घोरपड हा सरीसृप वर्गातील स्क्वॅमॅटा (Squamata) गणातील व्हॅरॅनिडी (Varanidae) कुलातील प्राणी असून याचे शास्त्रीय नाव व्हॅरॅनस बेंगालेन्सिस (Varanus bengalensis) आहे. यास बेंगाल मॉनिटर (Bengal monitor) किंवा कॉमन इंडियन मॉनिटर (Common Indian monitor) असेही म्हणतात. यांचा अधिवास भारत, दक्षिणपूर्व व पश्चिम आशिया येथे असून ते इराण, अफगाणिस्तान, भारत, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार येथील नद्यांच्या खोऱ्यांत आढळतात. अनुकूलन विविध अधिवासात असल्याने त्यांचे अस्तित्व दूरवर पसरलेले आहे. पानगळ, अर्धपानगळ आणि सदाहरित उष्णकटिबंधीय जंगले व काटेरी वने अशा ठिकाणी राहणे त्यांना पसंत असते. तसेच ती शेतभागात अधिक प्रमाणात आढळताना दिसते. मराठीमध्ये घोरपड या प्राण्यास नेहमी स्त्रीलिंगी रूप वापरतात.

घोरपड (व्हॅरॅनस बेंगालेन्सिस)

घोरपडीची एकूण लांबी सुमारे १७५ सेंमी. असून यामध्ये मुस्कटाच्या (Snout) पुढे आलेल्या टोकापासून (नाकाड) ते पोटाच्या टोकापर्यंतची लांबी सुमारे ७५ सेंमी., तर शेपटीची लांबी सुमारे १०० सेंमी. असते. नर हे मादीपेक्षा आकाराने मोठे असतात. नराचे वजन जास्तीत जास्त ७.२ किग्रॅ. असते. घोरपडीचे शरीर जाडजूड व भक्कम असते. पूर्ण वाढ न झालेल्या घोरपडीच्या मानेवर, गळ्यावर व पाठीवर गडद रंगाचे आडवे पट्टे असतात. त्यांचे पोट पांढरे असते. त्यावर गडद आडवे पट्टे व राखाडी, पिवळे ठिपके असतात. लहान घोरपडीच्या पाठीवर पिवळ्या ठिपक्यांच्या ओळी असतात. ओळी जोडणारे आडवे पट्टे असतात. जसजशी त्यांची वाढ होते तसतसा हा रंग फिकट तपकिरी अथवा राखाडी होतो. गडद ठिपक्यांमुळे पाठ ठिपकेदार बनते. अपरिपक्व व जननक्षम घोरपडींच्या रंगातील फरक त्यांच्या अधिवासामुळे असावा.

घोरपड (व्हॅरॅनस बेंगालेन्सिस) : पिलू.

घोरपडीमध्ये डोळे व मुस्कट यांमधील (मध्य) भागात आडव्या फटीप्रमाणे नाकपुड्या असतात. आवश्यकतेनुसार त्यांना या नाकपुड्या बंद करता येतात. पाठीवरील खवल्यांचे काही भाग खडबडीत असतात. शरीराच्या दोन्ही बाजूस छिद्रे असतात. नर घोरपडीमध्ये छिद्रांची संख्या अधिक असते. सूक्ष्म छिद्रे असलेल्या खवल्यांच्या खाली असलेल्या त्वचेमध्ये ग्रंथी असतात. ह्यातून निघणारा स्राव फेरोमोन सदृश असतो. घोरपडीची जीभ दुभंगलेली व गंधसंवेदी असते. जिभेच्या गंध संवेदाने घोरपड भक्ष्य ओळखते. शेपूट लांब, जाड व चपटे असून यात चरबीचा साठा असतो. अन्नाची कमतरता असल्यास चरबीपासून ऊर्जा मिळवली जाते. पायांची  बोटे लांबट आणि मोठी असून त्यांच्या टोकांवर मजबूत नख्या असतात. घोरपड आपल्या बळकट नख्यांनी खडकाला घट्ट धरून जागच्या जागी चिकटून राहू शकते. घोरपडीच्या फुफ्फुसात स्पंजासारख्या ऊती असतात. त्यामुळे श्वसन वायूची देवाणघेवाण होते.

घोरपड : दुभंगलेली जीभ

इतर सरड्यांप्रमाणे घोरपडीचे दात जबड्याच्या हाडाच्या आतील भागाशी जोडलेले असतात. बाह्य दातांची ओळ कार्यक्षम असते. हे दात झिजल्यावर मागून दुसरे दात त्यांची जागा घेतात. दात तीक्ष्ण करवतीसारखे असतात. एकूण दातांची संख्या ७८ असते. झिजलेले दात पुढे सरकतात आणि दरवर्षी चार वेळा प्रत्येक दाताच्या ठिकाणी नवे दात येतात. मुखग्रंथीतून स्राव येतो. काही व्हॅरॅनीड सरड्यांतील (Varanid lizard) स्राव विषारी असतो; परंतु, बंगाल मॉनिटरमध्ये स्राव विषारी नसतो.

घोरपड चपळ असून प्रसंगी त्या जोराने धावू शकतात. धावताना शेपटी वर उचलतात. मोठ्या घोरपडी संकटकाळी लपण्यासाठी झाडे-झुडूपांचा उपयोग करतात. संकटात सापडल्यास ती फुप्फुसात हवा घेते, अंग फुगविते, जोराने फुस्कारते व शेपटीने जोरात तडाखे देते. अशा वेळी ती बरीच क्रूर भासते. तर लहान घोरपडी संकटकाळी झाडांवर चढतात. घोरपड स्वभावाने भित्री असून ती माणसांवर हल्ला करत नाही. परंतु, तिला पकडल्यास क्वचितप्रसंगी ती चावते. तिचा चावा फारच जोराचा असून पकडही सहज न सुटणारी असते. दूरवरचे पाहण्यासाठी किंवा दुसऱ्या नराबरोबर लढण्यासाठी घोरपडी आपल्या मागील दोन पायांवर उभ्या राहतात. त्या उत्तम पोहू शकतात. पोहताना त्या शेपटाचा उपयोग वल्ह्यासारखा करतात. घोरपड पाण्याखाली १७ मिनिटे राहिल्याची नोंद आहे.

घोरपड दिनचर असून ती सकाळी सक्रिय होऊन ऊन खायला बाहेर पडते. परंतु, मोठ्या घोरपडी प्रसंगी रात्री वस्तीस असलेल्या वटवाघूळांची झाडावर चढून शिकार करतात. थंड प्रदेशांत आढळणाऱ्या घोरपडी हिवाळ्यात कमी तापमानामुळे बिळामध्ये आश्रय घेतात. या काळात त्यांचा चयापचय वेग मंदावतो. घोरपड ऋतुमान आणि भक्ष्यांच्या उपलब्धतेनुसार क्षेत्र (Territory) बदलत असते. घोरपडीची दृष्टी तीक्ष्ण असल्याने २५० मीटर दूर असलेल्या माणसांची चाहूल त्यांना लगेच लागते.

घोरपडीच्या आहारामध्ये विविधता असून अपृष्ठवंशीय तसेच पृष्ठवंशीय प्राणी त्यांचे भक्ष्य असतात. अपृष्ठवंशीय भक्ष्यांत जास्त करून कीटक (उदा., रातकिडा, नाकतोडा, टोळ इत्यादी) तसेच अपाद डिंबक, अळ्या, घोण, विंचू, खेकडे, गोड्या पाण्यातील झिंगे, गोगलगायी, वाळवी, मुंग्या इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय मोठ्या आकाराच्या पृष्ठवंशीय भक्ष्यांत बेडूक व त्यांची अंडी तसेच मासे, सरडे, सर्प, उंदीर, खारी, चिचुंद्री आणि पक्षी आदींचा समावेश होतो. तसेच त्या प्रसंगी ससे आणि घुशी यांची बिळातून खणून काढून शिकार करतात. ऋतुमानानुसार आणि आजूबाजूच्या परिसराप्रमाणे त्यांच्या आहारात बदल होतो. उदा., त्या उन्हाळ्यात पाण्यातील मासे व कीटक तसेच मेलेली जनावरेही खातात उदा., हरणासारखे मोठे जनावर मेलेले दिसले तर अनेक घोरपडी एकत्र येऊन ते खातात. त्याचप्रमाणे त्या गुरे ज्या ठिकाणी असतात तेथील शेणामधील कीडे आणि अळ्या देखील खातात.

समागम झाल्यावर मादी शुक्राणू टिकवून ठेवू शकते. बंदिवासातील मादीने अंडी घातल्याची नोंद आहे. प्रजननाचा मुख्य काळ जून ते सप्टेंबर असतो; परंतु, नर हे एप्रिलपासूनच लढती सुरू करतात. माद्या सपाट अथवा उतारावर बिळांमध्ये किंवा खड्ड्यांमध्ये अंडी घालतात. त्यानंतर त्या ते बीळ माती व पालापाचोळ्यांनी भरून त्यावर आपल्या मुस्कटाच्या पुढे आलेल्या भागाने माती थापतात. आपल्या घरट्यापासून भक्षकाला दूर ठेवण्यासाठी माद्या बऱ्याच वेळेला आपल्या घरट्याच्या आजूबाजूला अनेक बिळे करतात किंवा खड्डे खणतात आणि माती सर्वत्र पसरून ठेवतात. काही वेळेला घोरपड वाळवीच्या वापरात नसलेल्या वारूळामध्ये बीळ खणते. घोरपड एका वेळेला २० अंडी घालते. बिळातील उष्णतेने अंडी उबविली जाऊन १६८ ते २५४ दिवसांनी अंड्यांतून पिले बाहेर येतात. परंतु, सर्वच अंडी व्यवस्थित उबविली जात नाहीत. त्यामुळे अंड्यांतून साधारणपणे ८ ते १६ पिले बाहेर येतात.

घोरपडीसंदर्भातील अनेक गैरसमज व अंधश्रद्धा यांमुळे घोरपडीची शिकार केली जाते. घोरपडीची चरबी औषधी असते अशा समजुतीमुळे तिला उकळून चरबी कमावली जाते. घोरपडीच्या पोटावरील कातडीपासून दिमडी नावाचे एक पारंपरिक लहान चर्मवाद्य तयार केले जाते. हे चर्मवाद्य दक्षिण भारतात जास्त करून आढळते.

गेरार्ड मार्टिन (Gerard Martin) या सरीसृप संशोधन प्रकल्प संशोधकाच्या म्हणण्याप्रमाणे घोरपडीची शिकार थांबवली तर तिचा उपयोग शेतीसाठी होऊ शकेल. मनुष्यास घोरपड धोकादायक नाही. घोरपडीमुळे उंदीर व सापांचा बंदोबस्त होतो. त्यामुळे घोरपडीचे परिसरात असलेले अस्तित्व हे संतुलित परिसंस्थेचे (Ecosystem) लक्षण मानले जाते.

खाण्यासाठी व तथाकथित औषधे बनविण्यासाठी घोरपडीची शिकार होत असल्याने त्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत घोरपडीस परिशिष्ट १ मध्ये सूचीबद्ध केले असून त्यांची कोणत्याही कारणास्तव शिकार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. घोरपडीची भक्ष्य मिळविण्याची ठिकाणे विविध व विस्तृत प्रमाणावर असल्याने प्राकृतिक ऱ्हासाचा त्यांना तितकासा धोका नाही. परंतु, कीटकनाशकांच्या अमर्याद वापरामुळे होत असलेल्या शेती प्रदूषणामुळे त्यांचे भक्ष्य कमी होत आहे. एकूणच घोरपडीच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे ही जाती संकटग्रस्त जाती (Danger zone) म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

ढगाळ मॉनिटर (Clouded monitor; Varanus nebulous) ही बंगाल मॉनिटरशी मिळतीजुळती एक प्रजाती असून ती दक्षिण म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, जावा सुमात्रा आणि सुंदा बेटे येथे आढळते.

बंदिवासात असलेली घोरपड साधारणत: २२ वर्षे जगलेल्याची नोंद आहे. पूर्ण वाढ झालेल्या घोरपडीचे भक्षक, अजगर, मनुष्य व काही पक्षी असतात. घोरपडीवर अनेक बाह्य तसेच अंतर्गत परोपजीवींची नोंद झाली आहे.

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Bengal_monitor
  • https://animaldiversity.org/accounts/Varanus_bengalensis/

समीक्षक : निनाद शहा