. त्याच्या डोळ्यातील नेत्रभिंग पूर्णपणे अपारदर्शक झाले आहे. नदी डॉल्फिनमध्ये डोळ्याचे अवशेषांग झाले आहे.
जमिनीवर राहणाऱ्या पुष्कळ पक्ष्यांची उडण्याची शक्ती नाहीशी झालेली आहे. न्यूझीलंडमध्ये आढळणारा किवी पक्षी याचे उदाहरण आहे. वरवर पाहिले तर या पक्ष्याच्या शरीरावर पंख आढळत नाहीत; परंतु, काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर त्याच्या शरीरावरील केसांसारख्या पिसांखाली पंखांचे अल्पविकास (अतिशय थोडी वाढ) आढळतात. यांना उड्डाणांगे म्हणून काहीही महत्त्व नाही. तसेच न उडणाऱ्या पुष्कळ कीटकांत देखील पंखांचे अवशेष आढळतात.
सगळीच अवशेषांगे निरुपयोगी असतात असे नाही. नाहीसे होण्याच्या वाटेवर असलेले अवशेषांग योग्य परिस्थितीत एखादे नवे कार्य करू लागते. उदा., कीटकवर्गाच्या डिप्टेरा या गणातील कीटकांच्या मागच्या पंखांच्या जोडीचा ऱ्हास होऊन त्यांची संतोलक (तोल राखणारी) अंगे बनतात. कीटक उडत असताना त्यांच्या शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य ही अंगे करतात.
पहा : डॉल्फिन (प्रथमावृत्ती नोंद), देवमासा (प्रथमावृत्ती नोंद).
संदर्भ :
- http://discovermagazine.com/2004/jun/useless-body-parts
- https://www.newworldencyclopedia.org/entry/Vestigial_organ
- https://en.wikipedia.org/wiki/Human_vestigiality
समीक्षक : मोहन मदवाण्णा