शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानवाचा जन्म सुमारे २ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत झाला. होमो इरेक्ट्स किंवा निअँडरथल मानव हे शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानवाच्या उदयाच्या वेळी नामशेष झालेले मानव समूह होते किंवा या आधुनिक मानवांमुळेच ते नामशेष झाले. त्यांच्याशी या मानवाचा संकर झाला असावा आणि निअँडरथलचा जनुकीय वारसा शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानव म्हणजेच आपल्याकडे आला असावा, असाही मतप्रवाह आहे.

शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानवाच्या उत्पत्तीविषयी जीवाश्मांचे पुरावे आणि रेण्वीय जीवशास्त्राच्या नोंदी विचारात घेतल्या जातात. यानुसार ‘आफ्रिकेबाहेर उत्पत्ती’ आणि ‘बहुस्थानिय उत्पत्ती सिद्धांत’ यांचा विचार केला जातो. सर्वसाधारणपणे हा सिद्धांत अफ्रिकेतून बाहेर मान्य झाला आणि तेथून सुमारे १ लाख वर्षांपूर्वी तो यूरोप व आशियात स्थलांतरित झाला असावा, असे मानले जाते.

शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानवाचे ग्रेसिल सांगाडा, त्याचे दात, उभे कपाळ, विस्तारित पॅरिएटल हाडे, हनुवटी, त्याचा चेहरा इत्यादी निअँडरथल मानवापेक्षा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण दिसून येते. शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानव शिकारीसाठी हस्तिदंत व शिंगांपासून तयार केलेल्या हत्यारांचा वापर करीत; अन्न भाजून-सिजवून खात; शरीर-चेहऱ्याला गेरू लावून शरीर सजवत; वस्तू विनिमय करत; मृताचा औपचारिकरित्या दफनविधी करीत. आज अस्तित्वात असलेला शारीरिक दृष्ट्या प्रगत आणि सांस्कृतिक जीवन जगणारा मानव म्हणजेच आधुनिक मानव होय.

संदर्भ :

  • Srivastava, R. P., Morphology of the Primates and Human Evolution, New Delhi, 2009.
  • Turnbaugh, William; Jurmain, Robert; Nelson, Harry; Kilgore, Lynn, Understanding Physical Anthropology and Archaeology, New York, 2009.

समीक्षक : शौनक कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.