गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ गुजरातमधील सध्याच्या पिंडारा गावापासून ३ किमी. व द्वारकेपासून ४५ किमी. अंतरावर आहे. सौराष्ट्रातील हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

पिंडारा येथील पुरातत्त्वीय स्थळ, गुजरात.

महाभारताच्या अनुशासनपर्वात त्याचा उल्लेख पिंडारक असा आहे. या ठिकाणी द्वारकेपेक्षाही प्राचीन अशी देवपुरी नावाची नगरी होती, असे परंपरेने मानले जाते. इ. स. आठव्या शतकामध्ये ते पिंडतारक क्षेत्र या नावाने ओळखले जात असे. त्या ठिकाणी सातव्या ते दहाव्या शतकात बांधलेल्या मंदिरांचा समूह असून ते संरक्षित वारसास्थळ आहे. सध्या पिंडारा हे फक्त मच्छिमारी नौकांसाठी वापरले जाणारे अगदी छोटे बंदर आहे.

सन १९६५-६६ मध्ये झालेल्या पिंडारा येथे झालेल्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणात (१९६५-६६) प्रारंभिक ऐतिहासिक काळातील खापरे व रोमन मद्यकुंभाचे (ॲम्फोरा) तुकडे मिळाले होते. तसेच पिंडारा गावाच्या पूर्वेस आम्रा, लखाबावळ आणि वसई या ठिकाणी हडप्पा काळातील छोट्या वसाहती आढळल्या होत्या. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानामधील पुरातत्त्वज्ञांनी २००४-०५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात पुरातत्त्वीय स्थळावर काही ठिकाणी चुनखडीच्या दगडांपासून बांधलेल्या पायाचे अवशेष सुमारे १०० चौ.मी. परिसरात विखुरलेले आढळले. भरती-ओहोटीच्या क्षेत्रात पाण्याखाली गेलेल्या एका मंदिराचे अवशेष दिसतात. हे मंदिर सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिरांप्रमाणेच आहे. द्वारकेजवळच्या सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरील भूपुरातत्त्वीय संशोधनातून असे दिसले की, प्रारंभिक ऐतिहासिक काळात समुद्राची पातळी कमी होती. इ. स. दहाव्या-अकराव्या शतकात ती एक ते दोन मीटरने वाढली आणि त्यामुळे पिंडारा येथील एक मंदिर पाण्याखाली गेले.

संदर्भ :

  • Gaur, A. S & Sundaresh, Maritime Archaeology Around Porbandar, Aryan Books International, New Delhi & NIO, Goa, 2013.
  • Gaur, A. S. & Sundaresh, ‘Evidence of shoreline shift on the northern Saurashtra coast: Study based on the submerged temple complex at Pindaraʼ, Current Science, 92 (6): 733-735, 2007.

                                                                                                                                                                                    समीक्षक : श्रीनंद बापट